लिडारव्दारे मालमत्ता सर्वेक्षण कामाला गती देत विहित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नमुंमपा आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांचे लिडार तंत्रज्ञान वापरून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणांती प्राप्त होणा-या मोजमापानुसार एप्रिल महिन्यात देण्यात येणारी मालमत्ता कराची देयके विहित वेळेत द्यावयाची झाल्यास फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस मालमत्ता कर विभागास लिडार सर्वेक्षणातील माहिती मिळणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ज्या भागांतील संपूर्ण सर्वेक्षण झाले आहे अशा क्षेत्रांची माहिती मालमत्ता कर विभागास जसे सर्वेक्षण होईल तशी त्वरित उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांना पुढील कार्यवाही करून नवीन स्वरुपाचे देयक एप्रिल महिन्यात देता येतील असे निर्देश नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड व एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या लिडारव्दारे मालमत्ता सर्वेक्षण कामाचा बारकाईने आढावा घेत आयुक्तांनी एजन्सीमार्फत देण्यात येणारी माहिती मालमत्ता कर विभागाला पुन्हा तपासणी करण्याची गरज भासणार नाही इतकी अचूक देऊन त्यांना पुढील कार्यवाही करणे सोयीचे ठरेल अशा स्वरुपाच्या फॉरमॅटमध्ये द्यावी असे सूचित करीत माहिती देताना ती पहिल्या फेजमधील ड्रोन सर्वेक्षण तसेच दुस-या फेज मधील प्रत्यक्ष जागी जाऊन सर्वेक्षण अशा दोन्ही प्रकारचे सर्वेक्षण पूर्ण करून द्यावी असे निर्देशित केले. उपलब्ध करून दिल्या जाणा-या माहितीमध्ये अत्यंत अचूकता हवी याकडे काटेकोर लक्ष देण्याचे सूचित करताना आयुक्तांनी त्यामध्ये त्रुटी राहू नये यादृष्टीने झालेल्या कामाचे पर्यवेक्षकीय निरीक्षण व परीक्षण होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
एजन्सीमार्फत सुरु असलेले सर्वेक्षण काम विहीत वेळेत पूर्ण व्हावे यादृष्टीने त्यांना या कामात येणा-या अडचणांचे निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत सक्षम अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त करा असेही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर व अभियांत्रिकी विभागास निर्देशित केले.
ड्रोन सर्वेक्षणाच्या आधारावर बेसमॅप निश्चित केला जात असून त्यानंतर 360 अंशात लिडार सर्वेक्षण केले जाते व त्यानंतर प्रत्यक्ष जागी जाऊन सर्वेक्षण केले जाते. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मागील अनेक वर्षात सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे मालमत्तांमध्ये झालेले बदल अथवा वाढ याची अद्ययावत माहिती महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही. या लिडारव्दारे मालमत्ता सर्वेक्षणाच्या माध्यमातून ही माहिती अद्ययावत होणार असून त्यामुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या उत्पन्नातही वाढ होणे अपेक्षित आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास होत असताना मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असून या माध्यमातूनच दर्जेदार नागरी सुविधा पुरविणे शक्य होत आहे. त्यादृष्टीने मालमत्तांचे लिडार प्रणाली वापरून अद्ययावत सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे असून एजन्सीमार्फत जलद काम पूर्ण व्हावे व त्यांच्या कामाकडे विभागाने काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश देतानाच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दर आठवड्याला या कामाचा आढावा घेतला जाईल असे स्पष्ट केले.
Published on : 23-12-2022 12:34:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update