*कोव्हीड नियमांच्या उल्लंघनापोटी सीवूड ग्रॅड सेंट्रल मॉलवर 50 हजाराची दंडात्मक कारवाई*

ओमायक्रॉन या व्हॅरियंटचे रुग्ण मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरात आढळलेले असून या पार्श्वभूमीवर त्वरीत खबरदारी घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी टेस्टींगच्या प्रमाणात वाढ करण्याप्रमाणेच लवकरात लवकर नागरिक दोन्ही डोस घेऊन लस संरक्षित होण्याकडे विशेष लक्ष देण्याचे व त्यादृष्टीने लसीकरणाच्या गतीमान कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यासोबतच कोरोनापासून बचावासाठी मास्क हीच महत्वाची संरक्षक ढाल आहे यादृष्टीने मास्कचा नागरिकांनी अनिवार्यपणे वापर करावा याकरिता जागरुकता निर्माण केली जात आहे. 'मास्क व लसीकरण नाही तर प्रवेश नाही' अशा प्रकारची मोहिीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेची विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथके व मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथके अधिक सक्षमतेने कार्यरत करण्यात आलेली आहेत.
*या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकाला ग्रॅड सेंट्रल मॉल सीवूड नेरुळ याठिकाणी मास्क परिधान न केलेला मॉल कर्मचारी आढळला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे दोन्ही डोस पूर्ण झाले नाहीत असे निदर्शनास आले. साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये आस्थापनांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांचे संपूर्ण कोव्हीड लसीकरण म्हणजेच कोव्हीड लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे असून सदर नियमांचा भंग केल्याप्रकरणी ग्रॅड सेंट्रल मॉल सीवूड नेरुळ व्यवस्थापनाकडून रु.50 हजार रक्कमेचा दंड वसूल कऱण्यात आलेला आहे.*
कोव्हीडचा धोका अजून टळलेला नाही तसेच इतर देशांमधील ओमायक्रॉ़न व्हॅरियंटच्या प्रसाराची व्याप्ती लक्षात घेता नागरिकांनी गांभीर्यपूर्वक स्वत:च्या व इतरांच्या आरोग्य जपणूकीसाठी मास्कचा वापर नियमित करणे गरजेचे आहे. मास्कचा वापर न करता सामाजिक आरोग्याला धोका पोहचवणा-या नागरिक व आस्थापनांविरोधात दंडात्मक कारवाई करणे समज मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असून यापुढील काळात नागरिकांच्या हितासाठी अशा प्रकारच्या दंडात्मक कारवाया करणे गरजेचे आहे. तरी नागरिकांनी मास्कचा वापर न केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची कटू वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-12-2021 07:26:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update