*कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेदरम्यान मुलांच्या सुरक्षिततेला दिले जाणार प्राधान्य* *त्याच्या पूर्वतयारीसाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी साधला बालरोग तज्ज्ञांशी वेबसंवाद*

कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्समधील मान्यवर डॉक्टर्स तसेच अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नवी मुंबईचे मान्यवर पदाधिकारी असणारे बालरोगतज्ज्ञ यांच्याशी वेबसंवाद साधत आगामी नियोजनच्या दृष्टीने सर्वांगीण चर्चा केली. त्यांच्या संपन्न अनुभवाचा नियोजनामध्ये उपयोग व्हावा यादृष्टीने ही चर्चा अत्यंत महत्वाची होती.
यामध्ये, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे समवेत नवी मुंबई कोव्हीड टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा नायर हॉस्पिटल मुंबईचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ज्ञ टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य डॉ. विजय येवले, अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना नवी मुंबई शाखा अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाणे, सचिव डॉ. सतिश शहाणे, खजिनदार डॉ. मेधाई सिन्हा, माजी अध्यक्ष डॉ. शिल्पा आरोसकर तसेच नवी मुंबई महानगरपालिका टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य डॉ. गजानन वेल्हाळ, कार्डिओलॉ़जिस्ट डॉ.उदय जाधव, बालरोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र किजवडेकर, इन्टेसिव्हिस्ट डॉ. अक्षय छल्लानी, ॲनेस्थेटिस्ट डॉ. जेसी एलिझाबेथ, फिजीशिअन डॉ. अजय कुकरेजा आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, बालरोगतज्ज्ञ डॉ. माधवी इंगळे सहभागी झाले होते.
यावेळी झालेल्या संवादामध्ये विविध मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. त्यामध्ये तिस-या लाटेत लहान मुलांत मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रसाराची शक्यता तितकीशी नाही, मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक तयारी करणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले. जरी लहान मुलांपैकी काही मुले कोरोना पॉझिटिव्ह आली तरी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मुले ही कोणतीही लक्षणे नसलेली अथवा अत्यंत अल्प प्रमाणात लक्षणे असणारी असतील. मात्र काही मर्यादीत मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचारासाठी पुरेशा संख्येने ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स व पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणेविषयी सूचना करण्यात आल्या.
लहान मुलांसाठी गरजेच्या असलेल्या काही विशिष्ट चाचण्या उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी विचारविनीमय करण्यात आला तसेच उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळापैकी काहीजणांना बालकांशी संबंधित वॉर्डमध्ये तसेच आयसीयू वॉर्डमध्ये काम करण्याविषयीचे विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण आत्तापासूनच दिले जावे या बाबींवर चर्चा करण्यात आली.
लहान मुलांच्या वॉर्डमध्ये मुलाचे आई किंवा वडील केअर टेकर म्हणून थांबणे आवश्यक ठरते या बाबीचा विचार सुविधा निर्माण करताना व्हावा त्याचप्रमाणे ही केअरटेकर व्यक्ती कोव्हीड निगेटिव्ह असेल तर त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याकरिता मार्गदर्शक नियमावली (SOP) तयार करणेबाबतही सूचना करण्यात आली.
सध्या कोव्हीडमधून बरे झालेल्या काही मुलांमध्ये पोस्ट कोव्हीड आरोग्यविषयक तक्रारी आढळून येत असल्याची बाब चर्चेमध्ये विचारात घेण्यात आली व याविषयी आवश्यक दक्षता घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या.
कोव्हीड बाधीत रूग्ण, मग ते प्रौढ असोत की लहान मुले, त्यांच्यामध्ये लक्षणे दिसल्यास त्यांची त्वरीत कोव्हीड टेस्ट करून घेणे अत्यावश्यक आहे. विशेषत: आपल्या लहान मुलांबाबत पालकांनी दक्षता घेऊन त्यांची टेस्टींग टाळू नये ही अत्यंत महत्वाची बाब यावेळी बालरोगतज्ज्ञांकडून विशेषत्वाने अधोरेखीत करण्यात आली.
मास्क वापरणे हे प्रत्येक लहानथोरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून पालकांनी स्वत: मास्क वापरावाच शिवाय आपल्या मुलालाही मास्क वापरण्याची सवय लावून त्याच्या मनावर कोव्हीड सुरक्षेचा संस्कार करावा असे मत या तज्ज्ञांनी प्रामुख्याने व्यक्त केले.
तिस-या लाटेचा प्रभाव मुलांवर जास्त प्रमाणात होणार आहे अशा बातम्या, चर्चांमुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण असल्याने पालकांकडून याबाबत सतत विचारणा करण्यात येत असल्याचे अनुभव सांगण्यात आले. तथापि आपण कल्पना करतो इतकी गंभीर परिस्थिती होणार नाही असा अभिप्राय व्यक्त करीत बालरोगतज्ज्ञांनी पालकांना सद्यस्थितीची जाणीव करून देत दिलासा देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यासोबतच अगदी लहान मुलांतही कोरोना सदृष्य लक्षणे दिसल्यास ती लपवून न ठेवता लगेच टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेने संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी जागरूकतेने अतिशय लवकर पूर्वनियोजन सुरू केल्याबद्दल प्रशंसा करीत याकामी नवी मुंबईतील सर्व बालरोगतज्ज्ञांचे संपूर्ण सहकार्य राहील अशी खात्री सर्व बालरोगतज्ज्ञांनी संघटनेच्या वतीने दिली.
Published on : 09-05-2021 16:27:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update