आसपासच्या शहरांमधील गोवरबाधीत मुलांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका सतर्क झाली असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत नागरी आरोग्य केंद्रनिहाय विशेष सर्व्हेक्षणाला सुरूवात करण्यात आलेली आहे.
गोवर टाळण्यासाठी लसीकरण हा प्रभावी मार्ग असून नवी मुंबई महानगरपालिकेने सातत्याने लसीकरण सुरु ठेवल्याने एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 9 महिने ते 12 महिने पर्यंतच्या 14215 बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला डोस दिलेला आहे. महानगरपालिकेला दिलेल्या 13423 इतक्या पहिल्या डोसच्या उद्दिष्टापेक्षा जास्त बालकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 16 ते 24 महिने वयोगटातील 13172 बालकांचे दुस-या डोसचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोवर बाधीतांचे प्रमाण काहीसे मर्यादित आहे.
तथापी इतर शहरांमधील स्थिती लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका दक्ष झाली असून महानगरपालिका कार्यक्षेत्रात संशयीत गोवर रुग्ण शोधण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रनिहाय 30 नोव्हेंबर पर्यंत विशेष सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. नमुंमपा कार्यक्षेत्रातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील लस घेण्याचे राहून गेलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी 175 अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथे तळमजल्यावर 8 रुग्णखाटांचा विशेष विलगीकरण कक्ष गोवर झालेल्या बालकांसाठी स्थापित करण्यात आलेला आहे.
याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांचे विशेष प्रशिक्षण जागितक आरोग्य संघटनेचे विशेष समन्वयक डॉ. अरुण काटकर यांनी उजळणी प्रशिक्षण घेतले आहे. अशाच प्रकारे महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी तसेच बालरोगतज्ज्ञ, स्टाफ नर्स, एल. एच. व्ही., ए.एन.एम. यांचेही उजळणी प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.
प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस मोफत उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर/रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
गोवर हा विषाणूपासून होणारा साथीचा आजार असून विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. लक्षणांमध्ये सुरुवातीला ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक, दोन किंवा तीनही लक्षणे दिसतात. सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर 2 ते 4 दिवसांनी अंगावर पुरळ दिसू लागते. पुरळ कानाच्या मागे सुरु होऊन नंतर चेहरा, छाती, पोट व पाठ या ठिकाणी पसरते.
गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ - जीवनसत्वाचे प्रमाण कमी होऊन त्यामुळे रुग्णाला डोळयांचे आजार व अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ - जीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते.
गोवरचा विषाणू रुग्णांच्या खोकल्यातून किंवा शिंकेव्दारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता नजीकच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयास किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दयावी तसेच गोवरचा उद्रेक टाळण्यासाठी ज्या 5 वर्षापर्यंतच्या बालकांना डोस घेता आला नाही अशा बालकांसाठी घरांना भेटी देणा-या स्वयंसेवकांना आपल्या बालकांबाबत योग्य माहिती देऊन गोवर लस घेण्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.