सुविधा कामे गुणवत्तापूर्ण करण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे ऐरोली पाहणीदौ-याप्रसंगी निर्देश
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली विभागात सुरु असलेल्या विविध प्रकल्प, सुविधा कामांची आज महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामे गतीमानतेने करीत विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले. त्याचप्रमाणे या कामांत गुणवत्ता राखण्याचे निर्देशित करून यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
क्षेत्रीय स्तरावरील अभियंत्यांना विभागात सुरु असलेल्या प्रकल्पांच्या बांधकामांकडे लक्ष देण्यासोबतच इतरही अभियांत्रिकी कामे तसेच स्वच्छ सर्वेक्षण विषयक कामे करण्याची जबाबदारी असल्यामुळे प्रकल्प कामांवरील देखरेखीची जबाबदारी एका वेगळ्या अभियंत्यांकडे सोपवावी जेणेकरून या कामांवर व्यवस्थित नियंत्रण राहील अशाप्रकारच्या सूचनांनुसार अभियांत्रिकी विभागामार्फत होत असलेल्या कार्यवाहीचा आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला.
याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. महेंद्र सप्रे, कार्यकारी अभियंता श्री. संजय दादासाहेब पाटील आणि इतर अधिकारी, वास्तुविशारद उपस्थित होते.
विस्तारित पामबीच मार्गावरील घणसोली - ऐरोलीला जोडणा-या खाडीवरील नियोजित पूलाच्या सद्यस्थितीची आयुक्तांनी माहिती घेत त्या मार्गाला मुंबई व ठाण्याकडे जाण्यासाठी जोडावयाच्या प्रस्तावित मार्गाचीही सविस्तर माहिती जाणून घेतली. ऐरोली व घणसोली अशा दोन्ही बाजूने स्थळ पाहणी करीत प्रत्यक्ष नकाशा आणि गुगलमॅपवरून आयुक्तांनी तेथील भौगोलिक स्थितीची माहिती घेतली. खाडीवरील साधारणत: 1950 मीटर लांबीच्या पूलाचे काम करण्याबाबत शासकिय पातळीवरून आवश्यक परवानग्या प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण व जलद कार्यवाही करावी असे आयुक्तांनी यावेळी सूचित केले.
सेक्टर 5 ऐरोली येथे सुरु असलेल्या नाट्यगृहाच्या बांधकामाची पाहणी करताना आयुक्तांनी नाट्यगृहाचा आराखडा नाट्यकर्मींना दाखवून त्यांच्याही मौलीक सूचना जाणून घ्याव्यात असे अभियांत्रिकी विभागास निर्देशित केले. नाट्यगृहात आलेल्या रसिकांना पार्कींगपासून उपहारगृहापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा सहजपणे उपलब्ध होतील याकडे आराखड्यामध्ये बारकाईने लक्ष देत कार्यवाही करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
ऐरोली मुलुंड खाडीपुलापासून मुंब्र्याकडे काटई मार्गे जाणा-या पुलाच्या शेजारी सेक्टर 3 येथे सुरु असलेले ऐरोली अग्निशमन केंद्राचे काम एका महिन्याच्या कालावधीत गुणवत्ता राखून पूर्ण करावे व त्याकडे अभियांत्रिकी विभागाने काटेकोर लक्ष द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. त्याबाजूच्या भूस्तरीय व उच्चस्तरीय जलकुंभाचे कामही सुरु करण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही करावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. समता नगर येथील जलकुंभाच्या कामाची पाहणी करताना तेही काम विहित कालावधीत पूर्ण करून लवकरात लवकर आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा सुरु होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
सेक्टर 19 ऐरोली येथील मासळी व भाजी मार्केटचे काम पूर्णत्वास आले असून उर्वरित किरकोळ कामे करून हे मार्केट लवकरात लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले.
यादवनगर येथील शाळा इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून येत्या शैक्षणिक वर्षात नवीन शाळा इमारतीत उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यवाही करावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
चिंचपाडा येथील घनकच-यापासून बायोगॅस व वीजनिर्मिती प्रकल्प स्थळाची पाहणी करित आयुक्तांनी यामधून निर्माण होणा-या बायोगॅसचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त घरांतील नागरिकांना व्हावा या दृष्टीने सर्वेक्षण करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या पाहणी दौ-यात समता नगर येथील झिरो वेस्ट स्लम मॉडेल अंतर्गत सुरु असलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळाला भेट देत आयुक्तांनी तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली व हे काम करणा-या महिलांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे जाणून घेतले. याठिकाणी ओल्या कच-यापासून तयार होणा-या खताला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे निर्देश आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. त्याचप्रमाणे तेथील संकलित सुका कचरा विक्रीतून येणारे उत्पन्न या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जाऊन त्याचा सुयोग्य विनियोग होत असल्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
सेक्टर 5 येथील जयभवानी दैनंदिन बाजाराच्या बाजूच्या प्लॉटवर दिव्यांग सन्मान किऑक्स ठेवलेल्या जागेची पाहणी करीत दिव्यांगांना व नागरिकांना सुलभ जावे अशाप्रकारे त्याची रचना करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
जयभवानी दैनंदिन बाजारात अंतर्गत भागात पाहणी करताना एका फळ विक्रेत्याकडे प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी तेथील सर्वच विक्रेत्यांना प्लास्टिक प्रतिबंधाविषयी विक्रेते म्हणून आपण जागरूक राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत महानगरपालिकेने येऊन दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा तुम्ही स्वत:हूनच ग्राहकांना स्वत: सोबत कापडी पिशवी आणण्याची सवय लावावी असे सूचित केले.
पाहणी दौ-यामध्ये काही शौचालयांची पाहणी करीत त्याठिकाणची अंतर्गत व बाहेरील स्वच्छता तसेच त्याठिकाणी पुरविण्यात येणा-या सुविधा उत्तम रितीने दिल्या जातील याची संबंधित विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांनी काटेकोर दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक शौचालयामध्ये नागरिकांना सूचना / तक्रार रजिस्टर सहजपणे उपलब्ध राहील याकडे विशेष लक्ष देण्याबाबत सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना पुरविल्या जाणा-या सुविधांचा दर्जा उत्तम राखणे तसेच विहित कालावधीत त्या पूर्ण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी शहर स्वच्छतेकडे व शौचालय व्यवस्थापनाबाबत अधिक दक्ष राहून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
Published on : 25-11-2022 12:27:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update