*कोव्हीड काळात केलेल्या समर्पित कामाबद्दल नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा "कोव्हीड योध्दा सन्मान"*
कोव्हीड विरोधात आपण लढाई लढलो त्यामुळे कोव्हीड योध्दा असे म्हटले जाते. या काळात प्रत्येक घटकाने अत्यंत जबाबदारीने व झोकून देऊन काम केले, त्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोव्हीड योध्दा सन्मान करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या विशेष समारंभात महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी समुहांचा कोव्हीड प्रभावित काळात केलेल्या समर्पित कामाबद्दल कोव्हीड योध्दा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांप्रमाणेच या लढ्यात सेवाभावी वृत्तीने वेगवेगळ्या प्रकारचे मदतकार्य करणा-या सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे अशा विविध घटकांचे महत्वाचे योगदान असल्याचा उल्लेख करीत त्यांचेही कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, नमुंमपा कोव्हीड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गिरीश राजाध्यक्ष, नमुंमपा कोव्हीड पिडीयाट्रिक टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. विजय येवले तसेच टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गजानन वेल्हाळ, डॉ. उदय जाधव, डॉ. उपेंद्र किंजवडेकर, डॉ. अक्षय छल्लानी, डॉ. अजय कुकरेजा, डॉ. जेस्सी एलिजाबेथ आणि पिडीयाट्रिक टास्क फोर्सचे सदस्य डॉ. जितेंद्र गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कामाची दखल घेण्यासाठी आपण काम करीत नसलो तरी केलेल्या चांगल्या कामाची पावती दिली गेली पाहिजे. यामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. कोव्हीड काळात सर्वांनी सांघिक भावनेने काम केले त्यामुळे कोव्हीड योध्दा सन्मान करतानाही तो समुहांचा करण्यात येत असल्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले. ट्रेसींग, टेस्टींग आणि ट्रिटमेंट या तिन्ही गोष्टींकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिल्याने व सर्वांशी विचारविनिमय करून त्यानुसार कार्यवाहीचे नियोजन केल्यामुळे नवी मुंबईतील कोव्हीड परिस्थिती कायम नियंत्रणात राहिली असे सांगत त्यांनी यामध्ये टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन महत्वाचे ठरल्याचे मत व्यक्त केले.
कोव्हीड प्रसाराला जलद आळा घालण्यासाठी टेस्टींगवर विशेष भर देण्यात आला. त्यादृष्टीने स्वत:ची आरटी-पीसीआर लॅब सुरु करण्यात आली. लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळे पहिल्या डोसचे व दोन्ही डोसचे लसीकरण 100 टक्के पूर्ण करणारी नवी मुंबई राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली. सिडको कोव्हीड सेंटरप्रमाणेच इतर कोव्हीड सेंटरमधील सुविधांबद्दलही नागरिकांकडून तसेच शासन पातळीवरून प्रशंसा कऱण्यात आली. एखाद्या नागरिकाकडून कोणतीही सूचना आली तर त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यावर भर देण्यात आला. या प्रतिसाद कालावधीबद्दलही (Response Time) समाधान व्यक्त करण्यात आले असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर म्हणाले.
कोव्हीडच्या दुस-या लाटेत व्हेंटिलेटर्स उपलब्धता, ऑक्सिजन पुरवठा याबाबतची हतबलता अनुभवली. त्यामुळे शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार तिस-या लाटेची पूर्वतयारी करताना महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधा सक्षमीकरण करण्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले. कोव्हीड कालावधीत नाही हा शब्द नव्हता. त्यातही वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचा-यांनी ज्या समर्पित भावनेने काम केले त्याचा कृतज्ञतापूर्वक विशेष उल्लेख आयुक्तांनी केला.
नवी मुंबई महानगरपालिकेची कार्यसंस्कृती सर्वसाधारण शासकीय कार्यालयांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे कोव्हीड काळात नवी मुंबईत काम करता आले याबद्दल समाधान व्यक्त करीत आयुक्तांनी कोव्हीड विरोधातील लढाईत ज्या समरसतेने सर्वांनी काम केले ते प्रशंसेस पात्र असल्याचे सांगितले. जोपर्यंत कोव्हीड महामारी संपली असे जाहीर होत नाही तोपर्यंत सतर्क राहण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. यापुढील काळात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याची बांधीलकी जपत आपल्या रुग्णालयात येणा-या रुग्णाला इतर रुग्णालयात संदर्भित न करता त्याच्यावर आपल्याच रुग्णालयात उपचार केले गेले पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.
नमुंमपा कोव्हीड टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा नायर हॉस्पिटलचे औषध विभाग प्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष यांनी आहार, विहार आणि विचार या तीन गोष्टी निरामय आरोग्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली कोव्हीड काळात केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला. टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनांचा आदर करून, त्यामध्ये तत्कालीन स्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेण्याच काम आयुक्तांनी केल्यामुळे व स्वत: सर्वांसोबत काम करून सांघिक भावना निर्माण केल्यामुळेच नवी मुंबईतील कोव्हीड स्थिती नियंत्रणात राहिली असे त्यांनी नमूद केले.
नमुंमपा कोव्हीड टास्क फोर्सचे सदस्य तथा भारतीय बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी कोव्हीड काळात आयुक्तांनी तत्परतेने व धडाडीने योग्य निर्णय घेतल्यामुळेच नवी मुंबईत कोव्हीड प्रतिबंधात, टेस्टींगमध्ये व लसीकरणामध्ये आघाडीवर राहिली असे सांगितले. स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध विषद करीत त्यांनी नवी मुंबईसारख्या स्वच्छ आणि सुंदर शहराच्या निर्मितीत कोव्हीड काळातही खंड पडू दिला नाही याबद्दल विशेष कौतुक केले. जबाबदार नागरिक म्हणून आपण ओला व सुका कचरा वेगवेगळा केला, प्लास्टिकचा वापर प्रतिबंधित केला तसेच वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला तर यावर्षीचे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य दिनानिमित्त जाहीर केलेले घोषवाक्य "आपला ग्रह (पृथ्वी) - आपले आरोग्य" सार्थकी लागेल असे ते म्हणाले.
प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनी महानगरपालिकेच्या वर्धापनदिनी संपूर्ण नियोजन केलेला कोव्हीड योध्दा सन्मान कार्यक्रम त्यावेळी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीत उपस्थिती मर्यादा जाहीर झाल्यामुळे होऊ शकला नाही, मात्र जागतिक आरोग्य दिनी तो योग जुळून आला असल्याचे सांगितले. कोव्हीड काळात आरोग्य सेवा पुरविताना आयुक्तांनी ज्या पध्दतीने दररोज वेब संवादाव्दारे सर्वांशी चर्चा करत, मार्गदर्शन करत तत्परतेने निर्णय घेतले. त्यामुळे योग्य प्रकारे काम होऊ शकले व आपल्यासोबत स्वत: आयुक्त काम करत आहेत या भावनेने काम करण्याला अधिक बळ मिळाले असे सांगितले.
याप्रसंगी 23 नागरी आरोग्य केंद्रे, 4 रुग्णालये, मुख्यालय, आरटी-पीसीआर टेस्टींग लॅब, ॲन्टिजन टेस्टींग, कोव्हीड लसीकरण, डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड केअर सेंटर, खाजगी कोव्हीड रुग्णालये, कोव्हीड वॉर रुम, ऑक्सिजन वॉक रुम, विशेष दक्षता पथके, विभाग कार्यालये व माहिती तंत्रज्ञान समुह अशा विविध विभागांचा कोव्हीड योध्दा सन्मान स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रे प्रदान करून कऱण्यात आला. या प्रत्येक समुहांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना विशेष महत्व देण्यात आले. कोव्हीड काळात अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामाची विशेष दखल घेत आयुक्तांनी जागतिक आरोग्य दिनासारख्या महत्वाच्या दिवशी केलेल्या सन्मानाबद्दल टास्क फोर्ससह सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
Published on : 08-04-2022 14:02:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update