प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांना नवी मुंबईत गती
प्लास्टिकमुळे पर्यावरणाला व मानवी जीवनाला असलेला धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णपणे रोखणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी मोहिमा तीव्रतेने राबवाव्यात असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिले होते.
या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली सर्वच आठही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे व विभागातील स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा गतीमानतेने राबविण्यास सुरुवात झाली आहे. नुकतीच 10 डिसेंबर रोजी तुर्भे येथे 1200 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावरील साठा जप्त करण्यात आला.
अशाच प्रकारे प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा विभाग कार्यालयांमार्फत आपापल्या क्षेत्रात राबविल्या जात असून ऐरोली येथे सेक्टर 3 व सेक्टर 20 येथील 7 खाद्यपदार्थ दुकानदारांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 40 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. यामधील एका दुकानदारावर दुस-यांदा कारवाई होत असल्याने 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली व सर्वांना समज देण्यात आली. याशिवाय सेक्टर 3 व सेक्टर 20 येथील प्रत्येकी एका खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर दुकानाच्या आसपास कचरा टाकल्याने प्रत्येकी रु.250/- प्रमाणे रु.500/- इतका दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथे सेक्टर 3 व सेक्टर 20 येथील 4 दुकानदारांवर कारवाई करीत 20 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे 3 दुकानदारांनी इतरत्र कचरा टाकल्याने प्रत्येकी रु.250/- प्रमाणे रु.750/- दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
नेरुळ विभागातही सेक्टर 4 येथील व्यावसायिककडून रु.5000/- दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली व प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे सेक्टर 3 येथील 4 दुकनदारांवर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने रु.250/- प्रमाणे एकूण रु.1000/- इतका दंड वसूल करण्यात आला.
घणसोली येथेही एका व्यावसायिकाकडून रु.5000/- दंड रक्कमेसोबतच त्याच्याकडील 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
अशाप्रकारे सर्वच विभागांमध्ये प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी व्यावसायिक, व्यापारी यांच्याप्रमाणेच नागरिकांनाही आवाहन करण्यात येत असून त्यासोबतच धडक मोहिमा राबवित प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्यास प्लास्टिक जप्तीप्रमाणेच दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात येत आहे.
Published on : 13-12-2022 11:07:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update