*आता दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी घेता येईल कोव्हीड प्रिकॉशन डोस*
कोव्हीड विषाणूपासून संरक्षणाच्या दृष्टीने कोव्हीड 19 लसीकरण लाभदायी असल्याचे दिसून येत असून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात जलद कोव्हीड लसीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. आत्तापर्यंत 13 लाख 80 हजार 548 नागरिकांनी कोव्हीडचा पहिला डोस तसेच 12 लाख 36 हजार 350 नागरिकांनी कोव्हीडचा दुसरा डोस तसेच 1 लाख 557 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतलेला आहे.
केंद्र व राज्य शासानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीड 19 लसीचा दुसरा डोस व प्रिकॉशन डोस यामधील 9 महिने किंवा 39 आठवडे हे अंतर आता कमी करण्यात आले असून दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांनी प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. प्रिकॉशन डोसचा लाभ कालावधी कमी केल्याने आता 3 महिने अगोदर घेता येणार असल्याने कोव्हीड लसीकरणाला अधिक गती मिळणार आहे.
कोव्हीडच्या दुस-या लाटेचा अनुभव लक्षात घेता लसीकरणाव्दारे मोठ्या प्रमाणावर नागरिक लस संरक्षित झाल्याने कोव्हीड झाला तरी तिस-या लाटेची तीव्रता अधिक जाणवली नाही. त्यामुळे प्रिकॉशन डोसचा कालावधी कमी करून शासनाने लस संरक्षित होण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे कोव्हीडपासून लसीव्दारे संरक्षण मिळते आहे हे लक्षात घेऊन कोव्हीडमुळे होणारी अनारोग्याची स्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी या कमी झालेल्या कालावधीचा लाभ घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे 18 वर्षावरील नागरिकांच्या दोन्ही डोसची उद्दिष्टपूर्ती करणारी नवी मुंबई ही राज्यातील प्रथम क्रमांकाची महानगरपालिका ठरली. तसेच लहान मुलांच्या लसीकरणाकडेही महानगरपालिकेने विशेष लक्ष देत 100 टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट नजरसमोर ठेवले आहे.
यामध्ये 15 ते 18 वयोगटातील 81616 कुमारवयीन मुलांना पहिला डोस देण्यात आला असून 66010 मुलांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 12 ते 14 वयोगटातील 43177 मुलांना पहिला डोस तसेच 32662 मुलांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे.
*शालेय विद्यार्थ्यांच्या कोव्हीड लसीकरणाची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याकरिता 1 जुलै पासून महिन्याभराच्या कालावधीकरिता विशेष कोव्हीड 19 शालेय लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून 30 जुलैपर्यंत लसीकरणाचे दिनांकनिहाय वेळापत्रक तयार कऱण्यात आले आहे.*
*या विशेष मोहीमे अंतर्गत मागील 10 दिवसात 15 ते 18 वयोगटातील 643 मुलांना पहिला डोस तसेच 1064 मुलांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 12 ते 14 वयोगटातील 3667 मुलांना पहिला डोस व 3685 मुलांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे.*
*त्याचप्रमाणे 1 जून 2022 पासून हर घर दस्तक मोहीम 2 देखील राबविली जात असून त्या अंतर्गत 1 जुलै ते 10 जुलै या दहा दिवसांच्या कालवाधीत 18 वर्षावरील 121 नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस आणि 286 नागरिकांना कोव्हीड लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे.*
*महत्वाचे म्हणजे या 10 दिवसाच्या कालावधीत 7446 नागरिकांना कोव्हीडचा तिसरा डोस म्हणजेच प्रिकॉशन डोस देण्यात आलेला आहे.*
मागील 10 दिवसात 4431 नागरिकांना पहिला डोस व 5035 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला असून 7446 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतलेला आहे. महानगरपालिकेच्या कोव्हीड 19 लसीकरण केंद्रांवर आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रिकॉशन डोस दिला जात असून खाजगी रुग्णालयातील कोव्हीड लसीकरण केंद्रांवर 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना सशुल्क प्रिकॉशन डोस दिला जात आहे.
*आता प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पूर्वीचे दुस-या डोस नंतरचे 9 महिने किंवा 39 आठवडे हे अंतर आता 6 महिने किंवा 26 आठवडे इतके कमी झाल्याने नागरिकांना लवकर लस संरक्षित होण्याची संधी आहे.*
*तरी कोव्हीड लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये आजाराची तीव्रता कमी असल्याचे निदर्शनास आले असल्याने नागरिकांनी कोव्हीड लसीकरणाव्दारे स्वत:चे तसेच आपल्या मुलांचे कोव्हीड लसीकरण करून घ्यावे व लस संरंक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 11-07-2022 15:24:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update