*वाशीतील विशेष लसीकरण सत्रात 124 तृतीयपंथीयांनी घेतला कोव्हीड लसीकरणाचा लाभ*
*समाजातील दुर्लक्षित घटकांच्या लसीकरणाकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून आज वाशी येथे तृतीयपंथीयांसाठी आयोजित विशेष लसीकरण सत्राचा लाभ 124 तृतीयपंथीयांनी घेतला.*
महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाला गती देत असताना कोणताही घटक दुर्लक्षित राहू नये याकडेही बारकाईने लक्ष दिले जात असून कॉरी परिसरात राहणा-या व्यक्ती, रेडलाईट एरिआ तसेच रस्त्यावर राहणारे बेघर निराधार यांच्याकरिता महानगरपालिकेने विशेष सत्रांचे आयोजन केले आहे.
या सोबतच सेवा पुरविताना ज्या व्यक्तींचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो अशा रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर, केमिस्ट, मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करणारे नागरिक तसेच रिक्षा - टॅक्सी चालक अशा कोव्हीडच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकडेही (Potential Superspreaders) काळजीपूर्वक लक्ष देत त्यांच्यासाठी विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
अशाचप्रकारे आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तृतीयपंथियांसाठी लेट्स सेलिब्रेट फिटनेस यांच्या सहयोगाने वाशी सेक्टर 1 मधील स्पेस स्टुडिओमध्ये विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाईज आणि एलसीएफ या सेवाभावी संस्थांच्या वतीने तृतीयपंथीयांना जीवनावश्यक साहित्याचं वितरण करण्यात आले.
*इंदिरानगर तुर्भे परिसरात रिकोंडा कॉरी परिसरातील 103 नागरिकांचे लसीकरण*
त्याचप्रमाणे *आज तुर्भे एमआयडीसी परिसरातील रिकोंडा कॉरी परिसरात जाऊन तेथील 63 पुरूष व 37 महिला अशा 100 नागरिकांचे इंदिरानगर नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले.* यापूर्वीही महानगरपालिकेच्या वतीने तुर्भे विभागात इंदिरानगर परिसरातील डि.वाय.पाटील कॉरी आणि चुनाभट्टी कॉरी परिसरातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. यापुढील काळात चेतक स्टोन कॉरी, बबनशेट कॉरी, राजलक्ष्मी कॉरी, साई स्टोन कॉरी परिसरातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
*कोव्हीड लसीकरणापासून कोणताही घटक वंचित राहू नये याची काळजी महानगरपालिकेच्या वतीने घेतली जात असून लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी लसीकरण झाल्यानंतरही मास्क, सुरक्षित अंतर व वारंवार हात धुणे या सुरक्षा त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सूचित केले आहे.*
Published on : 09-07-2021 15:54:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update