पारसिक हिलवर हिरव्या, निळ्या, काळ्या रंगाच्या छत्र्या झळकावित स्वच्छता संदेशाचे प्रसारण
घनकचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे कचरा निर्माण होतो त्याठिकाणीच तो ओला, सुका व घरगुती घातक स्वरुपात वेगवेगळा ठेवला जाणे ही आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. स्वच्छता ही दररोज करण्याची गोष्ट असल्याने नियमित कचरा वर्गीकरण करून ती नागरिकांची दैनंदिन व्हावी यादृष्टीने महानगरपालिकेमार्फत विविध माध्यमांचा वापर केला जात आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या स्वच्छ अमृत महोत्सवाच्या कालावधीत ‘इंडियन स्वच्छता लीग’ जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये नवी मुंबई शहर उत्साहाने सहभागी झालेले आहे. ‘युथ वर्सेस गार्बेज’ ही या उपक्रमाची टॅगलाईन असून स्वच्छता कार्यात युवकांच्या सहभागावर भर देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामधील एक अभिनव उपक्रम पारसिक हिल या नवी मुंबईतील निसर्गस्थळी आयोजित करण्यात आला. त्यामध्ये सीबीडी बेलापूर मधील टिळक कॉलेज व एसके कॉलेज आणि नेरूळ येथील एसआयईएस कॉलेज मधील एनएसएस विद्यार्थी तसेच पारसिक हिल असोसिएशनचे प्रतिनिधी अशा 100 हून अधिक युवकांनी व नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता संदेशाचा प्रसार केला.
हा संदेश प्रसारित करताना सध्याचा पावसाळी कालावधी लक्षात घेऊन विविध रंगांच्या छत्र्यांचा नाविन्यपूर्ण वापर करण्यात आला. ओला कचरा हिरव्या डब्यात, सुका कचरा निळ्या डब्यात व घरगुती घातक कचरा काळ्या डब्यात या संदेश प्रसारणासाठी उपस्थित युवक व नागरिकांनी हिरव्या, निळ्या व काळ्या रंगाच्या छत्र्या धरून मानवी साखळीव्दारे कचरा वर्गीकरणाचे महत्व आगळ्या वेगळ्या पध्दतीने सादर केले. त्याचप्रमाणे पारसिक हिल परिसरात स्वच्छता मोहिम राबवून प्लास्टिक कचरा गोळा केला.
‘इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत स्वच्छता विषयक उपक्रम राबविताना नवी मुंबई महानगरपालिेकेने कल्पकतेवर भर दिला असून प्रत्येक उपक्रम हा वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साकार होईल याचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. नवी मुंबई शहराकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून त्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘इंडियन स्वच्छता लीग’मध्ये सहभागी होताना समस्त नवी मुंबईकर नागरिकांचा ‘नवी मुंबई इको क्नाईट्स’ हा संघ स्थापन करण्यात आला असून सुप्रसिध्द संगीतकार, गायक पद्मश्री श्री. शकर महादेवन यांनी नवी मुंबईकर नागरिक असल्याचा अभिमान दर्शवित कोणत्याही प्रकारचे मानधन न स्विकारता या संघाचे कर्णधारपद स्विकारले आहे.
या अस्वच्छतेविरोधातील लढाईमध्ये प्रामुख्याने युवकांच्या सहभागावर भर देत राजीव गांधी स्टेडियम व सिडको प्रदर्शनी केंद्र याठिकाणी 53 हजारहून अधिक विद्यार्थी, युवकांसह विशेष उपक्रमाचे आयोजन, पामबीच मार्गावर मुख्यालय ते मोराज सर्कल सानपाडा पर्यंत मानवी साखळीव्दारे तिरंगा झळकवित स्वच्छता संदेश प्रसारण व कांदळन स्वच्छता मोहीम, मिनी सी शोअर वाशी येथे तृतीयपंथी नागरिकांव्दारे परिसर स्वच्छता मोहीम असे वेगळ्या स्वरूपाचे उपक्रम राबविलेले असून पारसिक हिल या नवी मुंबईतील निसर्गस्थळी एकत्र येऊन एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हिरव्या, निळ्या, काळ्या छत्र्यांव्दारे कचरा वर्गीकरणाचे पटवून दिलेले महत्व हा देखील एक अभिनव उपक्रम असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या सर्वच उपक्रमांत सहभागी होणा-या स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचे व त्यातही विशेषत्वाने विद्यार्थी, युवकांचे आभार व्यक्त केले आहेत.
Published on : 23-09-2022 15:26:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update