*ऐरोली व नेरूळ येथील कोव्हीड रूग्णालय रूपांतरण कामांची आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी*
*कोव्हीडच्या दुस-या लाटेत आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची जाणवलेली कमतरता लक्षात घेऊन संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ व ऐरोली या दोन्ही रूग्णालयांमध्ये कोव्हीड उपचारार्थ आयसीयू व व्हेंटिलेटर्सची सक्षम सुविधा निर्मिती करण्यात येत आहे. कोव्हीडच्या तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने वाढविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधा, ऑक्सिजन प्लान्ट व सिलेंडर, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ, औषधे याबाबत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडून नियमित बारकाईने आढावा घेतला जात आहे.
*कालच महापालिका मुख्यालयात तिस-या लाटेच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेतल्यानंतर आज सकाळीच आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स अशा रूग्णालय सुविधांबाबत केलेल्या कामाची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ व राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई उपस्थित होते.*
सद्यस्थितीत सामान्य रूग्णालयाचे कोव्हीड रूग्णालयात रूपांतरण कामाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नेरूळ रूग्णालयात सहाव्या आणि सातव्या तसेच ऐरोली रूग्णालयात चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील काम अंतिम टप्प्यात आहे. येथील कामे तत्परतेने करताना गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारे तडजोड करू नये असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विशेषत्वाने इलेक्ट्रिकल कामे अतिशय काळजीपूर्वक करावीत, त्याठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आगीसारखी दुर्घटना घडण्याचा धोका असतो हे लक्षात घेऊन डोळ्यात तेल घालून कामे करावीत अशा शब्दात आयुक्तांनी आदेश दिले. कोणतेही काम करताना वेळ आणि गुणवत्ता यांचा ताळमेळ राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
*या दोन्ही रूग्णालयांचे रूपांतरण कोव्हीड रूग्णालयात करताना येथील सर्वसाधारण रूग्णांसाठीच्या वैद्यकीय सेवांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची बारकाईने काळजी घेतली जात आहे. त्यादृष्टीने दोन्ही रूग्णालयात सद्यस्थितीत सुरू असलेल्या ओपीडी व आयपीडी सेवा कुठल्याही प्रकारे खंडीत होणार नाहीत याविषयी दोन्ही रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांचेशी सविस्तर चर्चा करून आयुक्तांनी बारकाईने नियोजन केले व तशा प्रकारचे निर्देश वैद्यकीय अधिक्षकांना दिले. या दोन्ही रूग्णालयात वरील दोन मजल्यांची कामे अखेरच्या टप्प्यात असून ती पूर्ण होताच खालील मजल्यांवर सुरू असलेल्या ओपीडी व आयपीडी सेवा त्या मजल्यांवर स्थलांतरित कराव्यात आणि अभियांत्रिकी विभागाने खालील मजल्यांवरील काम तत्परतेने पूर्ण करावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले. हे करीत असतानाच महानगरपालिकेच्या तुर्भे व बेलापूर रूग्णालयांचे सक्षमीकरण करण्याची कामे पूर्ण करावीत असे अभियांत्रिकी विभागास निर्देशित करण्यात आले.*
या दोन्ही रूग्णालयांमध्ये कोव्हीड रूग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशव्दारे व ट्रायेज क्षेत्राची व्यवस्था असेल त्याचीही पाहणी आयुक्तांनी केली व तेथील सुव्यवस्थेच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. याठिकाणी एअर हँडलींग युनीट (एएचयू) बसविण्याचे काम मनुष्यबळ वाढवून एकाचवेळी सर्व युनीट्स बसविण्याची कामे समांतर सुरू ठेवून तत्परतेने पूर्ण करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. एएचयू युनिटच्या रूममधील ॲकॉस्टिकचे काम काळजीपूर्वक करावे, जेणेकरून त्याच्या आवाजाचा त्रास रूग्णांना होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
नमुंमपा वैद्यकीय टास्क फोर्समधील डॉक्टर्स तसेच शहरातील बालरोग तज्ज्ञांशी विचारविनीमय करून दोन्ही रूग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र पेडियाट्रिक वॉर्ड निर्माण करण्यात येत असून त्याची पाहणी करताना त्यामधील अंतर्गत रचनेविषयी आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या. तसेच कोरोनाबाधित गर्भवती व प्रसूती झालेल्या महिलांसाठी असलेल्या विशेष वॉर्डबाबतही सर्व सविधा परिपूर्ण असाव्यात याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
दोन्ही रूग्णालयात उभारण्यात येणा-या ऑक्सीजन टँकच्या जागांची पाहणी आयुक्तांनी केली व ही कामे गतीमानतेने करण्याचे निर्देशित केले. तसेच नेरूळ रूग्णालयात सुरू असलेल्या आरटी-पीसीआर लॅबच्या विस्तारित कामाचीही पाहणी त्यांनी केली.
कोव्हीडच्या तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांच्या वाढीकडे नवी मुंबई महानगरपालिका बारकाईने लक्ष देत असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दोन्ही रूग्णालयांतील कामांच्या प्रत्यक्ष पाहणीव्दारे घेतलेल्या आढाव्यामुळे या कामांना गती लाभणार आहे.
Published on : 14-09-2021 15:12:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update