*डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातून वाचन संस्कृतीच्या विकासासाठी उत्तम काम - श्री. गिरीश कुबेर*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याइतका ग्रंथप्रेमी माणूस दुसरा नाही. त्यामुळे वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेकडून स्मारकातील ग्रंथालयाच्या रुपाने उत्तम काम घड्ते आहे याचा ग्रंथप्रेमी म्हणून अतिशय आनंद वाटतो असे सांगत दै. लोकसत्ताचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी प्रबोधनात्मक विचारांची परंपरा ही व्याख्यानमाला जपते आहे याबद्दल कौतुक केले.
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून "जागर 2022" या अभिनव उपक्रमांतर्गत विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दै. लोकसत्ताचे संपादक तथा नामांकित विचारवंत, साहित्यिक श्री. गिरीश कुबेर यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अर्थतज्ज्ञ" या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान देत अनेक क्षेत्रांप्रमाणे अर्थशास्त्राच्या क्षेत्रातही बाबासाहेबांनी केलेल्या उत्तुंग कार्याचा आढावा घेतला.
अर्थशास्त्रासारखा अत्यंत क्लिष्ट विषय अतिशय सोप्या भाषेत मांडत श्री. गिरीश कुबेर यांनी "अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ असल्या तरच तुमचा विकास होऊ शकतो", या बाबासाहेबांच्या विचारांच्या अनुषंगाने व्याख्यानाची मांडणी करत 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा बाबासाहेबांचा ग्रंथ अभ्यासपूर्वक वाचावा असे सांगितले.
कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांनी 3 वर्षात 29 अभ्यासक्रम पूर्ण केले, यावरून त्यांच्या अफाट बुध्दीमत्तेची झेप लक्षात येते असा सन्मान करीत श्री. गिरीश कुबेर यांनी युरोपातील नामांकीत अर्थतज्ज्ञ प्रा. जॉन केन्स यांच्यासह अर्थशास्त्रातील अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांच्या अर्थविषयक विचारांचा सन्मान केला आहे असे ते जातीवंत अर्थशास्त्री होते असे सांगितले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संस्थेच्या निर्मितीमागे बाबासाहेबांचे विचारसूत्र होते अशी माहिती देत श्री. गिरीश कुबेर यांनी सर्व स्तरांतील लोकांना सहज कळेल अशी अर्थशास्त्राची मांडणी हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य होते असा विशेष उल्लेख केला. बाबासाहेबांचे भाषासौष्ठव, तर्कसंगतता, मूल्यांची मांडणी हे सारे लक्षणीय होते असे अनेक उदाहरणे देत त्यांनी स्पष्ट केले.
बाबासाहेबांचे त्या काळात मांडलेले विचार आजही कालसुसंगत वाटतात हे त्यांच्या दूरदृष्टीचे व अफाट विद्वत्तेचे दर्शन घडविणारे असून त्यांनी आपल्या कृषिप्रधान देशातील शेतीचा अर्थकारणाच्या अनुषंगाने केलेला विचार व त्यावर सूचविलेले उपाय त्याचप्रमाणे स्त्रियांचे अधिकार, कामगारांचे हक्क याविषयी मांडलेली धोरणे ही देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारी असल्याचे सिध्द झाले आहे हे श्री. गिरीश कुबेर यांनी विविध दाखले देत मांडले. बाबासाहेबांच्या 28 फेब्रुवारी 1920 मध्ये लिहिलेल्या लेखातील उतारा उधृत करीत स्वच्छ आणि थेट मुद्दे मांडणे ही बाबासाहेबांची शैली विलक्षण होती असे त्यांनी सांगितले.
कोणते पुस्तक कुठे ठेवले आहे व कोणते वाक्य कोणत्या पुस्तकाच्या कितव्या पानावर आहे - हे पटकन सांगण्याइतकी बाबासाहेबांची स्मरणशक्ती अफाट होती अशी माहिती देत श्री. गिरीश कुबेर यांनी भावना व विचार यामध्ये विचारांचे महत्व अधोरेखीत केले. वर्तमान पिढी विचारांना व बुध्दीला महत्व देणारी असल्याचे सांगत आपली युवा पिढी देशात थांबायला तयार नाही हे आपल्या समोरचे आज मोठे आव्हान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यामागे बुध्दीचा आदर होत नाही हे प्रमुख कारण दिसत असल्याचे सांगत यादृष्टीने चिंतन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
अनेक माणसे उभे आयुष्य खर्ची घालून एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवितात. मात्र एकाच जीवनात विविध क्षेत्रांमध्ये महनीय काम करणारे बाबासाहेबांसारखे व्यक्तिमत्व अद्भूत असल्याचे मत व्यक्त करीत श्री. गिरीश कुबेर यांनी बाबासाहेबांच्या विचारांना महत्व देऊन त्यादृष्टीने स्मारकाची रचना करणारा नवी मुंबई महानगरपालिकेचा दृष्टीकोन प्रशंसनीय असल्याचे सांगितले.
"जागर 2022" उपक्रमांतर्गत बाबासाहेबांची जयंती आगळ्या वेगळ्या पध्दतीने विविध विचारांचे आदान-प्रदान करणारी व्हावी ही भूमिका जपत नवी मुंबई महानगरपालिकेने 30 मार्चपासून स्मारकामध्ये व्याख्यानांचे आयोजन केले आहे. प्रतिदिनी होणा-या व्याख्यानांना उदंड प्रतिसाद मिळत असून आज सुप्रसिध्द लेखक श्री. अरविंद जगताप यांचे 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 10 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रसिध्द साहित्यिक व्याख्याते श्री. हरी नरके यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून महात्मा फुले यांची विचारक्रांती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारांचा जागर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 07-04-2022 11:00:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update