*बालकांना न्युमोकोकल आजारापासून संरक्षणासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश*

न्युमोकोकल आजार हा स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया विषाणूमुळे होणारा आजार असून 5 वर्षाआतील मुलांमधील न्युमोनियाचे हे प्रमुख कारण आहे. एक वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये न्युमोकोकल आजाराचा धोका सर्वाधिक जाणवत असून 2 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपात आढळून येतो. या आजारामुळे लहान मुलांमध्ये होणारे धोके टाळण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात आता न्युमोकोकल कन्ज्युगेट वॅक्सीनचा समावेश करण्यात आला असून शासकीय आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने पीसीव्ही लस देण्याबाबत प्रशिक्षण व इतर तयारी पूर्ण केलेली आहे. शासन आदेशानंतर लगेच बालकांचे स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया विषाणूपासून संरक्षण करणा-या लसीकरणास नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरूवात करण्यात येणार आहे.
146 देशांतील राष्ट्रीय लसीकरण मोहीमेमध्ये पीसीव्ही लसीचा समावेश असून ही लस न्युमोनिया मेनिनजायटीस व स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया विषाणूपासून म्हणजेच न्युमोकोकल आजारापासून लहान मुलांचे संरक्षण करते. न्युमोकोकल न्युमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा संसर्गजन्य आजार असून तो एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीकडे खोकला किवा शिंकेतून पसरतो. खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे ही लक्षणे यात आढळतात. यामुळे फुफ्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. हा आजार गंभीर झाल्यास फीट येणे, बेशुध्द होणे अशी लक्षणे आढळून येतात व त्यामध्ये मृत्यूदेखील संभवतो. त्यामुळे या आजारापासून सुरक्षित ठेवणारी पीसीव्ही लस ही लहान मुलांसाठी संजीवनी आहे.
नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेली लहान मुले, वयस्कर किवा वयोवृध्द व्यक्ती यांना या आजाराचा धोका अधिक असून 5 वर्षाआतील व त्यातही दोन वर्षाआतील बालकांची या आजाराच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कुपोषण आणि स्तनपानाचा अभाव असलेली बालके तसेच एचआयव्ही संसर्गित व किडनीचे आजार असलेली रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेली बालके यांनी या आजाराचा अधिक धोका संभवतो. त्यामुळे पीसीव्ही लस बालकांचे या आजारापासून संरक्षण करणार आहे.
जन्मानंतर सहा आठवड्याच्या म्हणजेच दीड महिन्याच्या बालकास पीसीव्ही लसीचा पहिला डोस दिला जाणार असून 14 आठवडे म्हणजे साडेतीन महिन्याच्या बालकास दुसरा डोस तर नऊ महिन्याच्या बालकास तिसरा बुस्टर डोस दिला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश करणेविषयीचे नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी यांचे शासन स्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले असून महानगरपालिकेचे वेद्यकीय अधिकारी आणि ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ यांचेही प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांनाही प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा आयोजित करून त्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे.
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत न्युमोकोकल आजारापासून बालकांना संरक्षित करणा-या पीसीव्ही लसीकरण करणेविषयी संपूर्ण तयारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली असून शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर मोफत लसीकरणाला त्वरित सुरूवात करण्यात येणार आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पालकांनी आपल्या सहा आठवड्याच्या बाळास या लसीचा पहिला डोस देऊन न्युमोकोकोल आजारापासून संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-07-2021 11:45:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update