*नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना उत्तेजन देण्यासाठी अभिनव योजना*
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण दिसून येत असून दरवर्षी शाळांतील पटसंख्या लक्षणीय संख्येने वाढताना दिसत आहे.
पाठ्यस्तकातील क्रमिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील अंगभूत गुणांना वाव देण्याचा प्रयत्न विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून केला जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी ॲथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल अशा विविध खेळांमध्ये गुणवत्ता सिध्द केली असून अनेक विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. तथापि अशा क्रीडा गुणसंपन्न विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी योग्य मार्गदर्शन व आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध न झाल्याने अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नेमकी ही बाब हेरून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या गुणवंत खेळाडूंना उच्च स्तरावर खेळायला जाण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शिक्षण विभागास दिले होते. त्यास अनुसरून या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांशी चर्चा करून महानगरपालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थी खेळाडूंकरिता विशेष योजना तयार करण्यात आली. या योजनेस महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची मान्यता प्राप्त झाल्याने या विद्यार्थी खेळाडूंना स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या नवीन योजनेव्दारे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत शाळांतील जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सन 2022-23 पासून संबंधीत खेळातील उच्च प्रशिक्षण घेण्याकरिता क्रीडा प्रबोधिनी / प्रशिक्षण संस्था यांच्या शुल्कासाठी प्रति महिना रु.5 हजार मानधन पुढील तीन वर्षांपर्यंत दिल जाणार आहे.
त्याचप्रमाणे आवश्यक क्रीडा साहित्य खरेदीसाठी प्रती विद्यार्थी रु. 15 हजार इतकी रक्कम एकरकमी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तसेच शारीरिक तंदुरुस्ती ही खेळाकरिता एक महत्वाची बाब असल्याने आवश्यक पोषक आहार पुरवठा याकरिता प्रती महिना रु. 5 हजार इतके मानधन तीन वर्ष दिले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये प्रामुख्याने निम्न आर्थिक वर्गातील मुले शिक्षण घेत असल्याने त्यांच्यामधील अंगभूत क्रीडा गुणवत्तेला कौटुंबिक परिस्थिती अभावी संधी गमवावी लागू नये याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विद्यार्थ्यांच्या उच्च क्रीडा प्रशिक्षणासाठी, क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी, आवश्यक पोषक आहार पुरवठा करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचे निश्चित केल्याबद्दल विद्यार्थी व पालकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रदर्शित करण्यासाठी मोठे आभाळ खुले होणार आहे.
Published on : 03-08-2022 16:14:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update