होल्डींग पाँड मधील गाळ काढण्याच्या परवानगीसाठी एम.सी.झेड.एम.ए. कडे प्रस्ताव सादर

नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खाली वसलेले असल्यामुळे ठिकठिकाणी असलेले 11 होल्डींग पाँड शहराला सुरक्षा प्रदान करतात. सद्यस्थितीत या होल्डींग पाँडमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला दिसतो. त्यामुळे होल्डींग पाँडची पाणी साठविण्याची क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे भरतीच्या कालावधीत पाऊस पडत असेल तर शहराच्या काही भागात पाणी साठण्याचे प्रसंग घडतात. 05 ऑगस्ट 2020 रोजी ज्याप्रमाणे मुसळधार अतिवृष्टी झाली तशी अतिवृष्टी झाल्यास होल्डींग पाँड पाणी साठवणुक करू न शकल्याने शहरात पाणी साचले व त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यासाठी होल्डींग पाँडमधील गाळ काढणे अत्यंत महत्वाचे आहे.
तथापि अनेक होल्डींग पाँडमध्ये कांदळवन असल्याने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरीटी (MCZMA) यांची परवानगी घेतल्याशिवाय सदर गाळ काढणे शक्य नाही. या गोष्टीकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
त्यानुसार होल्डींग पाँडमधील गाळ काढण्याचा कालबध्द कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरीटी (MCZMA) यांची आवश्यक परवानगी घेण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आवश्यक कार्यवाही सुरु करण्यात आली असून तसा प्रस्ताव महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरीटी (MCZMA) कडे सादर करण्यात आलेला आहे.
Published on : 14-01-2021 12:47:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update