नागरिक व विद्यार्थ्यांनी नवी मुंबईत विविध ठिकाणी एकता दौडच्या माध्यमातून दिला एकात्मतेचा संदेश
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई यांच्या जयंतीदिनानिमित्त संपूर्ण देशभरात एकता दिन साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एकात्मतेचा संदेश प्रसारित करणा-या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या संदेश प्रसारणाला लोकसहभागाची जोड देत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार एकता दौड हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये श्री करियर ॲकॅडमी यांच्या सहयोगाने ज्वेल ऑफ नवी मुंबई ते महानगरपालिका मुख्यालय येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले आणि परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाचे उप आयुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या नियोजनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या एकता दौडमध्ये 300 हून अधिक युवक, युवतींनी उत्साहाने सहभागी होत देशभक्तीपर घोषणा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रसारित केला.
त्याचप्रमाणे मिनी सी शोअर वाशी येथे लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने संस्थाप्रमुख श्रीम. रिचा समित यांच्यासह 125 हून अधिक नागरिक एकतेचा संदेश देणा-या दौडमध्ये सहभागी झाले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि वाशी विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त श्री. दत्तात्रय घनवट यांनी या दौडचे सुयोग्य नियोजन केले.
याशिवाय शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. योगेश कडुसकर आणि शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव यांच्या नियंत्रणाखाली महानगरपालिकेच्या शाळांमध्येही एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 30 प्राथमिक व 23 माध्यमिक शाळांमधील 5000 हून अधिक विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांच्या परिसरात एकता दौडच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रसारित केला.
नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.
Published on : 31-10-2022 12:21:09,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update