*महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी स्मारकस्थळी भेट देण्याचे आवाहन*
नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली - मुलुंड खाडीपुलाजवळ सेक्टर 15 ऐरोली येथे असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तेथील संपन्न ग्रंथालयाप्रमाणेच विविध सुविधांमुळे बाबासाहेबांच्या विचारांना महत्व देणारे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे.
स्मारकामध्ये बाबासाहेबांचे जीवनचरित्र मांडणारे दूर्मीळ छायाचित्र दालन, ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीसह समृध्द ग्रंथालय, आभासी चलचित्र प्रणालीव्दारे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची सुसंधी, एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यानकेंद्र तसेच 250 आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत. लांबूनच नजरेस भरणारा 50 मीटर उंचीचा भव्य डोम बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक म्हणून पेनच्या निबच्या आकाराचा करण्यात आलेला आहे.
अशा विविध अभिनव सुविधांनी साकारलेल्या या स्मारकाला भेटी देणा-या नामांकित विचारवंत, साहित्यिक, व्याख्यात्यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचाराप्रणालीवर आधारित हे बाबासाहेबांचे पुतळाविरहीत आगळेवेगळे स्मारक असल्याचे अभिप्राय नोंदविलेले आहेत. त्याचप्रमाणे याठिकाणी भेट देणा-या राज्यातील तसेच देशातील विविध प्रांतांच्या नागरिकांनीही बाबासाहेबांच्या सर्वस्पर्शी विचारांचे हे स्मारक म्हणजे मूर्तीमंत रुप असल्याचे अभिप्राय व्यक्त केलेले आहेत.
या स्मारकामध्ये मागील वर्षभरात विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करून विचारांचा जागर करण्यात आलेला आहे व त्या सर्वच कार्यक्रमांना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. या स्मारकाची महती विविध माध्यमांतून देशापरदेशात पोहचत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे DrAmbedkarSmark हे फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम, शेअरचॅट या स्वतंत्र सोशल मिडीया पेजला देखील हजारो नागरिकांचे लाईक्स आणि कमेंट्स प्राप्त होत आहेत.
या स्मारकाचे वेगळेपण तेथे भेट देणा-या नागरिकांच्या मनात अधोरेखीत होत असून अशा प्रकारे बाबासाहेबांचे वेगळ्याप्रकारचे स्मारक नवी मुंबईत ऐरोली येथे आहे याची माहिती मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी नवी मुंबईतील महामार्गांवरून महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीकडे जाणा-या नागरिकांच्या माहितीसाठी महामार्गावर स्मारकाची माहिती देणारे व स्मारकाला भेट देण्यासाठी नागरिकांना आवाहन करणारे होर्डींग प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे चैत्यभूमी दादर येथे नागरिकांच्या माहितीसाठी विशेष स्टॉल लावण्यात आला असून त्याठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील विविध सुविधांची महती छायाचित्रांसह व माहितीसह आकर्षक रितीने प्रदर्शित करण्यात आलेली आहे. चैत्यभूमीला भेट देणा-या नागरिकांनी आवर्जुन सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या ज्ञान स्मारकाला भेट देऊन विचार प्रत्यक्ष अनुभवावेत व एक अलौकिक अनुभव घेऊन जाताना संस्मरणीय आठवण सोबत घेऊन जावी असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान स्मारकाला महापरिनिर्वाणदिनी भेट देऊन ‘ज्ञान हीच शक्ती’ हा विचार देणा-या बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 05-12-2022 12:06:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update