*वाशी सार्वजनिक रूग्णालयात पाठीच्या दुखण्यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी*
नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील सार्वजनिक रूग्णालय हे सर्वसाधारण नागरिकांसाठी महत्वाचा वैद्यकिय आधार असून याठिकाणी दररोज मोठ्या संख्यने रूग्ण विविध आजारांवरील उपचारांसाठी येत असतात. नुकतीच या रूग्णालयामध्ये एक अत्यंत गुंतागुतीची पाठीच्या दुखण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचा-यांचे कौतुक केले आहे.
64 वर्षांच्या एका व्यक्तीला मागील 2 वर्षांपासून पाठदुखी आणि पाठीमागे खालील डाव्या बाजूस तीव्र वेदना होत होत्या. दुखणे इतके जास्त होते की आठ- दहा मिनिटे चालणेही त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले होते. व्यक्तीची एमआरआय चाचणी केली असता त्यामध्ये लंबर कॅनल स्टेनोसिस अर्थात नसांमध्ये अत्यंत कमी जागा झाल्याचे निदर्शनास आले.
नियोजित पीजी कॉलेजसाठी नियुक्त केलेले प्राध्यापक डॉ. प्रवीण पाडळकर आणि सहा. प्राध्यापक डॉ. सुमित सोनवणे यांनी या रिपोर्टसची बारकाईने पाहणी करून काहीशी कठीण असलेली ही शस्त्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रूग्णालयामध्येच करण्याचे निश्चित केले. स्पाइनल ॲनेस्थेसिया अंतर्गत लंबर डिकन्प्रेशनने ही शस्त्रक्रिया 1 तास 15 मिनीटांच्या कालावधीत त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण त्याच्या लक्षणांपासून पूर्णपणे मुक्त होणार आहे.
या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रूग्णालयाच्या रूग्णालयात साधारणत: रू. 2 ते 2.5 लाख इतका खर्च आला असता. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयातील ही शस्त्रक्रिया अगदी विनामूल्य यशस्वीपणे पार पडलेली आहे. महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये अनेक वर्षानंतर काहीशी कठीण अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली असून आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे.
Published on : 23-11-2022 05:46:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update