नवी मुंबईच्या गल्ली-चौकात उभी राहतेय स्वचछतेची चळवळ
नवी मुंबईच्या शहर स्वच्छता कार्यात विविध विभागांतील नागरिकांचाही नेहमीच सहभाग राहिला असून शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अनेक नागरिक समुहाने एकत्रित जमून स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवित आहेत, स्वच्छता मोहीमांमध्ये सहभागी होत आहेत.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्याचे निर्देश सर्व विभाग अधिकारी व विभागांना दिलेले असून त्यानुसार आठही विभागांमधील स्वच्छता उपक्रमांना वेग आल्याचे दिसून येत आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर विभाग व मॅंग्रोव्हज सोल्जर यांच्या सयुक्त विद्यमाने करावे खाडी किनारा परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून खारपुटीमध्ये अडकलेला तसेच आसपासच्या परिसरातील प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक कचरा तसेच इतर कचरा मोठ्या प्रमाणावर साफ करण्यात आला. मॅंग्रोव्हज सोल्जर ही संस्था सेवाभावी वृत्तीने दर सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीमा राबवित असून खारफूटी भागातील स्वच्छतेवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
अशाच प्रकारे वाशी येथील मिनी सी शोअर परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता मोहीम राबविली. याठिकाणी कचरा वर्गीकरण, कच-याची कंपोस्ट पिट्सव्दारे विल्हेवाट, प्लास्टिक प्रतिबंध अशा विविध विषयावर प्रबोधन करण्यात आले. तसेच स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली.
विविध स्वयंसेवी सस्थांच्या सहभागातून स्वच्छता मोहीमांना गतीमानता आली असून सेक्टर 7 सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यान व परिसर गार्डन ग्रुप सस्था आणि तुर्भे विभाग कार्यालय स्वच्छता विभाग यांच्या माध्यमातून साफ करण्यात आला. तसेच सानपाडा सेक्टर 5 येथील नमुंमपा शाळा क्र. 118 मध्ये विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाविषयी माहिती देत त्यांची स्वच्छतेविषयी मनोभूमिका तयार करण्यात आली. याप्रसंगी पथनाट्य स्पर्धेतील विजेते पथनाट्य सादर करण्यात आले.
प्रत्यक्ष सोसायट्यांमध्ये जाऊन महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व त्यांचे सहकारी नागरिकांशी थेट संवाद साधत असून त्यांना कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे तसेच कच-याची घरात कंपोस्ट बास्केटव्दारे अथवा सोसायटीच्या आवारात कंपोस्ट पिट्सव्दारे शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची माहिती करून दिली जात आहे. वाशी विभागात सेक्टर 17 येथील चढ्ढा क्रिसेंट सोसायटी, ऐरोली येथील सेक्टर 4 मधील फ प्रभाग असोसिएशन याठिकाणी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
अशाच प्रकारे वाशी सेक्टर 9 येथील कपडा मार्केटमध्ये व परिसरातील व्यापारी, नागरिक व ग्राहक यांच्याशीही संवाद साधून त्यांच्यामध्ये कचरा व्यवस्थापनाविषयी जागरुकता निर्माण करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी व कागदी पिशव्यांचा वापर कऱण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
अशाच प्रकारचा उपक्रम सेक्टर 4 ऐरोली येथील काळू राघो सोनावणे हरितपट्टा याठिकाणी राबविण्यात येऊन परिसर स्वच्छतेप्रमाणेच त्याठिकाणी विरंगुळ्यासाठी आलेल्या नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचे आवाहन कऱण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 50 हून अधिक कापडी पिशव्यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींप्रमाणेच सिनियर सिटीझन हेल्थ केअर फाऊंडेशन व योगा क्लासेसचे 55 प्रशिक्षणार्थी यांनी उत्साही सहभाग घेतला.
सेक्टर 8 सानपाडा येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडपामध्ये 500 हून अधिक नागरिकांशी किर्तनाच्या मंचावरून संवाद साधत त्यांना कचरा वर्गीकरण व ओल्या कच-याची कंपोस्ट पिट्सव्दारे विल्हेवाट लावण्याचे महत्व पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याविषयी जनजागृती करण्यात आली. अशाच प्रकारची जनजागृती मोहीम सेक्टर 3 नेरूळ येथील जयभवानी चौकात व्यापक स्वरुपात राबविण्यात आली.
स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने विविध भागांमध्ये मोहीमा राबविण्याप्रमाणेच शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार होण्याच्या दृष्टीने विविध शाळांमध्येही स्वच्छता उपक्रमांवर भर देण्यात आला. यामध्ये नमुंमपा शाळा क्र. 93 सेक्टर 50 नेरुळ येथील महानगरपालिकेच्या सीबीएसई बोर्ड शाळेमध्ये घरातील प्लास्टिक संकलन करून शाळेतून त्यावर पॉईंन्ट्स मिळविणा-या सर्वोत्तम पॉईन्ट्स प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. खाजगी व नमुंमपा शाळांतील 200 हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने यशस्वी झालेल्या या उपक्रमामुळे नवी मुंबईच्या लौकीकात भर पडली.
अशाच प्रकारे नमुंमपा शाळा क्र. 44 तळवली गांव येथील शाळा व परिसर स्वच्छता मोहीमेमध्ये स्वच्छतेची शपथ घेत शाळा स्वच्छ करण्यात आलीच शिवाय त्यासोबतच स्वच्छतेविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कोपरखैरणे विभागातील नागरिकांनी पुढाकार घेऊन केलेली शौचालय स्वच्छता मोहीम नागरिकांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे यशस्वीरित्या संपन्न झाली. तसेच यादवनगर ऐरोली येथील सार्वजनिक शौचालयांची अंतर्गत व बाह्य परिसर स्वचछताही स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत पार पाडली.
ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता हा परंपरा जतन करण्याचा ध्यास घेऊन युग निर्मिती प्रतिष्ठानचे सदस्य यांच्यासह कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी व सरस्वती कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी एकत्र जमत बेलापूर विभागाचे स्वच्छता निरीक्षक श्री. विजय नाईक व श्री. मिलिंद तांडेल यांच्या नियंत्रणाखाली सीबीडी बेलापूर येथील बेलापूर किल्ला गावठाण परिसरात स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविली.
नवी मुंबई शहर स्वच्छतेत जागरूक नागरिकांचे नेहमीच सक्रीय योगदान राहिले असून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट आहे हे लक्षात घेऊन नागरिक ज्या पध्दतीने मोठ्या संख्येने स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभागी होतात ही समाधान देणारी गोष्ट असून त्यामध्ये सातत्य राहण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विभाग अधिका-यांना दिलेल्या असून त्यानुसार लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे. या माध्यमातून निश्चय केला - नंबर पहिला हे ध्येय साध्य करण्यासाठी वाटचाल सुरु आहे.
Published on : 01-02-2023 13:29:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update