नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अजिंक्य

नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघाने नुकत्याच विविध ठिकाणी संपन्न झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील 4 स्पर्धांमध्ये विजेतेपदाचा चषक संपादन करुन शुटिंगबॉल क्षेत्रात पुन्हा एकदा आपली विजयाची नाममुद्रा उमटविलेली आहे. कोव्हीडमुळे लॉकडाऊन काळात खेळांना बंदी होती. मिशन बिगीन अगेन सुरु झाल्यानंतर काही प्रमाणात खेळ सुरु झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी तसेच सांगली आणि मध्यप्रदेश राज्यातील हरसौल येथे झालेल्या राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेत विजेतेपद संपादन केले आहे. अशाप्रकारे सातत्याने चार विजयश्री मिळवीत नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघाने पुन्हा एकवार प्रेक्षकांच्या मनात आपले नाव कोरलेली आहे.
जानेवारी महिन्यात टेबुर्णी सोलापूर येथील यशवंत क्लबच्या वतीने तसेच माळशिरस सोलापूर येथील नवयुग क्रीडा मंडळ यांच्या वतीने त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात मध्यप्रदेश राज्यातील हरसौल,जि.मन्दसौर, येथे अखिल भारतीय स्तरावरील अतिशय तुल्यबळ अशा 32 संघांचा समावेश असलेल्या शुटिंगबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. त्याचप्रमाणे शिवजयंतीदिनी तासगांव, जि.सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका संघाने उपविजेतेपद संपादन केले आहे. अशाप्रकारे दोन महिन्यात चार राष्ट्रीय स्तरावरील शुटींगबॉल स्पर्धांमध्ये तीन अजिंक्यपदे व एक उपविजेतेपद पटकावित आपली दखल शुटिंगबॉल क्षेत्रामध्ये घेण्यास भाग पाडले आहे.
सन 1998 पासुन 2008 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेचा शुटींगबॉल संघ सातत्याने दहा वर्षे संपूर्ण देशात विविध स्पर्धांमध्ये नावलौकीक पात्र ठरला होता. आता पुन्हा एकदा नव्या दमाचे होतकरु खेळाडू नवी मुंबई महानगरपालिका संघात समाविष्ट करून घेण्यात आले असून पुन्हा एकवार नवी मुंबई महानगरपालिकेचा संघ राष्ट्रीय स्तरावर आपले नाव गाजविताना दिसतो आहे.
या स्पर्धांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शुटिंगबॉल संघाने अत्यंत उत्तम खेळाचे प्रदर्शन करत यावर्षीच्या दुस-या हंगामातसुध्दा प्रेक्षकांची व आयोजकांची मने जिंकत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अजिंक्यपद मिळविले. महापालिका शुटिंगबॉल संघातील राष्ट्रीय खेळाडू महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव यांच्यासह संघातील खेळाडू श्री. रणजित इंगळे, श्री. सुशांत पवार, श्री. मुब्बाशिर अहमद, श्री. सुरज चौगुले, श्री. मुद्दशिर अहमद, श्री. परेश मोकल, श्री. खुर्शीद अहमद, श्री. रत्नेश मोकल तसेच संघ प्रशिक्षक श्री. सखाराम खानदेशे यांचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभिनंदन केले आहे. या विजयी संघास अतिरिक्त आयुक्त श्री.संजय काकडे, क्रीडा विभागाचे उप आयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या
Published on : 03-03-2021 13:56:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update