नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम वितरित झाल्याने दिवाळी आनंदात
सन 2019-20 शैक्षणिक वर्षाची प्रलंबित शिष्यवृत्ती रक्कम दिवाळीपूर्व अदा करण्यात यावी या महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार समाजविकास विभागातील अधिकारी - कर्मचारी यांनी 15 दिवस अविश्रांत मेहनत घेत 31680 विद्यार्थ्यांच्या खात्यात 21 कोटी 96 लक्ष 49 हजार 600 इतकी शिष्यवृत्ती रक्कम जमा केलेली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची दिवाळी आनंदात साजरी होत आहे.
दिवाळीपूर्वी (14 नोव्हेंबर) छाननी पूर्ण करून सर्व विद्यार्थ्यांना सन 2019-20 वर्षाची शिष्यवृत्ती अदा केली जाईल याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. दिवाळीपूर्वी शिष्यवृत्ती अदा झाली नाही तर, सर्व संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना दिवाळी सुट्टीच्या दरम्यान शिष्यवृत्ती अदायगीचे कामकाज सुरू ठेवावे लागेल व कोणाचीही सुट्टी मंजूर होणार नाही अशा स्पष्ट शब्दात निर्देश देण्यात आले होते.
शिष्यवृत्ती अदायगी कार्यवाही दिवाळीपूर्वी पूर्ण होण्याकरिता आवश्यकतेनुसार अर्जांच्या छाननीसाठी अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांचेमार्फत समाजविकास विभागास दिल्या होत्या.
त्यानुसार अतिशय मर्यादित कालावधीत शिष्यवृत्ती वितरण कामाचे नियोजन करीत समाजविकास उपआयुक्त श्रीम.क्रांती पाटील यांनी हे आव्हानात्मक काम आपल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेले व 31 हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम दिवाळीपूर्वी जमा केली.
*इयत्तानिहाय शिष्यवृत्ती*
* 1 ली ते 4 थी - रू. 4 हजार
* 5 वी ते 7 वी - रू. 6 हजार
* 8 वी ते 10 वी - रू. 8 हजार
* 11 वी व 12 वी - रू. 9600/-
* पदवीपर्यंत - रू. 12 हजार
* पदव्युत्तर उच्च शिक्षण - रू. 16 हजार
* तांत्रिक / व्यवसाय प्रशिक्षण (आय.टी.आय.) - रू. 8 हजार
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*शिष्यवृत्ती घटक व लाभार्थी संख्या*
* आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थी - 17320
* मागासवर्गीय विद्यार्थी - 6839
* निराधार, विधवा / घटस्फोटित महिलांची मुले - 1299
* नमुंमपा क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांची मुले - 3339
* सफाई कामगार / कंत्राटी कामगारांची मुले - 2594
* दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांची मुले - 289
=========
एकूण - 31680
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यावर्षी कोव्हीडच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यात जारी करण्यात आलेला लॉकडाऊन तसेच कोव्हीडविषयक सर्वेक्षण, कोव्हीड काळजी केंद्रे येथील सेवेत समाजविकास विभागासह महानगरपालिकेच्या इतरही विभागाचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त झाल्याने शिष्यवृत्ती वितरणास काहीसा उशीर झाला होता. तथापि या बाबीकडे आयुक्तांनी विशेष लक्ष देत शिष्यवृत्ती वितरणाची कार्यवाही तत्परतेने करून घेतली असून यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदा 2020-21 वर्षाकरिताही शिष्यवृत्ती देण्याविषयीची कार्यवाही सुरू करणेबाबत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी समाजविकास विभागास आदेश दिलेले आहेत.
Published on : 15-11-2020 12:00:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update