*गोवरच्या प्रभाव प्रतिबंधासाठी सर्वेक्षण व लसीकरणावर नवी मुंबई महानगरपालिकेचा भर*
विविध शहरांमधील गोवरचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन नमुंमपा नियमित लसीकरण टास्क फोर्सच्या विशेष बैठकीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिल्यानुसार गोवरचा नवीन रुग्ण आढळल्यास त्या भागात 9 महिने ते 5 वर्ष वयाच्या बालकांना मिझेल रुबेलो लसीचा 1 अतिरिक्त डोस तसेच 6 महिने ते 9 महिने वयाच्या बालकांस एमआर लसीचा झिरो डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे या 4 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अतिरिक्त डोस व झिरो डोस देण्यात आले. यामध्ये पावणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील 19 बुथवर 1596 अतिरिक्त डोस, जुहूगांव नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रात 17 बुथवर 60 झिरो डोस व 1405 अतिरिक्त डोस देण्यात आले. त्याचप्रमाणे करावे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रात 20 बुथवर 59 झिरो डोस व 1025 अतिरिक्त डोस आणि सीबीडी बेलापूर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रात 27 बुथवर 59 झिरो डोस व 1162 अतिरिक्त डोस देण्यात आलेले आहेत. अशाप्रकारे एकूण 178 बालकांना झिरो डोस व 5188 बालकांना अतिरिक्त डोस म्हणजेच एकूण 5366 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त लाभार्थांना लसीकरणाचा लाभ मिळावा या उद्देशाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे खैरणे या कार्यक्षेत्रात 5 डिसेंबरपासून लसीकरणाच्या दुस-या फेरीचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये 8755 अतिरिक्त डोस व 224 झिरो डोस देण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खैरणे या परिसरात प्रभाव आढळल्याने त्या कार्यक्षेत्रातही 5 ते 9 डिसेंबर या कालावधीत 9 महिने ते 5 वर्ष वयाच्या 6406 बालकांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून 43 बुथचे नियोजन करण्यात आलेले आहे. या प्रभावित क्षेत्रात सर्वेक्षण सुरु असून बालकांच्या लसीकरणाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून बालकांमध्ये ताप व पुरळ असलेली बालके आहेत काय? याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
तरी नागरिकांनी आपल्या लहान मुलांमध्ये ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळयांची जळजळ, चेह-यावर व शरीरावर लाल सपाट पुरळ ही गोवरची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक केंद्राला अथवा महापालिका रुग्णालयाला भेट दयावी तसेच गोवरचा उद्रेक प्रतिबंधीत करण्यासाठी आपल्या घरांना सर्वेक्षणासाठी भेटी देणा-या महापालिका आरोग्य विभागाच्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
Published on : 08-12-2022 13:23:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update