स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न प्रत्येक नागरिकाने 'मी पण कोव्हीड योध्दा' या भूमिकेतून योगदान देण्याचे आवाहन
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील प्रांगणात आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पोलीस, अग्निशमन जवान व नागरिक सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोरोना योध्द्यांचे विशेष आभार मानले. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा करताना आपण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्यसैनिक यांना अभिवादन करतो. स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमेवर तैनात असणारे जवान सैनिक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून जे आपली जबाबदारी पार पाडत आहेत, असे डॉक्टर्स, नर्सेस, इतर अनेक विभागांचे अधिकारी - कर्मचारी, महानगरपालिका, पोलीस, महसूल तसेच समर्पित वृत्तीने काम करणा-या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमे या सर्वांनी कोविड योध्दा म्हणून योगदान दिलेले आहे, त्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत असे मत मांडले. या सर्वांच्या अथक योगदानाच्या माध्यमातून आपण सारेजण कोव्हीडवर मात करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती बाळगून आहोत असे ते म्हणाले.
या सर्व घटकांचे आभार व्यक्त करीत असताना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीड योध्द्याची व्याख्या केवळ या घटकांपुरती मर्यादीत नसून प्रत्येक नागरिकाने कोव्हीड विरूध्दच्या लढाईमधील आपली जबाबदारी ओळखून ती स्विकारणे अपेक्षित आहे अशी संकल्पना मांडली. प्रत्येक नागरिकाने 'मी पण कोव्हीड योध्दा' ही भूमिका अंगिकारली आणि कोव्हीडचा सामना करताना नियमित स्वच्छ हात धुणे, नेहमी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे, लक्षणे जाणवल्यास न लपवता आपली मोफत अँटिजेन टेस्ट करून घेणे अशा प्रकारे स्वयंशिस्तीचे पालन केले तर आपण नक्की या कोरोनाच्या संकटावर मात करू असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.
Published on : 15-08-2020 11:20:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update