*राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत निवड झालेल्या नमुंमपा शाळांतील विद्यार्थिनींचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार*
11 ते 19 मे 2022 रोजी नाशिक येथे होणा-या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये
ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सेक्टर 14 ऐरोली येथील नमुंमपा माध्यमिक विद्यालय 103 ची विद्यार्थिनी शिवानी रामप्रसाद जयस्वाल तसेच नमुंमपा छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय शाळा क्र. 104, रबाळे ची विद्यार्थिनी काजल लखंदर सरोज या दोन विद्यार्थीनींची निवड ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या निवड चाचणीसाठी झाली असल्याने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जानेवारी महिन्यात झालेली 17 वर्षाखालील अशियाई महिला फुटबॉल स्पर्धा व आगामी काळात होणारी फिफा फुटबॉल स्पर्धा यांचे औचित्य साधून महानगरपालिका क्षेत्रात फुटबॉल खेळाचा प्रसार करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक व प्राथमिक शाळांतील खेळाडूंची निवड करण्यात आली. परिमंडळ 1 व परिमंडळ 2 अशा दोन विभागांतून एकूण 10 संघांची निवड करण्यात आली आणि या संघांमध्ये यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगण, नेरुळ येथे नवी मुंबई महानगरपालिका फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले.
या लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या 40 खेळाडूंची निवड करण्यात येऊन त्यांना सेंट्रल पार्क, घणसोली येथे तंत्रशुध्द पध्दतीने ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या दहा दिवसीय प्रशिक्षणातून उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये शिवानी रामप्रसाद जयस्वाल आणि काजल लखंदर सरोज दोन खेळाडूंची ठाणे जिल्हा संघाच्या निवड चाचणीसाठी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करण्याकरिता निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल महानगरपालिका शाळेतील या दोन विद्यार्थिनींचा भेटवस्तू व क्रीडा गणवेश देऊन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सन्मान केला व त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे महानगरपालिकेचे क्रीडा शिक्षक श्री. प्रदिप मस्तुद व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. मारुती गवळी यांचाही आयुक्तांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. जयदीप पवार, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे व श्री. रेवप्पा गुरव उपस्थित होते.
Published on : 11-05-2022 11:30:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update