आता प्रक्रियाकृत पाण्याचा होतोय मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी उपयोग

स्वच्छता कार्यात नवनव्या संकल्पना राबवित शहर स्वच्छतेमध्ये अधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न अनेक छोट्या छोट्या पण उपयोगी गोष्टींतून नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच करीत असते. अशाच प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याने स्वच्छता करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची 'सी' टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रे ही पर्यावरणशील केंद्रे म्हणून जगभरातील पर्यावरण तज्ज्ञांनी नावजलेली आहेत. याठिकाणी मलजलावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून निर्माण होणारे प्रक्रियाकृत पाणी काही मोठ्या सोसायट्यांमार्फत पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरले जाते. तसेच महानगरपालिकेच्या बांधकामांसाठीही त्याचा काही प्रमाणात वापर होतो. त्याचप्रमाणे उद्याने व हरितपट्टे फुलविण्यासाठीही या पाण्याचा उपयोग करण्यात येतो.
नवी मुंबई हे मुंबई, ठाणे, पनवेल मार्गे पुणे अशा मुख्य शहरांना जोडणारे मध्यवर्ती महत्वाचे शहर असून जेएनपीटी बंदर जवळच असल्याने येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतुक असते. या सातत्यपूर्ण वाहतुकीमुळे मुख्य रस्ते व त्याशेजारील पदपथांवर धूळ बसून ते काळवंडलेले दिसतात. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हा देखील एक महत्वाचा भाग असल्याचे लक्षात घेत मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाण्याचा उपयोग हे मुख्य रस्ते धुण्यासाठी करण्यात आला तर रस्त्यांची स्वच्छता होईल व प्रक्रियाकृत पाणीही चांगल्या गोष्टीसाठी उपयोगात येईल हे लक्षात घेत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत परिमंडळ 1 व 2 यासाठी दोन स्वतंत्र गाड्या नेमण्यात येऊन येथील मुख्य रस्ते व पदपथ प्रक्रियाकृत पाण्याने धुवून स्वच्छ करण्यास सुरूवात झालेली आहे. याव्दारे स्वच्छ सर्वेक्षण मोहीम अधिक प्रभावी रिताने राबविण्यात येत आहे.
Published on : 08-03-2021 12:03:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update