वस्ती, वसाहती, सोसायटी मध्येच नागरिकांना सोयीच्या योग्य जागा पाहून त्याठिकाणी अँटिजेन टेस्ट करण्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश
ज्या भागामध्ये 5 पेक्षा जास्त संख्येने कोरोना बाधित व्यक्ती जवळपासच्या घरांमध्ये, इमारतीत आढळून येतात अशा क्षेत्रांमध्ये तिस-या प्रकारचे कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात येतात, त्याठिकाणी झोनची प्रभावी अंमलबजावणी करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमधील अत्यंत महत्वाची गोष्ट असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तुर्भे विभागाच्या कोव्हीड 19 आढावा बैठकीत स्पष्ट केले.
तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि विभागीय पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच इंदिरानगर, तुर्भे, सानपाडा, पावणे या 4 नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचेकडून कोव्हीड 19 सद्यस्थितीची माहिती करून घेत आयुक्तांनी त्यांना मृत्यू दर कमी करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करीत त्यादृष्टीने नियोजनबध्द पावले उचलण्याचे निर्देश दिले व मार्गदर्शन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, तुर्भे विभागाचे नोडल अधिकारी उपआयुक्त श्री. राजेश कानडे उपस्थित होते.
प्रत्येक भागाची परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे विशेषत्वाने तिस-या प्रकारच्या कन्टेनमेट झोनची रचना करताना त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीसांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांच्या सहकार्याने, स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यासपूर्वक विचार करूनच, कडक अंमलबजावणी करणे सुविधाजनक ठरेल अशा आकाराच्या कन्टेनमेंट झोनची रचना करावी असे आयुक्तांनी सांगितले.
कन्टेनमेंट झोनच्या चतु:सीमा प्रवेशाच्या दृष्टीने काटेकोरपणे प्रतिबंधित करणे, नागरिकांची अत्यावश्यक सुविधांवाचून गैरसोय होणार नाही व लॉकडाऊनचे पालन होईल अशाप्रकारे पुरवठादारांचे नियोजन करणे, त्या भागात घरोघरी जाऊन रूग्णशोध मोहीम प्रभावीपणे राबविणे, त्यातही मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग असे इतर आजार असणा-या व्यक्तींची प्राधान्याने अँटिजेन टेस्ट करणे व इतर व्यक्तींचीही टेस्ट करणे, त्यामधील पॉझिटिव्ह रूग्णांचे आयसोलेशन करणे अशा गोष्टींकडे विशेषत्वाने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कोरोना बाधित जास्त संख्येने आहेत असे भाग शोधावेत आणि त्याठिकाणी अधिक बारकाईने लक्ष द्यावे असे स्पष्ट करीत लक्षणे असणारी एकही व्यक्ती सुटणार नाही याची काळजी घ्यावी व याकरिता आपल्या हद्दीतील खाजगी डॉक्टर्स, औषधे विक्रेते यांनाही नियमित संपर्कात ठेवावे असे निर्देश दिले.
कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला हे चित्र आपल्याला बदलायचे असून त्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या स्थानिक परिस्थितीचा विचार करून अभ्यासपूर्वक अंमलात आणाव्यात असेही आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी व विभाग अधिकारी यांना सूचित केले.
नागरिकांना अँटिजेन टेस्ट करण्यासाठी आपल्या रूग्णालयातील केंद्रापर्यंत येणे सोयीचे वाटत नसेल तर त्या - त्या विभागात योग्य जागा पाहून अँटिजेन टेस्ट कराव्यात असेही निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले.
कोरोनाची साखळी खंडीत करणे व मृत्यू दर कमी करणे हे आपले ध्येय आहे आणि ते नागरिकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्याला सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असल्यास ती न लपवता त्वरित जवळच्या महापालिका नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून अँटीजेन टेस्ट करून घ्यावी, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, हाय ब्लडप्रेशर असे इतर आजार असणा-या व्यक्तींनी प्राधान्याने अँटिजेन टेस्ट करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 01-08-2020 19:16:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update