*नवी मुंबईतील विविध ठिकाणांची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली स्वच्छता पाहणी*




'निश्चय केला, नंबर पहिला' हे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून स्वच्छतेच्या सर्व निकषांमध्ये सर्वोत्तम कामगिरी असावी याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत. याकरिता विभागप्रमुख दर्जाच्या नोडल अधिका-यांची नियुक्ती प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी करण्यात आली असून त्यांच्यामार्फत शहर स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासोबतच आयुक्त स्वत: सकाळी लवकर विविध ठिकाणी जाऊन स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत.
या पाहणी दौ-यात यापूर्वी पाहणी केलेल्या ठिकाणी पुन्हा जाऊन आधीच्या पाहणी दौ-यात केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली आहे काय ? याची आयुक्त पुनर्पडताळणी करीत असल्याने महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतादूत अधिक गांभीर्यपूर्वक कामाला लागले असून यामुळे शहर स्वच्छतेला गती लाभलेली दिसून येत आहे.
आजही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रशासन व परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार तसेच परिमंडळ 2 चे उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगीरे यांच्यासमवेत वाशी रेल्वे स्टेशन मधील प्लॅटफॉर्म, सभोवतालचा परिसर, सेक्टर 1 वाशी मिनी मार्केट, कोपरखैरणे व घणसोली विभागातील अंतर्गत परिसर, घणसोली रेल्वे स्टेशन समोरील मुख्य रस्ता, कोपरखैरणे / घणसोली मधील मोठा नाला, गुणाली तलाव, घणसोलीगांव परिसर, नोसिल नाका वस्ती, सम्राट नगर, राबाडे खदाण तलाव, राबाडेगांव परिसर, राबाडे गांव व कातकरीपाडा नागरी आरोग्य केंद्रातील कोव्हीड लसीकरण स्थळे, ऐरोली / घणसोली मधील सेक्टर 8 येथील मोठा नाला, ऐरोली परिसर, आंबेडकर नगर, भीमनगर, निब्बाण टेकडी परिसर अशा विविध भागांना भेटी देत अंतर्गत स्वच्छतेची तसेच शौचालये, तलाव, नाले यांची पाहणी करून महत्वाच्या सूचना केल्या.
आपले नवी मुंबई शहर देशातील स्वच्छ शहरांमध्ये अग्रभागी असावे याकरिता महानगरपालिका अधिक सक्रीय झालेली असून नवी मुंबईकर नागरिकांनीही शहराविषयीचा अभिमान उंचाविण्यासाठी आपल्यामुळे कुठेही कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची खबरदारी घ्यावी. यादृष्टीने विशेषत्वाने झोपडपट्टी व गावठाण भागात नागरिकांनी आपल्या दरवाजाबाहेरील पॅसेजमध्ये कपडे / भांडी / गाड्या धुवून रस्ता ओला करून अस्वच्छता पसरू देऊ नये तसेच ओला व सुका कचरा घरातूनच वर्गीकरण करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या घंटागाडीतही वेगवेगळा द्यावा आणि आपला कचरा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर टाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 22-03-2021 13:14:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update