*लेखाविषयक प्रशिक्षणातून कार्यालयीन कामकाजात अचूकता व गतिमानता*
नवी मुंबई महानगरपालिकेचे कामकाज करताना अधिकारी, कर्मचारीवृंद माहितीदृष्ट्या अद्ययावत असावा यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता प्रशासन विभागामार्फत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने लेखा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता 22 व 23 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांना संबोधित करताना मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड यांनी नवनवीन गोष्टी शिकत राहिल्याने आपले माहिती व ज्ञान अद्ययावत होते तसेच कामकाजातही गतिमानता येते हे ध्यानात घेऊन अत्यंत लक्षपूर्वक प्रशिक्षण घ्यावे असे सूचित केले. त्याचप्रमाणे आजच्या प्रशिक्षणामध्ये लेखाविषयक बाबींचा समावेश असून दैनंदिन कामकाज करताना आपल्याला जाणवणा-या अडचणी विचारून त्याचेही प्रशिक्षकांकडून निराकरण करून घ्यावे असे सांगितले.
राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, वन प्रशिक्षण संस्था, शहापूर यांच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वर्ग 3 च्या लेखा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या आजच्या पहिल्या दिवशी सेवानिवृत्त वरिष्ठ लेखा अधिकारी श्री. जी.टी. महाजन यांनी 'महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981' तसेच 'सेवेच्या सर्वसाधारण शर्ती व सेवा अभिलेख' त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम, शिस्त व अपिल' या विषयांवर 3 सत्रांमध्ये मौलिक मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे उपस्थित प्रशिक्षणार्थी अधिकारी, कर्मचारीवृंदाशी संवाद साधत 'समस्या निराकरण व सर्जनशीलता' या विषयावर संवाद साधला.
उद्या प्रशिक्षणाच्या दुस-या दिवशी पहिल्या सत्रात 35 वर्षाचा प्रशिक्षण अनुभव असलेले यशदाचे प्रशिक्षक श्री. प्रकाश मोहिते हे 'ताणतणाव व्यवस्थापन, संवाद कौशल्य, सरकारी कर्मचारी यांचे व्यक्तिमत्व' या विषयावर व्याख्यान देणार आहेत तसेच त्यानंतरच्या तीन सत्रात सेवानिवृत्त सहा. संचालक श्री.एस.जी.पारधी हे लेखाविषयक विविध बाबींवर व्याख्याने देणार आहेत. ही तीन सत्रे 'खरेदी प्रक्रिया', 'मोजमाप पुस्तिका अभिलेख' तसेच 'वैद्यकीय देयकांची परिपूर्ती' या विषयावर असणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेत विविध विभागांमध्ये लेखाविषयक काम करणारे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या या कार्यालयीन कामकाज प्रशिक्षणाप्रसंगी अत्यंत उत्साहाने उपस्थित होते.
Published on : 22-09-2021 15:58:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update