*जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त इटीसी केंद्रामार्फत विशेष ऑनलाईन कार्यशाळा संपन्न*
सर्व प्रकारच्या दिव्यांगांना एकाच छताखाली सामावून घेणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेलेले आहे. कोव्हीड प्रभावित काळातही दिव्यांगांकरिता ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक विकासात खंड पडणार नाही याची दक्षता केंद्रामार्फत घेण्यात आलेली आहे.
याच अनुषंगाने आजच्या जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार इटीसी केंद्रामार्फत कर्णबधिरत्व जनजागृती मोहिमेअंतर्गत विशेष ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सध्याची कोव्हीड प्रभावित परिस्थिती व सुरक्षा नियमावली पालनाचे बंधन लक्षात घेऊन वेबसंवादाव्दारे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत 95 कर्णबधिर मुले व प्रौढ व्यक्ती तसेच त्यांचे पालक ऑनलाईन सहभागी झाले होते.
यामध्ये इटीसी केंद्रातील वाचा व श्रवण तज्ज्ञ, व्यवसायोपचार तज्ज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ तसेच मानसोपचार तज्ज्ञांनी मौलिक मार्गदर्शन केले तसेच संवाद सत्रात शंकानिरसनही केले. श्रवणशक्ती म्हणजे काय?, श्रवणशक्तीचा -हास होतो म्हणजे काय? त्याचे परिणाम काय होतात?, कर्णबधिरत्वाच्या मूल्यांकनामध्ये वाचा व श्रवण तज्ज्ञांची भूमिका काय ? तसेच श्रवण दोष असणा-या व्यक्तीच्या पुनर्वसनातील तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्व या विषयावर माहिती देण्यात आली तसेच चर्चा करण्यात आली. कर्णबधिर दिनाचे औचित्य साधून कर्णबधिर व्यक्तींना मास्कही वितरित करण्यात येत आहेत.
Published on : 29-09-2021 13:33:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update