कन्टेनमेंट झोनमधील श्रीमूर्ती संकलनासाठी सज्ज असणार श्रीगणेशमूर्ती संकलन वाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून साजरा होत असलेल्या श्रीगणेशोत्सवात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अ़सुविधा जाणवू नये व कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी व्हावी या दोन्ही गोष्टींकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे विशेष लक्ष असून त्यादृष्टीने विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी 23 मुख्य विसर्जन तलावांच्या जोडीला 135 कृत्रिम विसर्जन तलाव विभागवार निर्माण करण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील 37 तिस-या प्रकारच्या प्रतिबंधित क्षेत्रांमधील (Containment Zone - 3) नागरिकांच्या गणेशोत्सवातील श्रीमूर्ती विसर्जन सुविधेच्या दृष्टीने कनेटनमेंट झोनच्या प्रवेशव्दाराजवळ मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या मूर्ती संकलन व्यवस्थेमध्ये अधिक भर घालत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कन्टेनमेंट झोनमधील मूर्ती संकलनासाठी 'श्रीगणेशमूर्ती संकलन वाहन' कार्यरत ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक विभागातील कन्टेनमेंट झोनमध्ये 'श्रीगणेशमूर्ती संकलन वाहन' कार्यरत असणार असून हे वाहन झोनमध्ये फिरून नागरिकांच्या घराजवळून श्रीमूर्ती संकलित करतील व त्यांचे विधीवत विसर्जन करतील. तरी विशेषत्वाने कन्टनमेंट झोनमधील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विसर्जनापूर्वीची निरोपाची आरती घरीच करून आपल्या श्रीगणेशमूर्ती महानगरपालिकेच्या मूर्ती संकलन वाहनावरील स्वयंसेवकांकडे द्याव्यात असे आवाहन आहे.
श्रीगणेशोत्सवाचा उत्साह कायम राखून प्रत्येक नागरिकाने आरोग्यभान राखावे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका राबवित असलेल्या विविध सोयीसुविधांचा लाभ घ्यावा आणि आपले नवी मुंबई शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी कोरोना योध्द्याची भूमिका साकारावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 22-08-2020 14:19:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update