*स्वच्छ नवी मुंबईकडून असलेल्या अपेक्षापूर्तीसाठी झोकून देऊन काम करण्याचे आयुक्तांचे निर्देश*
नवी मुंबई महानगरपालिकेने शहर स्वच्छतेमध्ये एक स्तर गाठला असून आता त्यामध्ये अधिक सुधारणा करत आणखी उच्चस्तर गाठण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला हवेत आणि अतिशय जागरूकतेने इतर शहरांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता कामांचा अंदाज घेत आणखी उत्तम दर्जाची स्वच्छता राखायलाच हवी असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्वच्छता विषयक आढावा बैठकीप्रसंगी दिले.
राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईची स्वच्छता स्थिती चांगली असली तरी आता प्रत्येक शहरात जागरुकता आली आहे याची जाणीव ठेवून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट आहे याचे भान राखावे आणि आपली गुणवत्ता अधिक उंचाविण्यासाठी दुर्लक्ष करू नये असे आयुक्तांनी निर्देशित केले.
स्वच्छता कामाशी संबंधित प्रत्येकाने आपला अधिकाधिक वेळ हा क्षेत्रीय स्तरावर कामातील गुणवत्ता वाढीसाठी दिला पाहिजे असे स्पष्ट करीत त्यानुसार कामाच्या वेळेचे नियोजन करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
शहरातील वर्दळीच्या भागांची दोन वेळा स्वच्छता केली जाते ही नागरिकांच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक गोष्ट असून विभाग अधिका-यांनी रात्रीचे दौरे करून या कामाचे नियमित परीक्षण करावे असे सूचित करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी फूट जॉईंटच्या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे व तेथील स्टॉल धारकांना ओला व सुका कच-यासाठी स्वतंत्र डबे ठेवणे अनिवार्य करावे असेही निर्देशित केले. स्वच्छता परीक्षणासाठी विभागवार नेमलेल्या विभागप्रमुख स्तराच्या नोडल अधिका-यांनी आपापल्या विभागात दौरे सुरु करावेत व स्वच्छतेमध्ये सुधारणा होईपर्यंत त्या कामांचा पाठपुरावा करावा असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
घराघरातून कचरा वर्गीकरण हे आपले प्रमुख लक्ष्य असून त्यादृष्टीने आपली क्षमता वाढवा तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होते अशा सोसायट्या, हॉटेल्स, संस्था याठिकाणी ‘बल्क वेस्ट जनरेटर प्रकल्प’ राबविण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांची संख्या वाढविण्याची व्यापक स्वरुपात कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने ‘झिरो वेस्ट मॉडेल’ हा अत्यंत प्रभावी उपक्रम असून त्यामध्ये नवी मुंबई आघाडीवर आहे याचा अभिमान बाळगताना त्याची व्याप्ती वाढवून प्रत्येक झोपडपट्टीत झिरो वेस्ट स्लम मॉडेल राबविण्यासाठी गतीमान कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले. स्वच्छता ही नवी मुंबईची ओळख असून आपली बलस्थाने ओळखून ती अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
सार्वजनिक शौचालये नागरिकांना दररोज वापरावी लागत असल्याने तेथील स्वच्छतेमध्ये किंचीतही तडजोड खपवून घेतली जाणार नाही हा दृष्टीकोन ठेवून सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच त्याबाबतची जबाबदारी निश्चित करून त्या कामात निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नागरिकांमार्फत प्राप्त होणारे अभिप्राय, फिडबॅक हे आपल्या कामामध्ये सुधारणेची संधी आहे असे समजून त्यादृष्टीने त्यांच्याकडे बघावे व आपल्या कामात सुधारणा करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
शहरातील नागरिकांना आपल्या बांधकाम, पाडकामाच्या डेब्रीजची सुयोग्य विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने सुरु करून दिलेली ‘डेब्रीज ऑन कॉल’ सुविधा अधिक कार्यक्षम करून त्यासाठी उपलब्ध करून दिलेला 8898017009 या मोबाईल नंबर जास्तीत जास्त प्रसारित करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले. यासोबतच महानगरपालिकेचा सी ॲण्ड डी वेस्ट प्रकल्प अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.
शहर सुशोभिकरण ही आता नवी मुंबईची ओळख झालेली असून यावर्षी एमआयडीसी भागातील सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे ही चांगली गोष्ट असल्याचे सांगत आयुक्तांनी तेथील उद्योग समुहांकडून त्याच्या उद्योगाच्या पुढील परिसर सुशोभित करून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे असे सूचित केले.
प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांनी आता वेग घेतला असला तरी त्या नियमित सुरु ठेवून त्यासोबतच सोसायट्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना आत नेण्यास मनाई, महानगरपालिकेच्या दैनंदिन बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना प्रतिबंध अशी विशेष परिणामकारक ठरणारी कार्यवाही सुरु करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
उद्यानांचे शहर म्हणून नवी मुंबई नावाजली जात असून नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असणारी उद्यानांसारखी विरंगुळ्याची ठिकाणे सर्वोत्तम राहतील याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
स्वच्छ व सुशोभित शहर ही नवी मुंबईची ओळख असून ती टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज विषद करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शहर स्वच्छतेबाबत अधिक सतर्क राहून क्षेत्रीय स्तरावर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून व विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग घेऊन शहर स्वच्छतेची उंची वाढवावी असे निर्देश दिले.
Published on : 04-01-2023 10:35:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update