नमुंमपा मुख्यालयातील भित्तीचित्रकारांचे सुप्रसिध्द गायक संगीतकार श्री.शंकर महादेवन यांनी केले कौतुक
नवी मुंबई शहराविषयी येथील नागरिकांमध्ये अतिशय प्रेम व अभिमान असून भित्तीचित्र स्पर्धेच्या माध्यमातून पहिलीतील 6 वर्षाच्या विद्यार्थ्यापासून ते मोठ्या चित्रकारांपर्यंत नवी मुंबईच्या स्वच्छ व सुंदरतेच्या संकल्पना चित्रांव्दारे साकारणा-या कलावंतांचे सुप्रसिध्द गायक संगीतकार व स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रॅंड ॲम्बेसेडर श्री. शंकर महादेवन यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील भेटीप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत श्री. शंकर महादेवन यांनी मुख्यालय इमारतीच्या बेसमेंटमध्ये भित्तीचित्र स्पर्धेत सहभागी 69 विद्यार्थी, युवक, नागरिक चित्रकारांनी सहभागी होत चितारलेल्या भित्तीचित्रांची पाहणी केली व चित्रकारांच्या शहर स्वच्छतेविषयक कल्पक संकल्पनांची प्रशंसा केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सामोरे जाताना स्वच्छता कार्यात व्यापक लोकसहभागावर भर दिला जात असून नागरिकांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी व त्यामधून स्वच्छतेचा संदेश प्रसारित होण्यासाठी चित्रकला, भित्तीचित्र, पथनाट्य, जिंगल, शॉर्टफिल्म अशा विविध स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व स्पर्धांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभत असून त्यातील कलाप्रदर्शनातून नवी मुंबई शहरात स्वच्छतेची चळवळ उभी करण्यात सक्रीय सहभाग घेणा-या सहभागी कलावंत स्पर्धकांचे स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रॅंड ॲम्बेसेडर सुप्रसिध्द गायक, संगीतकार श्री. शंकर महादेवन यांनी कौतुक केले.
Published on : 09-12-2022 12:38:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update