*'मिशन कवच कुंडल' मोहिमेअंतर्गत आज 1570 नागरिकांचे 48 स्पॉटवर घराजवळ लसीकरण*

98 टक्क्याहून अधिक नागरिकांनी कोव्हीड 19 लसीचा पहिला डोस व 51 टक्के नागरिकांनी कोव्हीड 19 लसीचे दोन्ही डोस घेतलेले असून मोठ्या शहरांमधील लसीकरणामध्ये हे सर्वाधिक प्रमाण आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच पहिल्या व दुस-या डोसचे योग्य नियोजन केले असून जास्तीत जास्त नागरिक लस संरक्षित व्हावेत याकरिता 101 लसीकरण केंद्रे सुरु केली आहेत.
याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या 'मिशन कवच कुंडल' मोहिमेअंतर्गत 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत 'लसीकरण आपल्या दारी' ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असून रुग्णवाहिका आणि रूग्णवाहिकेमध्ये रूपांतरित केलेल्या बसेस स्वरूपातील रूग्णवाहिकांव्दारे ठिकठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी काल 11 ऑक्टोबर रोजी 40 स्पॉटवर 1335 नागरिकांचे लसीकरण कऱण्यात आले. या लसीकरणाला लाभलेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी रूग्णवाहिका संख्येत वाढ करणेबाबत दिलेल्या निर्देशानुसार आज 12 ऑक्टोबर रोजी 2 रूग्णवाहिकांची वाढ करण्यात आली. त्या अनुषंगाने 12 रूग्णवाहिकांव्दारे 48 स्पॉटवर आज 1570 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
यामध्ये सीबीडी नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 70, नेरूळ 1 च्या क्षेत्रात 190, शिरवणे क्षेत्रात 90, इंदिरानगर क्षेत्रात 80 तुर्भे क्षेत्रात 120, घणसोली क्षेत्रात 90, महापे क्षेत्रात 160 खैरणे क्षेत्रात 300, पावणे क्षेत्रात 130, ऐरोली क्षेत्रात 150, चिंचपाडा क्षेत्रात 100 व सेक्टर 48 नेरूळ क्षेत्रात 90 अशाप्रकारे 12 रुग्णवाहिकांव्दारे 48 स्पॉटवर एकूण 1570 नागरिकांचे कोव्हीड 19 लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन रूग्णवाहिकांमध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेले आहेत.
*आधारकार्ड नसलेल्या नागरिकांसाठी 2 रुग्णालयात विशेष कोव्हीड लसीकरण सत्र*
याशिवाय ज्या नागरिकांकडे आधारकार्ड उपलब्ध नाही असे नागरिक लसीकरणापासून वंचीत राहू नयेत याकरिता 9 तारखेप्रमाणेच आज पुन्हा एकदा ऐरोली व नेरुळ रुग्णालयात लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे आधार कार्ड नसलेल्या 20 आणि राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोली येथे 06 अशा एकूण आधारकार्ड नसलेल्या 26 नागरिकांनी लसीकरण सत्राचा लाभ घेतला.
*बेघर व निराधार नागरिकांच्या दुस-या डोससाठी विशेष कोव्हीड लसीकरण सत्राचे आयोजन*
कोणताही प्रमाणपत्र वा दाखला नसलेल्या बेघर, निराधार व्यक्तींचे लसीकरण करणारी नवी मुंबई ही पहिला महानगरपालिका होती. या नागरिकांचा पहिला डोस झाल्यानंतर विहीत कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना दुसरा डोस देण्यासाठी विशेष लसीकऱण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आज बेलापूर व नेरुळ विभागातील बेघर व निराधार नागरिकांना दुस-या डोस देण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. समाज विकास विभागाच्या कर्मचा-यांच्या सहयोगाने हे विशेष लसीकरण सत्र संपन्न झाले. अशाचप्रकारे 13 तारखेला वाशी व तुर्भे, 14 तारखेला कोपरखैरणे व घणसोली तसेच 16 तारखेला ऐरोली व दिघा या विभागांमध्ये निराधार व बेघर नागरिकांसाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांचे जलद लसीकरण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध माध्यमांतून सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनी त्वरित कोव्हीड लसीकरण करून घेऊन संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-10-2021 16:18:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update