*कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोव्हीड सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्याचे आयुक्तांचे निर्देश*

*मागील आठवड्याभरापासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत असून 26 डिसेंबर रोजी 64 असलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये दि.27 डिसेंबर रोजी 72, दि.28 डिसेंबर रोजी 83 व त्यानंतर 29 डिसेंबर रोजी 165, 30 डिसेंबर रोजी 266, 31 डिसेंबर रोजी 265, 01 जानेवारी रोजी 322 तर 2 जानेवारी रोजी 523 अशी मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे.*
*या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शनिवार दि. 01 जानेवारी रोजीच तातडीने बैठक घेत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना बाधीतांची संख्या कमी झाल्याने बंद केलेली कोव्हीड केंद्रे एक-एक करून तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिलेले आहेत.*
*सद्यस्थितीत कोरोना बाधीत रुग्णांवर सेक्टर 30 वाशी येथील सिडको कोव्हीड सेंटरमध्ये उपचार केले जात असून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोमवार 03 जानेवारीपासून तुर्भे सेक्टर 24 येथील 349 ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे राधास्वामी कोव्हीड केअर हेल्थ सेंटर व तुर्भे एपीएमसी मार्केट येथील 312 ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे एक्पोर्ट हाऊस कोव्हीड केअर हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. तसेच 560 ऑक्सिजन बेड्स क्षमतेची सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील कोव्हीड केअर हेल्थ सेंटर सुविधा 04 जानेवारीपासून सुरु करण्याचे निर्देशित करण्यात आले.*
त्याचप्रमाणे सौम्य लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या कोरोना बाधीतांच्या विलगीकरणासाठी यापुर्वी दुस-या लाटेत कार्यान्वित असलेली सर्व कोव्हीड केअर सेंटर्स टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे असे सूचित करण्यात आलेले आहे. याशिवाय खारघर येथील पोळ फाऊंडेशनचे कोव्हीड सेंटर मध्ये रुपांतरीत करण्यात आलेले रुग्णालय कार्यान्वित करण्याची पूर्ण तयारी करणयाचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.
कोव्हीड सेंटर्स सुरु करताना त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी तातड़ीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत याकरिता वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित करावा व मागील तात्पुरत्या स्वरुपाच्या भरतीच्या वेळी प्रतिक्षा यादीवर असणा-या उमेदवारांना पाचारण करावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय रुग्णसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेऊन आवश्यक औषध पुरवठाही तातडीने उपलब्ध करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
कोव्हीडच्या दुस-या लाटेमध्ये जाणवलेली ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने प्रतिदिन 2 टन क्षमतेचे 4 पीएसए ऑक्सिजन प्लान्ट वाशी सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली रुग्णालय, बेलापूर माता बाल रुग्णालय व सिडको कोव्हीड सेंटर येथे उभारले आहेत. याशिवाय महानगरपालिकेकडे 200 ड्युरा सिलेंडर आहेत. त्याचप्रमाणे एकूण 93 केएल क्षमतेचे (103 मेट्रीक टन) 5 लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टॅंक उभारण्यात आलेले आहेत. हे ऑक्सिजन टँक भरून ठेवावेत असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. तसेच कोव्हीड केअर सेंटर्समध्येही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सिडको कोव्हीड सेंटरमध्ये मुलांसाठी विशेष कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देशीत कऱण्यात आले तसेच आवश्यकता भासल्यास राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे निर्माण करण्यात आलेला मुलांसाठीचा विशेष कक्ष सुरु करण्यासाठी तयारीत राहण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.
ओमायक्रॉन व्हेरियंट संशयीत रुग्णांना सिडको कोव्हीड सेंटरमध्ये उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास त्यामध्ये वाढ करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉल सेंटरव्दारे नियमितपणे कोरोना बाधीतांना संपर्क साधला जात असून कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता कॉल सेंटर अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. वॉररुम मार्फत बेड्स उपलब्धता व रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी दुस-या लाटेत अडचणीच्या स्थितीतही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदत झाली. हीच भूमिका कायम ठेवत वॉररुमही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आदेश आयुक्तांनी याप्रसंगी दिले.
*सध्याची कोरोना बाधीतांची वाढती संख्या व ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन कोरोनाचा विषाणू आहे तिथेच रोखण्यासाठी टेस्टींगमध्ये वाढ करा व लसीकरण कार्यवाहीतही अधिक गतीमानता व व्यापकता आणण्याचे निर्देशित करीत कोव्हीडमध्ये कामाचे प्राधान्य लक्षात घेऊन आजचे काम आजच करा असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.*
Published on : 04-01-2022 06:39:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update