*राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रम तसेच डास उत्पत्ती शोध मोहीमेचे आयोजन*

डेंग्यू आजाराविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या अनुषंगाने “राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे” औचित्य साधून डेंग्यू विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
डेंग्यू दिनानिमित्त डेंग्यूचे संक्रमण रोखण्यासाठी आणि प्रसार हंगामापूर्वी डेंग्यूच्या प्रतिबंधात्मक उपयायोजनांबाबत सामुहिक जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन डेंग्यू प्रतिबंधात्मक उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त “डेंग्यू टाळता येऊ शकतो, चला आपण एकत्र येऊ, डेंग्यूवर मात करू” हे ध्येय नजरेसमोर ठेवून विविध उपक्रम आखण्यात आलेले आहेत.
राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नेरुळ गावं येथील बांचोली मैदान ते कुकशेत येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत लेझीम खेळत जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहर हिवताप अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुकशेतचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय यमगर तसेच नमुंमपा अंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य सहाय्यक व सर्व बहुउद्देशीय आरोग्य सेवक व डासअळी नाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कामगार यांनी सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे सेक्टर 14 येथे डेंग्यू विषयक पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुकशेत व नेरुळ 2 यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 11876 घरांना भेटी देऊन 25142 घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने तपासण्यात आली. त्यामध्ये 37 स्थाने दूषित आढळून आली व ती नष्ट करण्यात आली.
तरी नागरिकांनी घरांतर्गत डास उत्पत्ती टाळण्यासाठी तसेच डेंग्यूसारखे किटकजन्य आजार होऊ नयेत म्हणून आपल्या गच्चीवर, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, उघडयावरील टायर्स पडलेले असतील तर ते तातडीने नष्ट करावेत, फुलदाण्या ट्रे, फेंगशुई मध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलावे, घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम, टाक्या, भांडी आठवडयातून एकदा पाणी काढून पूर्णपणे कोरडी करावीत, शक्यतो डास प्रतिबंधात्मक मच्छरदानीचा वापर करावा आणि महत्वाचे म्हणजे आपले घर, कार्यालय, परिसर येथे पाणी साचू देऊ नका असे सूचित करण्यात येत आहे.
डासांची निर्मिती होऊ नये याकरिता घर व परिसरात कुठेही पाणी साचू न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यादृष्टीने डास उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांचे संपूर्ण सहकार्य अपेक्षित असून डास उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी अथवा रासायनिक फवारणीसाठी आपल्या घरी, सोसायटी - वसाहतीत येणा-या महापालिका कर्मचा-यांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 17-05-2022 15:07:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update