थकीत मालमत्ताकर धारकांना सुवर्णसंधी - थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% सूट 15 डिसेंबरपासून दोन महिने मालमत्ता कर अभय योजना 2020-21 जाहीर
मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असून यावर्षी कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर मालमत्ताकर वसूली दरवर्षीपेक्षा कमी झाली आहे तसेच थकबाकीसह कर भरण्यात नागरिकांनाही अडचणी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'मालमत्ताकर अभय योजना 2020-21' जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याव्दारे महानगरपालिकेच्या महसूलात भर पडणार आहेच शिवाय महत्वाचे म्हणजे थकबाकीदार नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
दि. 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीत अभय योजनेचा लाभ मालमत्ताकर थकबाकीदारांना घेता येणार आहे. थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% पर्यंत सूट देणारी ही थकबाकीदारांसाठी लाभदायी योजना आहे. यामध्ये जाहीर केलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक 25% दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांची 75% दंडात्मक रक्कम माफ होणार आहे. ही रक्कम त्यांना एकाचवेळी भरणा करावी लागेल. ती टप्प्याटप्प्याने भरता येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे. शिवाय जाहीर केलेल्या अभय योजनेच्या कालावधीस कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही याचीही दखल नागरिकांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे नागरिकांनी 15 फेब्रुवारीपर्यंत न थांबता 31 डिसेंबरपर्यंत रक्कम भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
ही अभय योजना राबविताना थकबाकी वसूलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून प्रत्येक थकबाकीदाराला सौजन्यपत्र (Courtesy Letter) दिले जाणार आहे. अभय योजना सुरू होण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमांना अभय योजना लागू राहणार नाही याची नागरिकांनी विशेष नोंद घ्यायची आहे.
सदर अभय योजना सुरु होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमेच्या परताव्यासाठी अभय योजनेअंतर्गत दावा करता येणार नाही. सदर अभय योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार, प्रसिध्दी केली जाणार असून त्याकरिता बॅनर, होर्डींग, सोशल मिडीया अशा विविध माध्यमांचा उपयोग केला जाणार आहे.
अभय योजनेचा लाभ घेण्याकरिता महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर तसेच सर्व 8 विभाग कार्यालये आणि संलग्न भरणा केंद्रांवर अर्ज उपलब्ध असणार आहेत. तसेच योजनेअंतर्गत रक्कम भरणा करण्यासाठी महापालिका मुख्यालय, सर्व 8 विभाग कार्यालये तसेच संलग्न भरणा केंद्रे या ठिकाणी रोख / धनादेश / धनाकर्ष याव्दारे रक्कम भरणा करण्याची सुविधा असणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या http:/www.nmmc.gov.in या वेबसाईटवर तसेच NMMC e-connect या मोबाईल ॲपवर अभय योजनेची विशेष लिंक दिली जाणार असून त्याठिकाणी ऑनलाईन पध्दतीने डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकींग / एनईएफटी / आरटीजीएस याव्दारेही कराचा भरणा नागरिकांना करता येईल.
मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असून त्यामधूनच नागरी सेवासुविधांची परिपूर्तता केली जात असल्याने सदर अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीदार नागरिकांनी शहर विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 04-12-2020 08:27:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update