सर्वोच्च "वॉटरप्लस" मानांकनाबद्दल अभिनंदनासाठी आयोजित चित्ररथ प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद*
स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण 2021" मध्ये ओडीएफ कॅटेगरीमध्ये ओडीएफ डबल प्लसच्या पुढील सर्वोच्च "वॉटरप्लस मानांकन" नवी मुंबई महानगरपालिकेस जाहीर झाले असून वॉटरप्लस मानांकन संपादन करणारे "नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर" आहे. हे सर्वोच्च मानांकन संपादन करण्यामध्ये नागरिकांच्या सक्रीय सहभागाचा अत्यंत महत्वाचा वाटा असल्याने नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या चित्ररथ प्रदर्शनाला सर्वच ठिकाणी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.*
सीवूड येथील ग्रँड सेंट्रल मॉल समोरून सुरू झालेल्या या चित्ररथ प्रदर्शनाचे सीवूड, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे येथील नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत करीत या अभिनव उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
आकर्षक विद्युत रोषणाई पुष्पमाळांनी सजलेल्या या चित्ररथावर 'वॉटर प्लस' मानांकनाचे प्रतिकचिन्ह शीर्षस्थानावर झळकत होते. त्याखाली नागरिकांचे वॉटर प्लस मानांकनाबद्दल अभिनंदन करणारा फलक लावण्यात आला होता तसेच सर्वोच्च वॉटर प्लस मानांकन मिळविणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे अशा आशयाचा स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर तथा सुप्रसिध्द गायक संगीतकार श्री. शंकर महादेवन यांचे छायाचित्र असलेला मोठा फलक लक्ष वेधून घेत होता.
*या चित्ररथावर आरंभ क्रिएशन्सच्या नृत्य कलावंतांनी स्वच्छता गीतांप्रमाणेच भारतीय लोककला व संस्कृती यावर आधारित नृत्यगीतांचे सीवूड ते कोपरखैरणे इतक्या मोठ्या अंतरभर कलात्मक सादरीकरण करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या संपूर्ण प्रवासात हजारो नवी मुंबई नागरिकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमे-याने हा वॉटरप्लसचा अभिनंदन व आभार सोहळा छायाचित्रे काढत तसेच व्हिडिओ रेकॉर्डींग करीत संस्मरणीय केला. अनेकांची सोशल मिडियावरील वॉल यापुढील काळात या वॉटरप्लसच्या देखण्या सोहळ्याने सजलेली असेल.*
*चित्ररथासोबत स्पेशल इफेक्टव्दारे मार्गाच्या शेजारील इमारतींच्या भिंतींवर वॉटरप्लस मानांकनाबद्दल नागरिकांचे अभिनंदन करणा-या प्रकाशमय इमेजेस देखील आकर्षणाचा केंद्र होते.*
'वॉटरप्लस' हे स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या वाटचालीत ओडीएफ डबल प्लस कॅटेगरीतील सर्वोच्च मानांकन मिळणे व राज्यात हे मानांकन मिळविणारे नवी मुंबई हे एकमेव शहर असणे ही समस्त नवी मुंबई नागरिकांसाठी अत्यंत अभिनंदनीय गोष्ट असून हा आनंदक्षण नवी मुंबई महानगरपालिकेने चित्ररथाच्या माध्यमातून अत्यंत वेगळ्या प्रकारे नागरिकांपर्यंत पोहचत नागरिकांसमवेत साजरा केलेला आहे.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल, सारसोळे नेरूळ कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी, कोपरखैरणे - वाशी मुख्य रस्ता महापे उड्डाणूपूलाजवळील कॉर्नर याठिकाणी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
*'निश्चय केला नंबर पहिला' हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जात असताना नवी मुंबईस लाभलेले सर्वोच्च 'वॉटरप्लस' मानांकन प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासाठी अभिमानाचे असून याचे संपूर्ण श्रेय नागरिकांचे आहे. नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक असतील तर स्वच्छतेमधील कोणतेही मानांकन अशक्य नाही. त्यामुळे चित्ररथासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनेव्दारे नागरिकांचे अभिनंदन व आभार मानण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्याला मिळालेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद समाधान देणारा आहे. तरी यापुढील काळातही नागरिकांनी स्वच्छतेबाबत अधिक जागरूक होऊन आपल्या घरातील ओला, सुका आणि घरगुती घातक कच-याचे घरातच वर्गीकरण करावे आणि महानगरपालिकेच्या घंटागाडीतही हा कचरा वेगवेगळा देण्याची दैनंदिन सवय करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 29-08-2021 15:01:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update