नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासह राष्ट्रीय मतदार दिवसाची सामुहिक प्रतिज्ञा


भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली असून 2011 पासून आयोगाचा स्थापना दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालयात महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी राष्ट्रीय मतदार दिवस प्रतिज्ञा सामुहिकरित्या ग्रहण केली.
या प्रतिज्ञेव्दारे लोकशाहीवर निष्ठा ठेवणारे आम्ही भारताचे नागरिक आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रवाहाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा घेतली.
मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरुक करण्यासाठी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असून विशेषत्वाने नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे तसेच सुलभरित्या त्यांच्या नाव नोंदणी करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, निवडणूक उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महानगरपालिका दि. 25 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मतदार जागृती सप्ताह राबवित आहे. या सप्ताहामध्ये विभाग कार्यालये, नमुंमपा मुख्यालय तसेच शहरातील मुख्य रस्ते याठिकाणी मतदार जनजागृती सप्ताहविषयीचे फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत. याशिवाय विविध ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली असून महानगरपालिकेच्या गल्लीबोळात जाणा-या घंटागाड्यांवरही या विषयीची घोषवाक्ये प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालय येथे आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. ज्यासोबत अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी तसेच मुख्यालयाला भेटी देणा-या नागरिकांनी सेल्फी काढून ते आपल्या सोशल मिडियावर स्टेटस ठेऊन प्रसारित केले आहेत.
Published on : 27-01-2023 14:43:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update