नवी मुंबई महानगरपालिकेच्या आर.टी.-पी.सी.आर. लॅबमध्ये 50 हजार चाचण्या पूर्ण

कोव्हीड 19 च्या चाचण्यांसाठी आय.सी.एम.आर. ची शासकीय परवानगी मिळविण्यापासून तपासणीसाठी आवश्यक सर्व यंत्रणा उभारण्यापर्यंतची कार्यवाही केवळ 11 दिवसात पूर्ण करून अदययावत आर.टी.-पी.सी.आर. लॅब विक्रमी वेळेत सुरू करणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथील अद्ययावत आर.टी.-पी.सी.आर. लॅबमध्ये 50 हजार कोव्हीड चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 नोव्हेबरपर्यंत या लॅबमध्ये 50 हजार 363 कोव्हीड चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.
14 जुलैला श्री.अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महानगरपालिकेची स्वत:ची आर.टी.-पी.सी.आर. लॅब सुरू करण्यात येईल असे सांगितले होते. त्यावेळी कोव्हीड 19 चाचण्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेला शासनाने नेमून दिलेल्या लॅबवर अथवा खाजगी लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. त्या लॅबवर इतरही शहरातील चाचण्यांचाही भार असल्याने रिपोर्ट मिळण्यास विलंब होत होता व नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. ही परिस्थिती लक्षात घेत दोनच दिवसात 16 जुलैला अर्ध्या तासात चाचणी अहवाल मिळणा-या रॅपीड अँटिजेन टेस्टला प्रारंभ करण्यात आला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांनी 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेत 'ट्रेस, टेस्ट व ट्रिट' या त्रिसूत्रीवर भर दिला. त्यासाठी आवश्यक टेस्ट्सच्या वाढीसाठी अँटिजेन टेस्ट सोबतच महानगरपालिकेची स्वत:ची आर.टी.-पी.सी.आर. लॅब सुरू करण्याकडे विशेष लक्ष दिले. लॅब उभारताना ती परिपूर्ण व उच्चतम असावी या भूमिकेतून लॅबसाठी सध्याची सर्वोत्तम व अद्ययावत उपकरणे घेण्यात आली. सतत पाठपुरावा करण्यात आला. एकाच वेळी लॅबची स्थापत्य, विद्युत कामे, उपकरणे खरेदी, त्यांची उभारणी, शासकीय परवानगी (आयसीएमआर) मिळविण्याची कार्यवाही, सक्षम अधिकारी - कर्मचारी यांची नियुक्ती, उपकरणे बसविली जात असतानाच ती चालविण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण (Hands on Training) अशा विविध पातळ्यांवर कालमर्यादित पध्दतीने नियोजनबध्द कामे करण्यात आली. त्यामुळे केवळ 11 दिवसांमध्ये इतकी अद्ययावत व सुसज्ज लॅब सुरू होऊ शकली,
दररोज 1000 टेस्ट्स इतकी मोठ्या प्रमाणावर टेस्टींग क्षमता असणारी नवी मुंबई महानगरपालिकेची ही स्वयंचलित आर.टी.-पी.सी.आर. लॅब संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील स्वयंपूर्ण व सर्वाधिक अद्ययावत लॅब आहे. या लॅबमध्ये 24 तास टेस्टींग सुरू असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राप्रमाणेच शेजारील ठाणे व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 सॅम्पल्सचीही या लॅबमध्ये टेस्टींग करण्यात आली आहे.
सध्या या लॅबमध्ये कोव्हीड 19 संबंधित टेस्ट्स करण्यात येत असल्या तरी 'मॉलिक्युलर डायग्नोसिस' स्वरूपाच्या या सुसज्ज लॅबमध्ये भविष्यात स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरेसीस, एच.आय.व्ही.अशा इन्फेक्शन डिसीजेससह अगदी कर्करोगाच्या टेस्ट्सही होऊ शकतील. कोव्हीडच्या एका टेस्टला खाजगी लॅबमध्ये येणा-या खर्चाशी या लॅबमध्ये टेस्ट करण्यासाठी महानगरपालिकेला येणा-या खर्चाशी तुलना केली असता, या लॅबच्या क्षमतेनुसार सुरू झाल्यापासून 1 महिन्यांच्या आतच लॅब उभारणीसाठी महानगरपालिकेला आलेल्या भांडवली खर्चाच्या रक्कमेची बचत झालेली आहे. ही अद्ययावत लॅब किफायतशीर आहेच शिवाय नवी मुंबई महानगरपालिकेची दूरगामी बहुउपयोगी अशी साधन संपत्ती आहे.
Published on : 03-11-2020 15:00:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update