*दुर्लक्षित घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष देताना रेडलाईट एरियातील महिलांकरिता विशेष लसीकरण सत्र*
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकडे विशेष लक्ष दिले जात असून त्यादृष्टीने नागरिकांना आपल्या घरापासून जवळ सुरक्षितपणे लस घेता यावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सध्या 76 लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून लसींच्या उपलब्धतेनुसार 100 हून अधिक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्याचे नियोजन करून ठेवण्यात आलेले आहे.
लसीकरणचा वेग वाढविण्यावर लक्ष दिले जात असताना समाजातील दुर्लक्षित घटकांच्या लसीकरणाचीही काळजी घेण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या बेघर, निराधार व्यक्तींच्या लसीकरणाची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेली आहे. अशाचप्रकारे दिव्यांग व्यक्ती, डोंगराळ भागात कॉरी क्षेत्रात राहणा-या व्यक्ती यांच्याकरताही महानगरपालिकेने लसीकरणाची विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
त्याचप्रमाणे आज तुर्भे भागातील रेडलाईट एरियामधील महिलांकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तेथे लसीकरणाविषयी समुपदेशन करून 78 महिलांचे लसीकरण करण्यात आले. येथे लसीकरण करताना काही महिलांच्या मनात लसीकरणाविषयी गैरसमज असल्याचे आढळून आल्याने त्यांची सभा घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे व त्यांना कोव्हीड विरोधातील लढ्यातील लसींचे महत्व सांगितले जाणार आहे. त्यानंतर लवकरच त्यांच्याकरिता आणखी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
लसीकरणापासून समाजातील कोणताही पात्र घटक वंचित राहू नये याची काटेकोर काळजी घेतली जात असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
सध्या लसीचे कमी प्रमाणात डोस उपलब्ध होत असल्याने कोणत्या लसीकरण केंद्रावर किती डोस उपलब्ध आहेत याविषयीची माहिती महानगरपालिका विविध माध्यमांतून आदल्याच दिवशी प्रसिध्द करीत असून लसीकरण केंद्रांवर नागरिकांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता घेतली जात आहे. काही दिवसातच लसींचे प्रमाण वाढून लसीकरणाला वेग येईल त्या अनुषंगाने नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे आणि लस घेतली असली तरी मास्क, सुरक्षित अंतर, हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचे कोव्हीड अजून संपलेला नाही याचे भान ठेवून पालन करावे असेही आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 02-07-2021 16:06:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update