*प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्यांबाबत 3 जुलै पर्यंत नागरिक दाखल करू शकतात हरकती व सूचना*

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करीता 41 प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्या असून यामध्ये नागरिकांच्या काही तकारी / सूचना असल्यास त्या दाखल करण्याकरिता 3 जुलै 2022 पर्यंतचा कालावधी जाहीर करण्यात आलेला आहे. मा. राज्य निवडणूक आयोगाने आज दि. 29 जून 2022 रोजी सुधारित कार्यक्रम जाहीर केलेला असून त्यानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याचा अखेरचा दिनांक 1 जुलै 2022 ऐवजी 3 जुलै 2022 असा सुधारित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
या अनुषंगाने प्रसार माध्यमांमार्फत नागरिकांपर्यंत या विषयीची योग्य माहिती पोहचावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पत्रकार परिषद घेत विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधींना याबाबत सविस्तर माहिती दिली.
दि.23 जून 2022 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असून त्या महानगरपालिकेची सर्व आठ विभाग कार्यालये, मुख्यालयातील निवडणूक कार्यालय तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईटवर या प्रभागनिहाय याद्या नागरिकांना पाहण्यासाठी सहजपणे उपलब्ध आहेत.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व दि. 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या याद्या नमुंमपा निवडणूकीसाठी ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय मतदार याद्या करताना त्यामध्ये नवीन नावांचा समावेश करणे अथवा नावे वगळणे अशा स्वरुपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.
सदर याद्यांनुसार एकूण मतदार संख्या 908433 इतकी असून त्यामधून 62909 इतकी मतदार संख्या विविध कारणांनी वगळण्यात आलेली आहे. त्यानुसार 845524 इतकी एकूण मतदार संख्या असून त्यामध्ये 469524 इतकी पुरुष मतदार संख्या आणि 375944 इतकी स्त्री मतदार संख्या आणि इतर 56 मतदार संख्या ग्राह्य धऱण्यात आलेली आहे.
या प्रभागनिहाय जाहीर कऱण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांबाबत हरकती व सूचना दाखल करताना त्यामध्ये मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणा-या चूका, विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे तसेच मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे अशा 3 बाबतीतच दुरुस्त्या करता येऊ शकतील हे आयुक्तांनी स्पष्ट केले.
या हरकती व सूचना नोंदविण्याकरिता मा. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीवरील हरकत अर्जांचा योग्य व जलद निपटारा होण्याच्या दृष्टीने विहित नमुन्यात हरकत अर्ज उपलब्ध करून दिला असून त्या नमुन्यातच अर्ज सादर करताना सोबत रहिवासाबाबतचा पुरावा जोडणे आवश्यक आहे अशीही माहिती आयुक्तांनी दिली.
नागरिकांना तत्परतेने आपली हरकत नोंदविता यावी याकरिता मा. राज्य निवडणूक आयोगाने ट्रू – वोटर ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले असून याव्दारेही मतदार घरबसल्या अत्यंत सहजपणे आपली मतदार यादी विषयीची हरकत / सूचना नोंदवू शकतात. दि. 09 जुलै 2022 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहेत. या पत्रकार वार्तालाप प्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या समवेत निवडणूक उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे उपस्थित होते.
मा. राज्य निवडणूक आयोगाने दि. 29 जून 2022 रोजीच्या आदेशानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याचा अखेरचा दि. 01 जुलै ऐवजी 03 जुलै 2022 असा सुधारित करण्यात आला असून मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करण्याचा दि. 09 जुलै 2022 हाच असणार आहे. दि. दि. 02 व 03 जुलै 2022 रोजी शनिवार व रविवारची कार्यालयीन सुट्टी असली तरी आठही विभाग कार्यालय तसेच मुख्यालय निवडणूक विभाग याठिकाणी मतदारांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. त्याचप्रमाणे ट्रू वोटर ॲपव्दारेही ऑनलाईन स्वरुपात हरकती व सूचना दाखल करता येतील.
तरी प्रत्येक जागरूक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही त्याचप्रमाणे ज्या प्रभागात नाव असणे अपेक्षित आहे त्याच प्रभागात नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. तसेच याबाबत काही हरकत अथवा सूचना असल्यास 3 जुलै 2022 पर्यंत महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात किंवा मुख्यालयातील निवडणूक कार्यालयात विहित नमुन्यात लेखी स्वरुपात अथवा ट्रू – वोटर ॲप्लिकेशनव्दारे ऑनलाईन स्वरुपात हरकती व सूचना दाखल कराव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 29-06-2022 14:58:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update