*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची कामे गुणवत्ता राखून* *30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश*
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुरु असलेले काम 7 सप्टेंबरच्या बैठकीत यापूर्वीच निर्देशित केल्याप्रमाणे गुणवत्ता राखत 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे आणि हे स्मारक प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब असल्याचे लक्षात घेत ते आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे व्हावे याची प्रत्येक गोष्टीत काळजी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी 1 सप्टेंबर रोजी केलेल्या स्मारकाच्या पाहणी दौ-यात 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी स्मारक नागरिकांसाठी खुले व्हावे असे सूचित केले होते. त्यानुसार आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे या कामावर बारकाईने लक्ष असून यातील कामांचा नियमित आढावा घेतला जात आहे. शहर अभियंता श्री. संजय देसाई, कार्यकारी अभियंता श्री. गिरीश गुमास्ते व संबंधित अधिकारी, वास्तुविशारद आणि स्मारकाची विविध कामे करणारे कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेत आयुक्तांनी स्मारकातील कामांचा सर्वांगीण आढावा घेतला.
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सेक्टर 15 ऐरोली येथे उभारले जात असलेले स्मारक जागतिक दर्जाचे व्हावे या दृष्टीने प्रत्येक बाब त्या गुणवत्तेची असावी याची काटेकोर दक्षता घ्यावी असे अभियांत्रिकी विभागाला निर्देशित करतानाच आयुक्तांनी प्रत्येक कामात सध्या उपलब्ध असलेले सर्वोत्तम तंत्रज्ञान उपयोगात आणावे असे काम करणा-या कंत्राटदारांना आदेश दिले. स्मारकाच्या कामात कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही असाही इशारा आयुक्तांनी याप्रसंगी दिला.*
स्मारकाचा बाह्य भाग ज्याप्रमाणे आकर्षक असेल त्याचप्रमाणे अंतर्भागातही प्रसन्न वाटेल अशाप्रकारे इंटिरियरची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याठिकाणी विविध कार्यक्रमांसाठी असलेले सभागृह उच्चतम साऊंड सिस्टीमसह इतर सुविधांसह परिपूर्ण असावे असेही सूचित करण्यात आले. स्मारकामधील विपश्यना केंद्र अतिशय महत्वाचे असून त्याच्या अंतर्भागात ध्यानासाठी पूर्णत: शांतता राहील याकामाकडे बारकाईने लक्ष देण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
स्मारकात असणा-या ग्रंथालयाचे इंटिरियर व सजावट वेगळेपण जपणारी असावी असे सूचित करतानाच तेथेच बसून वाचनाचीही सोय असणारी अभ्यासिका असावी असेही निर्देशित करण्यात आले. त्याठिकाणी पुस्तक स्वरुपातील ग्रंथसंपदा उपलब्ध असण्याप्रमाणेच सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगाला साजेशी व नव्या पिढीत असणारी ई-बुक वाचनाची आवड लक्षात घेऊन ई-लायब्ररीची सुविधा देखील करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचा आलेख मांडणारे दुर्मिळ छायाचित्रांचे माहितीपूर्ण दालन आकर्षक होण्याच्या दृष्टीने त्याठिकाणी प्रदर्शित छायाचित्रांच्या पॅनलवर लिहिलेली माहिती त्यावरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर प्रदर्शन पाहणा-या व्यक्तीला ऐकूही येईल अशाप्रकारे व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी मागील बैठकीत दिले होते. त्यानुसार तयार केलेल्या एका ध्वनीफितीचे श्रवण करून त्यामध्ये सुधारणेविषयी मौलीक सूचना आयुक्तांनी केल्या. स्मारकातील विशेष दालनात आभासी वास्तवदर्शी चित्रणाव्दारे (Augmented Reality) बाबासाहेबांचे भाषण दाखविण्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेबाबत विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महनीय व्यक्तीचे स्मारक हा प्रत्येक व्यक्तीसाठी जिव्हाळ्याचा विषय असून स्मारकामधील प्रत्येक बाबीकडे त्यादृष्टीने काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्येक कामाची गुणवत्ता राखून 30 नोव्हेंबरपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे आदेशित केले.
Published on : 08-10-2021 10:45:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update