नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या तारखेस मा. राज्य निवडणूक आयोगाची मुदतवाढ
मा. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 02 फेब्रुवारी 2021 अधिसूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होती. या कार्यक्रमानुसार दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करून दि. 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यावर हरकती / सूचना प्राप्त करून घेणे अपेक्षित होते.
प्रारुप मतदार यादी बनविण्याकरिता 150 ऐरोली व 151 बेलापूर या 2 विधानसभा मतदारसंघाची दि.15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात असणारी मतदार यादी मा. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उपलब्ध करून घेण्यात आली व मा. राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या महाऑनलाईन संगणक प्रणालीच्या माध्यमातून सदर यादी प्रभागनिहाय विभाजीत करण्यात आली.
सदर प्रक्रिया करीत असताना मा.राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे संपूर्णत: पालन व्हावे याची दक्षता घेण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिका-यांना सूचना देण्यात आल्या होत्या.
विधानसभा मतदार यादीतील भाग क्रमांक व यापुर्वी अंतिम करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या हद्दी तपासून प्रभागनिहाय कंट्रोल चार्ट बनविण्यात आले व हे कंट्रोल चार्ट मा. राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रणालीवर अपलोड करण्यात आले. सदर संगणक प्रणालीमार्फत प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली. ही यादी प्रारूप मतदार यादी म्हणून दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली.
*यामध्ये विशेष दखल घेण्याजोगी बाब म्हणजे, मतदार यादीमध्ये नवीन मतदारांचा समावेश करणे किंवा मतदारांची नावे वगळणे या दोन्ही बाबी या स्तरावर अनुज्ञेय तर नाहीतच, शिवाय मा. राज्य निवडणूक आयोगाच्या महाऑनलाईन संगणक प्रणालीच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये अशा पध्दतीचा बदल करणेही शक्य नाही. त्यामुळे दोन्ही विधानसभा मतदार संघांची दि. 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात असणारी मा. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेली यादी, आहे तशी मूळ यादी (Mother Roll) म्हणून वापरण्यात आलेली आहे.*
मा. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दि.16 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मतदार / नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या.
या कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर (1) लेखनिकांच्या काही चुका, (2) दुस-या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, (3) संबंधीत प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महानगरपालिकेच्या संबंधीत प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे याप्रमाणे सुधारणा / दुरुस्ती करण्यात येईल असे मा. राज्य निवडणूक आयोगामार्फत सूचित कऱण्यात आले आहे.
दि. 23 फेब्रुवारी 2021 या अंतिम दिनांकापर्यंत एकूण 3497 हरकती / सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सदर हरकती / सूचनांवर मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संक्षिप्त चौकशी (Summary Enquiry) करून पुढे आवश्यक तो निर्णय घेण्याकरीता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्येक विभाग कार्यालयाकरिता उप आयुक्त दर्जाच्या अधिका-याच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे.
सदर समितीने प्रत्येक हरकती / सूचनेबाबत सखोल अभ्यास करून, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन व निर्णय घेताना पुराव्यासह योग्य कागदपत्रे तयार करून (उदा. व्हिडीओ चित्रीकरण, स्थळ पाहणीच्या वेळी काढलेले छायाचित्र इ.) तद्नंतरच वरील नमूद 3 मुद्द्यांना अधीन राहून आवश्यक तो निर्णय घेणेबाबत महापालिका आयुक्त यांचेमार्फत सर्व प्राधिकृत अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
हरकती / सूचनांवर निर्णय घेण्यापूर्वी मा. राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात यावे असे महापालिका आयुक्त यांनी समिती अध्यक्षांना निर्देशित केले असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.
*याबाबत दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी मा. राज्य निवडणूक आयोगाने असे आदेश दिले आहेत की, सध्या राज्यामध्ये कोव्हीड 19 च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी या कामांमध्ये व्यग्र असल्याने या हरकती व सूचनांवर आवश्यक तेथे सखोल चौकशी करून क्षेत्रभेटीव्दारे वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याकरिता अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.*
*त्यामुळे प्रभागनिहाय मतदार यादीवर प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर प्रथम काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असल्याने सदर प्रक्रिया 03 मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणे शक्य दिसत नाही. त्यास अनुसरून राज्य निवडणूक आयोगामार्फत असे निर्देश दिले आहेत की, महानगरपालिकेने प्रथम प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर काळजीपूर्वक निर्णय घ्यावा व त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा. अशी निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याची सुधारीत ताऱीख निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.*
Published on : 26-02-2021 16:36:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update