*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाला गती देण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश*
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक त्यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाला साजेसे जागतिक स्तरावर नावाजले जाईल अशा रितीने उभारले जाईल यादृष्टीने आंतराष्ट्रीय पातळीवरील चांगल्या बाबींचा अभ्यास करावा आणि कामाचे योग्य नियोजन करून 30 नोव्हेंबरपर्यंत कामे पूर्ण करावीत व प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण राहील याची काळजी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.*
1 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी स्मारकाच्या पाहणी दौ-यात केलेल्या मौल्यवान सूचनांच्या अनुषंगाने तसेच पाहणीअंती 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी स्मारक नागरिकांसाठी खुले व्हावे असे सूचित केल्याप्रमाणे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकारी, वास्तुविशारद व स्मारकाची विविध कामे करणारे कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेत स्मारकातील कामांचा सर्वांगीण आढावा घेतला. याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, कार्यकारी अभियंता श्री. गिरीश गुमास्ते व संबंधित अधिकारी, वास्तुविशारद, कंत्राटदार उपस्थित होते.
ऐरोली, सेक्टर 15 येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे नवी मुंबई शहराच्या नावलौकीकात आंतरराष्ट्रीय पातळीवर भर घालणारे असून ते तशाच पध्दतीने उभे राहील याची काळजी प्रत्येक संबंधित घटकाने घेणे गरजेचे असल्याचे सूचित करीत आयुक्तांनी सर्व घटकांनी परस्पर समन्वय राखून हे काम आणखी दर्जेदार कसे होईल व विहित वेळेत कसे होईल यादृष्टीने झपाटून अहोरात्र काम करावे असे स्पष्ट केले.
महापालिका अधिका-यांनीही या कामाकडे नेहमीच्या स्थापत्य कामांपेक्षा वेगळ्या दृष्टीने पाहून त्याच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच 30 नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होईल अशाप्रकारे वेळेचे नियोजन करावे असे आयुक्तांनी निर्देश दिले. त्याचप्रमाणे शहर अभियंता यांनी दर आठवड्यातून एकदा स्मारकाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा नियमित अहवाल द्यावा असे आदेशित केले.
स्मारकामधील स्थापत्य कामेही नियोजित वेळेत पूर्ण करावीत आणि विशेषत्वाने अंतर्गत सजावटीच्या कामाकडे अधिक बारकाईने लक्ष द्यावे असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. अंतर्गत भागातील गोष्टीच स्मारकाचे महत्व वाढविणा-या असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून संपूर्ण जीवनचरित्राचा आलेख मांडणारे दुर्मिळ छायाचित्रांचे माहितीपूर्ण दालन अधिक आकर्षक होण्याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. त्याठिकाणी प्रदर्शित छायाचित्राविषयीची त्याखाली लिहिलेली माहिती त्यावरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर प्रदर्शन पाहणा-या व्यक्तीला ऐकूही येईल अशाप्रकारे व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच त्याठिकाणी आभासी वास्तवदर्शी चित्रणाव्दारे (Augmented Reality) बाबासाहेबांचे भाषण दाखविण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना साकारण्यासाठी अधिक शोध घेऊन ती सर्वोत्तम व्हावी याकरिता जागतिक स्तरावरील अशा प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास करावा असेही आयुक्तांनी सूचित केले.
स्मारकातील ग्रंथालय हे ग्रंथ संग्रहाच्या स्वरूपात परिपूर्ण असावेच, त्यासोबत त्याची रचनाही ग्रंथालयाकडे आकर्षून घेणारी व वाचकाचा उत्साह वाढविणारी असावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. स्मारकातील सभागृहदेखील रचनेच्या व सुविधांच्या दृष्टीने अद्ययावत आणि आकर्षक करण्यासाठी नियोजन करण्याचे यावेळी सूचित करण्यात आले. स्मारकामधील विपश्यना केंद्र हा एक महत्वाचा घटक असून त्याची रंगसंगती, रचना तेथे येणा-या व्यक्तीच्या मन:शांतीला पूरक असण्याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या जागतिक किर्तीच्या विद्वान व्यक्तीच्या स्मारक निर्मितीचे काम आपल्याला करायला मिळाले आहे ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असून त्यादृष्टीने हे काम करणारे अधिकारी, कर्मचारी, वास्तुविशारद, कंत्राटदार अशा सर्वांनी येथील प्रत्येक बाब ही सर्वोत्तमच असेल याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 30 नोव्हेबरपर्यंत या स्मारकाचे अंतर्गत काम पूर्ण करण्याची डेडलाईन दिली.
Published on : 07-09-2021 14:52:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update