*गणेशोत्सव मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन ई सेवा संगणक प्रणालीव्दारे 31 ऑगस्टपर्यंत करावेत अर्ज*
यावर्षी दिनांक 10 ते 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत 'श्रीगणेशोत्सव 2021' साजरा होत असून 07 ते 15 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत 'नवरात्रौत्सव – 2021' साजरा होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव 2021 साजरा करणेबाबत उपसचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरएलपी-0621/प्र.क्र.144/ विशा 1 ब, दिनांक 29 जून 2021 अन्वये शासकीय मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत.
- सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
- कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.
- श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी.
- यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीं ऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
- उत्सवाकरीता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
- सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
- लागू करण्यात आलेले Level of Restriction for Breaking the Chain याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
- आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
- श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
- गणपती मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन इच्छिणा-या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
- श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
- महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
- कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकिय शिक्षण विभाग तसेच संबधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173/2010 संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मंडप उभारणेची परवानगी देण्याची “इ-सेवा संगणक प्रणाली” महापालिकेने विकसीत केली आहे.
सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सवमंडळे व नागरिक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या http:/www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणेकरीता कार्यालयीन वेळेत परवानगी अर्ज करण्याची ऑनलाईन सेवा दि. 16 ऑगस्ट 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.
तसेच नवरात्रौत्सवासाठी सुध्दा याच वेबसाईटवर मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाईन प्रणालीव्दारे दोन्ही उत्सवाच्या 10 दिवस अगोदर परवानगी देणे बंद करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
गणेशोत्सव व नवरात्रौत्सव याकरीता सर्व संबधित विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करु नये तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरु नये आणि परवानगीशिवाय मंडपाची उभारणी सुरु करु नये. महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर निष्कासनाची कार्यवाही केली जाईल याची नोंद घेण्यात यावी. सर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव आणि अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ / नागरिकांनी त्याची दक्षता घ्यावी.
मंडप उभारणी परवानगी अर्ज वरील नमूद कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे http:/www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करण्यात यावेत. तसेच लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नये. उत्सव सुरु होण्याच्या 10 दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारणेसाठी परवानगी दिली जाणार नाही याची नोंद घेऊन सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळानी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 17-08-2021 15:12:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update