*ऐरोली ते काटई नाका रस्त्याचा उपयोग नवी मुंबईकर नागरिकांना पूर्ण क्षमतेने होण्यासाठी* *आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्यामार्फत एमएमआरडीए व महापालिका अधिका-यांच्या संयुक्त बैठकीत नियोजन*

*मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळ (MMRDA) यांच्या मार्फत बांधण्यात येणा-या ऐरोली ते काटई नाका या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामामध्ये येणा-या अडचणी दूर करण्यासाठी व नियोजनामध्ये अतिरिक्त सुविधा समाविष्ट करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यामार्फत महानगरपालिका व एमएमआरडीए यांच्या संबंधित अधिका-यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.*
या बैठकीत एमएमआरडीएचे मुख्य अभियंता श्री. प्रकाश भांगरे, महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. संजय देसाई, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता श्री. विनय सुर्वे व श्री. गुरुदत्त राठोड, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. संजय खताळ तसेच प्रकल्प सल्लागार आकार अभिनव कन्सल्टन्ट चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अमोल खेर, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. दिपक शेंडे व महाव्यवस्थापक श्री. किशोर कोटकर उपस्थित होते.
नवी मुंबईतील घणसोली, रबाळे, ऐऱोली, दिघा परिसरातील वाहन चालकांना कल्याण - डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी प्रामुख्याने शिळफाटा - महापे मार्गाने वळण घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतून कल्याण - डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करताना घ्यावा लागणारा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी ऐरोली - काटई नाका अशा उन्नत आणि भूमिगत मार्गाची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे.
सदर रस्त्याचे काम गतीमानतेने सुरु असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे बेलापूर मार्गावर सेक्टर 3 ऐरोली येथील महानगरपालिकेकडे हस्तांतरीत असलेल्या जागांमधील सदर प्रकल्पासाठी एमएमआरडीएला आवश्यक असणा-या जागा उपलब्ध करून देणेबाबत या बैठकीत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सेक्टर 3 ऐरोली येथील उद्यानाचा काही भाग, अग्निशमन केंद्र परिसराचा काही भाग तसेच ऐरोली बस डेपोचा काही भाग उपलब्ध करून देण्यास व काम झाल्यानंतर तो पूर्ववत करण्याचे एमएमआरडीए मार्फत मान्य करण्यात आले.
*नवी मुंबईकर नागरिकांना या पूलाचा वापर करता यावा याकरिता ठाणे बेलापूर रोडवरून कल्याण - डोंबिवलीकडे जाण्यासाठी व कल्याण डोंबिवलीकडून ठाणे बेलापूर रोडवरून नवी मुंबईत उतरण्यासाठी एमएमआरडीएच्या नियोजनात मार्गिका उपलब्ध आहेत. यामध्ये ठाणे बेलापूर रोडवरून मुलुंडमार्गे मुंबईत जाण्यासाठी व मुलुंडकडून ठाणे बेलापूर रोडवर नवी मुंबईत येण्यासाठी आवश्यक असलेली मार्गिका एमएमआरडीए मार्फत नवीन नियोजनात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या कार्यवाहीची कालमर्यादा निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
*या मार्गिकांची तांत्रिक व्यवहार्यता तपासून 15 जानेवारीपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आयुक्तांमार्फत प्रकल्प सल्लागार यांना सूचित करण्यात आले तसेच याविषयी पुन्हा 18 जानेवारी रोजी एमएमआरडीए अधिका-यांसोबत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित करण्याकरिता एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी यांचे स्तरावर बैठक आयोजनाबाबत विनंती करण्यात येणार आहे.
*तसेच ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतुक विनाअडथळा व्हावी याकरिता भविष्यात भारत बिजली जंक्शन जवळ उन्नत मार्गावर उड्डाणपूल बांधण्यातील अडचणी तपासणे व तांत्रिक अहवाल तपासणी करणेविषयी प्रकल्प सल्लागार यांना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत सूचित करण्यात आले.
*ऐरोली ते मुंब्रा दरम्यान पारसिक डोंगराखालून जाणारा भुयारी मार्ग आणि उन्नत मार्गाचे काम गतीमानतेने सुरु असून या मार्गाचा उपयोग ठाणे बेलापूर रोडवरून मुंबईकडे व कल्याण - डोंबिवलीकडे येण्या-जाण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांना पूर्ण क्षमतेने व्हावा या भूमिकेतून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी एमएमआरडीए व महापालिकेच्या संबंधित अधिका-यांची संयुक्त बैठक आयोजित करून या कामाला गतीमानता दिली आहे.*
Published on : 05-01-2022 10:15:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update