*महापालिका मुख्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम संपन्न*
व्यसनांमुळे माणसांची व्यक्तीगत तसेच मोठ्या प्रमाणावर सामाजिक हानी होत असून व्यसनांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. या दृष्टीने महाराष्ट्र शासनामार्फत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असून यामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, अन्वय तसेच किंन्नर मां संस्था अशा स्वयंसेवी संस्थांचे मिळणारे सहकार्य मोलाचे असून यामधून समाजातील व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी होईल असा विश्वास नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. जयदीप पवार यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 31 मे रोजीचा जागतिक तंबाखू सेवन वर्ज्य दिन तसेच 5 जून रोजीचा जागतिक पर्यावरण दिन याचे औचित्य साधून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात “तंबाखूच्या व्यसनाने पर्यावरणावर होणारे परिणाम” या विषयावरील जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतूरकर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, विधी अधिकारी श्री. अभय जाधव, अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. अजित मगदूम, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वाशी केंद्र संचालक श्रीम. शुभांगी दिदी, नशाबंदी मंडळाच्या संघटक श्रीम. प्रियांका सवाखंडे, स्त्री मुक्ती संघटनेच्या संचालक प्रा. वृषाली मगदूम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
तंबाखु व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे प्रतिवर्षी भारतात 13 लाख लोक मृत्यूमुखी पडत असून जागतिक आरोग्य संघटनेने हे असेच चालू राहिले तर 2030 पर्यंत जगातील साधारणत: 100 कोटी लोक तंबाखूपासून होणा-या विविध रोगांमुळे मृत्यूमुखी पडतील असे सांगितले आहे. त्यामुळे तंबाखू जरी स्वस्त असली तरी त्यामुळे होणा-या रोगांवरील उपचार मात्र अतिशय महागडे व प्रसंगी जीवघेणे असून प्रत्येकाने आपल्या संपर्कातील व्यक्तींनी या व्यसनांपासून दूर रहावे यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मत अन्वयचे प्रमुख डॉ. अजित मगदूम यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी व्यसनांचे दुष्परिणाम दाखविणारे पथनाट्य प्रभावीरितीने सादर केले. प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. जयदीप पवार यांच्या समवेत उपस्थितांनी तंबाखूमुक्ती व व्यसनमुक्तीची सामुहिक शपथ ग्रहण केली.
Published on : 09-06-2022 08:21:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update