नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांनी मंजूर केला सन 2022-23 चा सुधारित व सन 2023-24 चा मूळ विकासाभिमुख जनसुविधाकारी अर्थसंकल्प

नवी मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प 2023-24
नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2022-23 चा सुधारित आणि सन 2023 - 24 चा मूळ अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांनी मंजूर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. जितेंद्र इंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे तसेच इतर विभागप्रमुखांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महापालिका आयुक्तांकडे सादर केली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु.1816.41 कोटी व जमा रू. 2706.36 कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु. 4522.77 कोटी आणि रु.3377.74 कोटी खर्चाचे सन 2022-23 चे सुधारित अंदाज, तसेच रु.1145.03 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह जमा रु.4925 कोटी व रु.4922.50 कोटी खर्चाचे आणि रु.2.50 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2023-24 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर व उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. तुषार दौंडकर यांनी आयुक्तांकडे सादर केले व मंजूर करण्यात आले.
तसेच नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक वृक्षप्राधिकरण सचिव तथा उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर यांनी आयुक्तांकडे सादर केले व तेही मंजूर करण्यात आले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे :-
* आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, स्वच्छता व शहर सुशोभिकरण या विषयांवर भर.
* गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा पूर्ततेला प्राधान्य.
* दुर्लक्षित समाज घटकांवर विशेष लक्ष देत नव्या जनकल्याणकारी योजनांचे नियोजन.
* कोणतीही करवाढ नाही.
* नागरी सुविधांसह लोककल्याणकारी चेहरा असणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भारत देशातीलच नव्हे तर जगातील उत्तम राहणीमान असणाऱ्या शहरांमध्ये नावाजल्या जाणाऱ्या ‘21 व्या शतकातील आधुनिक शहर’ म्हणून संबोधल्या जात असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2022-23 चे सुधारित आणि सन 2023-24 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमानुसार सादर करताना मला विशेष आनंद होत आहे.
शहरातील नागरी सुविधा कामांचा दर्जा उत्तम असावा याचे नेहमीच काटेकोर भान राखल्याने नवी मुंबईची प्रतिमा निवासयोग्य शहर म्हणून सर्वदूर पसरलेली आहे. येथील गुणात्मक नागरी सुविधांची समाधानकारक उपलब्धता व दर्जा, पर्यावरणशील भवताल, रोजगाराच्या संधी, दळणवळणाची साधने, सुरक्षित वातावरण या आणि अशा अनेक कारणांमुळे भारतातील सर्वोत्तम राहणीमान असणाऱ्या शहरांमध्ये नवी मुंबई पहिल्या 5 शहरांमध्ये आपले स्थान नियमितपणे टिकवून आहे.
स्वच्छता ही तर नवी मुंबईची ओळख बनलेली आहे. राज्य शासनाने सन 2002 मध्ये सुरु केलेल्या ‘संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता’ अभियानापासून, सन 2015 मध्ये राष्ट्रीय पातळीवर सुरु झालेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये नवी मुंबईने महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान सतत अबाधित राखला आहे. या सोबतच देशातील स्वच्छ शहरांमधील मानांकनही सतत उंचावत ठेवले आहे.
गतवर्षीच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्येही राज्यात सर्वप्रथम क्रमांक कायम राखत देशात तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबईने पटकाविलेला आहे. या सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरीत आपल्या सफाई कर्मचाऱ्यांपासून, नमुंमपा कर्मचारी-अधिकारी यांच्यासोबत येथील जागरुक लोकप्रतिनिधी, स्वच्छताप्रेमी सक्रिय नागरिक, प्रसारमाध्यमे यांचा महत्वाचा वाटा असल्याचे आवर्जुन नमूद करताना मला समाधान आणि अभिमान वाटतो.
देशातील कचरामुक्त शहरांमध्ये ‘फाईव्ह स्टार’ मानांकन प्राप्त करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे. यासोबतच हागणदारीमुक्त शहराच्या ‘ओडीएफ कॅटेगरी’ मध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ हे मानांकन प्राप्त करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमात्र शहर आहे.
याशिवाय केंद्र सरकारमार्फत नुकत्याच झालेल्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये ‘नवी मुंबई इको क्नाईट्स’ हा शहराचा स्वच्छता संघ स्थापित करुन नवी मुंबई महानगरपालिकेने अनेक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत.
ज्यामध्ये, एकाचवेळी 53 हजारहून अधिक युवकांना एकत्र आणून ‘युथ वर्सेस गार्बेज’ या स्वच्छताविषयक भव्यतम उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम युवक सहभागाचा प्रथम पुरस्कार लाभला. तसेच या उपक्रमाची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये झाली.
याशिवाय ‘इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत पामबीच मार्गावर स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त तिरंगा झळकवत केलेल्या 7500 मीटर मानवी साखळीच्या वैशिष्टयपूर्ण विक्रमाची नोंदही ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ ने घेतली.
त्याचप्रमाणे, सेक्टर 10 ए, मिनी सी शोअर, वाशी येथे 207 तृतीयपंथी नागरिकांनी एकत्र येत ‘स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग’ असा संदेश प्रसारित करुन राबविलेल्या आगळयावेगळया उपक्रमाची नोंदही ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये घेण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ मध्येही नवी मुंबईला महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाच्या पर्यावरणशील शहराचा बहुमान लाभला.
नागरी विकास कामांमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमास अर्थात एन.एम.एम.टी.ला केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ‘सर्वोत्तम वाहतुक व्यवस्था असलेले शहर’ या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अशा विविध पुरस्कार-सन्मानांमुळे नवी मुंबईच्या गुणवत्तापूर्ण सेवा पूर्ततेवर मानांकनाचा गौरवशाली ठसा उमटतो आहे, ही बाब निश्चितच आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची आहे.
मार्च 2020 पासून सुरु झालेल्या कोव्हीडच्या तीव्र प्रभावामधून जनजीवन सावरण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने वेळीच केलेल्या प्रभावी उपाययोजनांना सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी संपूर्ण सहकार्य केले, त्यामुळेच कोव्हीडचा प्रभाव नियंत्रित राखण्यामध्ये आपल्याला जलद यश मिळू शकले. कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यासोबतच कोव्हीड-19 लसीकरणामध्ये घेतलेली राज्यात आघाडी आणि लाटांच्या तीव्रतेनुसार वाढविलेल्या आरोग्य सुविधा या त्रिसूत्रीमुळे कोव्हीडपासून आपण जास्तीत जास्त संरक्षित राहिलो.
कोव्हीड प्रभावित कालखंडाचा जनजीवनावर झालेला तीव्र परिणाम लक्षात घेऊन यावर्षी अंदाजपत्रक सादर करताना नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अधिकचा आर्थिक बोजा पडणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षीच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.
अंदाजपत्रक सादर करताना कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नसली तरी नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवासुविधा पुरविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. महानगरपालिकेस प्राप्त उत्पन्नामधूनच नागरी सेवा-सुविधांची पूर्तता होत असल्याने महानगरपालिकेच्या महसूलात वाढ होण्याच्या दृष्टीने उत्पन्नाच्या काही नव्या स्त्रोतांचा शोध घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.
महानगरपालिकेमार्फत होणारी नागरी सुविधा कामे ही त्या कामांची गरज लक्षात घेऊन, प्राधान्यक्रम ठरवून करण्यावर यापुढील काळात भर दिला जाईल, जेणेकरुन खर्चावर सुयोग्य नियंत्रण राहील. त्यासोबतच ही कामे गुणवत्तापूर्ण असतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल. यासाठी मान्यताप्राप्त संस्थेमार्फत कामांचे त्रयस्थ लेखा परीक्षण करण्यात येईल.
कोणत्याही शासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थेचा केंद्रबिंदू हा नागरिक असतो, याची यथार्थ जाणीव ठेवत नागरिकांना विहित वेळेत कालबध्द सेवा पुरविणे याची बांधिलकी जपत अधिक प्रभावीपणे ‘लोकाभिमुख प्रशासन’ राबविण्यावर भर असणार आहे.
कोव्हीड कालावधीत अगदी सर्वसामान्य घटकांनी ऑनलाईन व्यवहारास प्राधान्य देण्यास सुरुवात केल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून आले. या अनुषंगाने ‘ई-गव्हर्नन्स’ वर भर देत महानगरपालिकेशी संबंधित विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा व सुरु असलेल्या सेवा अधिक सुविधाजनक व गतीमान पध्दतीने देण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी महानगरपालिकेची वेबसाईट आणि ॲप अधिक प्रभावी करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांना आपल्या कामांसाठी कमीत-कमी वेळा महानगरपालिकेच्या कार्यालयात यावे लागावे व त्यांना सध्याच्या तंत्रस्नेही जगात हातातील मोबाईलच्या एका क्लिकवर अधिकाधिक सेवा गतीमानतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृतीशील पावले उचलत पारदर्शक प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी ‘ई-गव्हर्नन्स’ वर भर देण्यात येईल, हे याठिकाणी विशेषत्वाने नमूद करतो.
¯ जमेच्या बाबी ¯
महानगरपालिकेस विविध करांच्या रुपाने उपलब्ध होणाऱ्या निधीमधून नागरी सेवा सुविधांची पूर्तता होत असते. त्यामुळे उत्पन्नाच्या बाबींकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वस्तू व सेवा (GST) करापोटी शासनाकडून मिळणारे सहाय्यक अनुदान व मुद्रांक शुल्क, इतर शासन अनुदाने नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता कर, नगररचना विभागामार्फत प्राप्त होणारे शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता उपयोगिता, विविध सेवा व इतर साधनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नांचा समावेश आहे.
उत्पन्नाच्या सर्व बाबी विचारात घेऊन सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे अंदाज वास्तववादी असण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यासोबतच साध्य करता येईल अशा लक्षांकाचा विचार करण्यात आलेला आहे. जमा व खर्चाचे अंदाज सादर करण्यात येत आहेत.
z मालमत्ता कर :-
« नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांवर (जमिनी व इमारती) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 127 व 129 अन्वये मालमत्ता कर आकारण्यात येतो. अधिनियमातील कलम 128 तसेच कराधान प्रकरण 8 नुसार मालमत्ता कर वसूली करण्यात येते.
« आजतागायत एकूण 329296 इतक्या मालमत्ता करनिर्धारीत करण्यात आल्या असून त्यामध्ये निवासी 263097, अनिवासी 60085 आणि औद्योगिक 6114 अशा मालमत्ता आहेत.
« माहे नोव्हेंबर 2022 अखेर रू.296.55 कोटी मालमत्ता कराची वसूली करण्यात आलेली असून माहे मार्च-2023 अखेर रू.278.44 कोटी अशी एकूण रु. 575.00 कोटी इतकी वसूली होईल अशी अपेक्षा आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये रू.801.00 कोटी जमा होतील असा अंदाज आहे.
मालमत्ता कर वसूलीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना :-
« कराचा भरणा सुलभपणे करता यावा याकरिता महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने तसेच Debit Card / Credit Card / Net Banking / NEFT / RTGS तसेच nmmc-e-connect या मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना कर भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच मालमत्ता कर देयकावर QR CODE डिजीटल सर्व्हिसद्वारे ऑनलाईन मालमत्ता कर भरणा सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. सदर ऑनलाईन सुविधेद्वारे गुगल-पे, पेटीएम, फोन-पे अशा सध्याच्या प्रचलित माध्यमांतूनही मालमत्ता कराचा भरणा करणे सुरू झालेले आहे.
« कर आकारणी विभागामार्फत नियमितपणे वाढीव बांधकाम, वापरात बदल तसेच अनधिकृत बांधकाम यांचे सर्वेक्षण करून अधिनियमातील तरतुदीनुसार कर निर्धारण करण्यात येते. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान प्रकरण 8, नियम 8 नुसार मालमत्ता धारकाकडून माहिती घेऊन तसेच जे मालमत्ता धारक स्वत:हून मालमत्तेमधील बदलाची माहिती महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून देतात त्यांचे नियमानुसार कर निर्धारण करण्यात येते.
« प्रलंबित मालमत्ता कराची वसूली प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके निर्माण करण्यात आलेली आहेत. यामध्ये मुख्यालय स्तरावरून सहा. कर निर्धारक व संकलक / प्रशासकीय अधिकारी तसेच विभाग कार्यालय स्तरावर अधिक्षक/वसूली अधिकारी व कर निरीक्षक अशी पथके तयार करण्यात आलेली आहेत.
« थकबाकीदारांना भेटी देऊन त्यांची मालमत्ता जप्त करणे, बँक खाती गोठवणे, इ. कारवाई करण्यात येते, परंतू औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता धारकांच्या थकीत मालमत्ता करावरील शास्ती / दंडाच्या रकमेवर मा. सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्तीची कारवाई न करणेबाबत (No Coercive Steps) आदेशित केले आहे. प्रलंबित मालमत्ता कराचा भरणा करावा व कटू कारवाई टाळण्यासाठी नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते.
« नगररचना विभागाकडून प्राप्त विकास परवानगीनुसार बांधकाम करून ज्या मालमत्ता धारकांनी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही, परंतू वापर सुरू केला आहे अशा मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांना नियमानुसार शास्तीसह कर आकारणी करण्यात येते.
« नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा विकास होत असताना येथील निवासी, व्यावसायिक व औद्योगिक मालमत्तांमध्ये वाढ झाल्याचे तसेच अनेक मालमत्तांमध्ये अंतर्गत बदल झाल्याचे निदर्शनास येत असून महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांची अत्याधुनिक लिडार प्रणालीद्वारे सर्वेक्षण कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वेक्षणात आढळलेल्या नव्या मालमत्तांची करनिर्धारणा करुन तसेच ज्या मालमत्तांमध्ये बदल करुन वाढ करण्यात आलेली आहे. अशा मालमत्तांचीही करनिर्धारणा करुन सुधारित मालमत्ता कर वसूलीची कार्यवाही करण्यात येणार आहे. याद्वारे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर उत्पन्नात लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे.
« निवासी / वाणिज्य इमारतींमधील मालमत्ता धारकांना स्वतंत्र देयक देण्यात येत आहे. पूर्वी संपूर्ण इमारतीचे एकच मालमत्ता कर देयक देण्यात येत होते. सदर इमारतीतील काही सदनिका/ दुकाने बंद असल्यास संपूर्ण इमारतींचा कर थकीत राहत होता. परंतू आता स्वतंत्र देयक देण्यात येत असल्याने तेथील रहिवाशांना आपला कर त्वरित भरणा करणे शक्य होत असून, कर न भरणाऱ्या तेथील थकबाकीदारांविरूध्द कारवाई करणे शक्य होत आहे.
z स्थानिक संस्था कर :-
« दि. 01 जुलै 2017 पासून शासनाने स्थानिक संस्था कर रद्द करुन वस्तू व सेवा कर (GST) लागू केल्याने महानगरपालिकेस होणा-या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून सहाय्यक अनुदान प्राप्त होत आहे. सन 2022-2023 या वर्षात शासनाकडून सहाय्यक अनुदान रक्कम रु. 1394.76 कोटी वसूली अपेक्षित आहे. सन 2023-2024 साठी शासनाकडून सहाय्यक अनुदान वसूली रक्कम रु.1506.35 कोटी अपेक्षित राहील.
« सन 2022-2023 या वर्षात 1% मुद्रांक शुल्क रक्कम रु.50.32 कोटी एवढी वसूली अपेक्षित आहे. सन 2023-2024 साठी मुद्रांक शुल्क वसूली रक्कम रु.60.00 कोटी अपेक्षित राहील.
« औद्योगिक क्षेत्र, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी व बांधकाम व्यावसायिक वर्गाकडून सन 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये रक्कम रु.13.01 कोटी एवढी वसूली होण्याची शक्यता आहे. त्यापैकी माहे नोव्हेंबर-2022 अखेरीस रक्कम रु.10.51 कोटी इतकी वसूली झाली असून माहे डिसेंबर-2022 ते मार्च-2023 अखेर पर्यंत रक्कम रु.2.50 कोटी इतकी वसूली अपेक्षित आहे. सन 2023-2024 या वर्षात स्थानिक संस्था करापोटी रक्कम रु.60.00 कोटी इतकी वसूली अपेक्षित आहे.
z नगररचना विभाग :-
« शासनाने दिनांक 02/12/2020 रोजी राज्यातील काही नियोजन प्राधिकरणे वगळता उर्वरित नियोजन प्राधिकरणांकरिता ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, 2020’ मंजूर केलेली असून ती दिनांक 03/12/2020 पासून अंमलात आलेली आहे.
« उक्त नियमावली अंमलात आल्यापासून म्हणजेच दिनांक 03/12/2020 नंतर प्रकल्पांच्या मंजूरीसाठी रस्त्याच्या रुंदीनुसार वाढीव चटई क्षेत्र देणेबाबत तरतूद समाविष्ट आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिडको विकसित धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणे बाबतचे प्रस्ताव नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर होत आहेत. वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करताना Premium FSI व Ancillary Area FSI बाबत तसेच सिडको विकसित पुनर्विकासासंबंधी आणि 30 वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासंबंधित नवी मुंबई महानगरपालिकेस विकास शुल्काच्या महसूलात वाढ अपेक्षित आहे.
« तथापि, उक्त नियमावलीतील तरतुदीनुसार व शासनाच्या वेळोवळी निर्गमित होणाऱ्या अधिसूचनांमुळे सिडकोकडील वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक व Ancillary Area FSI साठी ना हरकत दाखला आवश्यक आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाच्या दृष्टीकोनातून भारतीय विमान पत्तन विभागाचा व सिडकोनिर्मित धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाबाबत सिडकोचा ना हरकत दाखला आणि उक्त नियमावलीतील काही नियमांच्या बाबत शासनाकडून स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर विकासकांकडून भरघोस प्रतिसाद अपेक्षित आहे. सन 2023-24 करिता रक्कम रु.360.00 कोटी उद्दिष्ट गाठणे शक्य होणार आहे.
z मालमत्ता (ESTATE) विभाग :-
जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System) :-
« नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पर्यावरणपूरक शहराची संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने “जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System) व इलेक्ट्रीक बाईक प्रणाली” दि.01/11/2018 पासून M/s.YULU BIKES PVT. LTD. या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. त्याकरिता सद्यस्थितीत एकूण 96 ठिकाणी सायकल स्टॅण्डसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांकडून या प्रणालीस उत्तम प्रतिसाद प्राप्त होत असून 4,88,582 नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. या सायकलींच्या 15,08,799 राईड्स झाल्या असून 49,21,315 किमी प्रवास झालेला आहे व महत्वाचे म्हणजे यामधून 49,69,05,569 ग्रॅम इतके कार्बन क्रेडीट मिळालेले आहे. जन सायकल सहभाग प्रणालीच्या माध्यमातून सायकलचा वापर करणारे नवी मुंबई हे भारतातील सर्वात जास्त प्रतिसाद देणारे शहर ठरले आहे.
सिडको, एम.आय.डी.सी., शासनाकडून हस्तांतरित मालमत्ता :-
« नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या स्वत:च्या जागा नसल्यामुळे महानगरपालिकेस सिडको, एम.आय.डी.सी. व शासन यांचेकडून सार्वजनिक प्रयोजनाचे भूखंड हस्तांतरित करुन घ्यावे लागतात. आजमितीस सिडकोकडून विविध नागरी सुविधांचे 577 भूखंड हस्तांतरित झालेले असून 520 भूखंडांची सिडकोकडे मागणी करण्यात आलेली आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यात सार्वजनिक प्रयोजनार्थ अतिरिक्त भूखंड आरक्षित केलेले आहेत.
सर्वसमावेशक वाहनतळ धोरण (स्मार्ट पार्किंग पॉलिसी) :-
« नवी मुंबई शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करीत असून यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने नागरिकांना सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरासाठी प्रोत्साहित करणे, खाजगी वाहन वापरापासून परावृत्त करणे, उपलब्ध वाहनतळ जागेचा प्रभावी आणि परिणामकारक वापर करणे, वाहनांची वर्दळ, वाहतुक कोंडी, प्रदूषण कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वृध्दींगत व्हावी व शहराचा विकास "वाहनपूरक" शहर न होता “नागरिकपूरक” व्हावा असा विश्वास निर्माण करणेकरिता सर्वसमावेशक "स्मार्ट पार्किंग पॉलिसी" तयार करण्याचे व "सर्वसमावेशक वाहनतळांचे नियोजन" करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
« यामध्ये वाहनतळाच्या जागा विकसीत करण्यावर भर देणे, शक्य तेथे बहुमजली वाहनतळ उभारणे, नागरिकांना शहरामध्ये प्रवेश करताना किंवा अंतर्गतरित्या वाहनतळ कुठे उपलब्ध आहे याची माहिती सहजपणे ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी मोबाईल ॲप विकसीत करणे अशा विविध बाबींचा समावेश आहे.
z परवाना विभाग :-
« ई-गव्हर्नन्सव्दारे नागरिकांना सहज, सुलभ व गतीमान सेवा पुरविण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य ध्येय आहे. याच धर्तीवर परवाना विभागाकडून कामातील पारदर्शकता व लोकाभिमुख प्रशासन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमास अनुसरुन Ease of Doing Business च्या अनुषंगाने फक्त दोन कागदपत्रांच्या आधारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध परवाने / परवानगी उदा. जाहिरात परवाना, व्यवसाय परवाना, साठा परवाना, कारखाने / उद्योगधंदे परवानगी, सिनेमागृह खेळ (शो टॅक्स) व चित्रीकरण परवानगी इत्यादी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील व्यावसायिक हे आवश्यक परवाना / परवानगी घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील सुविधेचा वापर करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अशाप्रकारे ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारी नवी मुंबई महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे.
« जाहिरात व आकाशचिन्ह परवाना :- शहर सौंदर्यीकरणाच्या तसेच महानगरपालिकेस भरीव उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक खाजगी सहभाग (PPP) तत्त्वावर विविध जाहिरात माध्यमे (होर्डींग) उभारणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत खांबांवर जाहिरात लावणे, ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सामुदायिक / सार्वजनिक (CT/PT) शौचालयांच्या भिंतीवर जाहिरात करणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसथांब्यांवरील जाहिरातींचे जाहिरात शुल्क वसुल करणे, महापे उड्डाणपूल पॅनलवर जाहिरात करणे इत्यादी ठेक्यांपासून महानगरपालिकेस उत्पन्न प्राप्त होणार आहे.
« फेरीवाला परवाना :- पदपथावरील विक्रेते (उपजिविका संरक्षण व पदपथावरील विक्री विनियम) अधिनियम 2014 ला अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेने राज्यात पहिल्यांदाच बायोमॅट्रिक पद्धतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण दोन फेऱ्यांमध्ये पूर्ण केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या आधार क्रमांकाशी निगडीत ॲपचा वापर करुन हे सर्वेक्षण पूर्ण करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांच्या कागदपत्रांची छाननी करुन त्यांना पात्र/अपात्र ठरवून शहर फेरीवाला समितीची मंजूरी मिळाल्यानंतर पात्र पथविक्रेत्यांना नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे शहरातील फेरीवाल्यांवर नियंत्रण राहून रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त राहणार असून, फेरीवाला परवाना शुल्कापासून महानगरपालिकेस भरीव उत्पन्नही मिळणार आहे.
« उप आयुक्त (कामगार), ठाणे यांचेकडून नवी मुंबई कार्यक्षेत्रातील व्यवसाय करणाऱ्या 1,33,695 व्यवसाय धारकांची यादी घेण्यात आलेली असून त्यापैकी अंदाजे 30,000 आस्थापनांचे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 313 व 376 अन्वये व्यवसाय करणाऱ्या व्यवसायांचे सर्वेक्षण करून संबंधित व्यवसायांना नोटिस बजावून त्यांना परवाना दिल्याने विनापरवानगी व्यवसाय परवाना कक्षेत येतील व महानगरपालिकेच्या महसूलात वाढ होईल.
zअतिक्रमण विभाग :-
अनधिकृत बांधकामे निष्कासन वसूली, टोईंग व्हॅन, पदपथ / रस्त्यावरील बांधकाम साहित्य, मोबाईल टॅावर, मार्जिनल स्पेस वसूली :-
« सन 2023-24 करिता अतिक्रमणे निष्कासन या मार्फत वसूलीचे उद्दिष्ट रु. 3.00 कोटी इतके प्रस्तावित करण्यात येत आहे.
z पाणीपुरवठा विभाग :-
« नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असून त्याद्वारे नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
« सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची अंदाजे 17.60 लक्ष इतकी लोकसंख्या असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रतिदिन 460 द.ल.लि. पाण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी मोरबे धरणातून सरासरी 395 ते 400 द.ल.लि. पाणीपुरवठा होत आहे.
« महानगरपालिकेने पाणी खरेदीवरील खर्च कमी करण्याचे नियोजन करुन MIDC कडे जाणारी पाणी देयक रक्कम कमी करण्यासाठी पाण्याची बचत करुन ते पाणी सिडको क्षेत्र व जवाहर औद्योगिक क्षेत्र यांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे पाणी बचत होऊन महानगरपालिकेस उत्पन्न प्राप्त होत आहे.
« महानगरपालिका क्षेत्रातील गावठाणांमध्ये बांधलेल्या सर्व सदनिकांमध्ये पाणी देयके देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने पाणी बचत होऊन NRW कमी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे वार्षिक उत्पन्नात रु. 4.50 कोटी इतकी वाढ होऊन NRW देखील 1 ते 1.5% कमी झाला आहे.
« झोपडपट्टी भागात सन 2011 पर्यंतच्या संरक्षित झोपड्यांना मागेल त्याला नळजोडणी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून यामुळे वैयक्तिक नळजोडणीच्या संख्येत वाढ होऊन महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे. तसेच NRW कमी झाला आहे.
« सन 2011 नंतरच्या असंरक्षित झोपड्यांकरिता समुह नळजोडणी धोरण घेतल्याने पाणी बचत होत असून 100 % नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे.
« बेलापूर विभागामधील NRW कमी करणे व सुयोग्य पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी 24x7 पाणीपुरवठा सुरु करण्याच्या दृष्टीने कळंबोली ते सिबीडी अशी 38 वर्षे जूनी पाईपलाईन नव्याने टाकणे, बेलापूर विभागातील 31 कि.मी. जूनी पाईपलाईन बदलणे, 3 ठिकाणी भूमिगत व उच्चस्तरीय जलकुंभ बांधणे तसेच सर्व सदनिकांना मीटर बसविणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत.
« नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी देयकातून वार्षिक रु. 83.17 कोटी इतका महसूल प्राप्त होत आहे.
z प्रशासन विभाग:-
« शासन निर्णय दि.15/12/2022 अन्वये, शिक्षण विभागाच्या 1081 पदांच्या आकृतीबंधास शासन मान्यता प्राप्त झालेली आहे. तसेच जीवशास्त्रवेत्ता, हेल्थ सुपरवायझर, आरोग्य सहाय्यक/आरोग्य सहाय्यक (मलेरिया) या पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
« महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.संकिर्ण-2020/प्र.क्र.99/नवि-20, दि.04/08/2021 च्या अनुषंगाने या कार्यालयातील परिपत्रक क्र.नमुंपा/सा.प्र./आस्था-10/725/2022 दि.11/03/2022 अन्वये, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील नियमित अधिकारी/कर्मचारी तसेच तात्पुरत्या स्वरुपातील कंत्राटी कर्मचारी, करार/ठोक मानधन/वेतनश्रेणीवर नियुक्त/तदर्थ/रोजंदारी/मानसेवी तसेच बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त कंत्राटदाराच्या अधिपत्याखालील कार्यरत कंत्राटी कामगार जे कोविड-19 संबधित कर्तव्यावर कार्यरत नाहीत मात्र कोविड-19 या विषाणूजन्य आजाराने मृत्यू पावले आहेत, अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या पात्र वारसांना रुपये 5 लाख विशेष सानुग्रह सहाय्य लागू करण्यात आलेले आहे. त्यानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेतील व नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम यांचेकडील 5 मयत अधिकारी/कर्मचारी तसेच ठेकेदारांकडील 12 मयत अधिकारी/कर्मचारी असे एकूण 17 मयत अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्याची रक्कम प्रत्येकी रु.5 लक्ष अदा करण्यात आलेली आहे.
« नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय दि.30/03/2021 अन्वये, नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2021 ला मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांची बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गतची प्रकरणे मार्गी लावण्यात आलेली आहेत. त्यानुसार अद्यापपर्यंत 35 संर्वगातील एकूण 315 अधिकारी/कर्मचाऱ्यांना पदोन्नती व 50 संवर्गात एकूण 583 अधिकारी/कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच संवर्ग बदलाने वाहनचालक या संवर्गातून लिपिक संवर्गात एकूण 05 कर्मचारी यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे.
« नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय पदव्युतर महाविद्यालयाकरिता (PG INSTITUTE) प्राध्यापक संवर्गातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील पदे भरण्याकरिता जाहीरात प्रसिद्ध करुन 67 पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली आहेत.
« शासन निर्देशास अनुसरुन सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सरळसेवेच्या कोट्यातील संभाव्य रिक्त 500 पदांची भरती करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.
z कर्जमुक्त महानगरपालिका :-
« नवी मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) 10 % व्याजाने रु. 568.84 कोटी इतक्या रक्कमेचे कर्ज सन 2009 ते सन 2015 या कालावधीत विविध सुविधा कामांसाठी घेतले होते. सदर उर्वरित कर्जाची व्याजासह संपूर्ण रक्कम रु. 90.00 कोटी दिनांक 12/12/2022 रोजी परत केलेली आहे. महानगरपालिकेने कर्जाची परतफेड मुदतपूर्व केलेली असल्याने रु. 12.22 कोटी एवढी बचत झालेली आहे. आता नवी मुंबई महानगरपालिका कर्जमुक्त आहे.
¯ खर्चाच्या बाबी ¯
नवी मुंबई महानगरपालिकेस विविध करांच्या रुपाने प्राप्त होणाऱ्या महसूलातून नागरिकांना अपेक्षित व आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येत असून यामध्ये सर्व घटकांचा विचार करण्यात आलेला आहे. त्यादृष्टीने अपेक्षित उत्पन्नचा अंदाज घेऊन खर्चाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे.
z अभियांत्रिकी विभाग :-
प्रशासकीय / निवासी इमारती / इतर मालमत्ता बांधकाम :-
« कोपरखैरणे विभागातील सेक्टर 11, भूखंड क्र. 14 येथे अधिकारी व कर्मचारी निवासस्थान (Officer and Staff Quarters) बांधण्याचे काम हाती घेण्याचे नियोजन असून त्याकरिता रक्कम रु. 79.80 कोटी खर्च येणार आहे. त्याकरिता लेखाशिर्षांतर्गत भरीव तरतूद करण्यात आली आहे.
स्थापत्य कामे :-
« सिडकोने बांधलेल्या पामबीच मार्गातील वाशीच्या पुढे घणसोली ते ऐरोली या 1.95 किमी लांबीचा उर्वरित पामबीच रस्ता व पुढे ऐरोली-काटई रस्त्यास जोडणे असा एकत्रित 3.25 किमी लांबीच्या रस्त्यासाठी रक्कम रु. 372 कोटी इतका अंदाजित प्रकल्प खर्च आहे.
« शहर गतीशील योजनेअंतर्गत महापे उड्डाणपूलावर ठाणे-बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी आर्म (ARM) बांधणेचे काम प्रशासकिय मंजूरी प्रकियेत असून त्याकरिता “नवीन पूल बांधणे” या लेखाशिर्षांतर्गत रक्कम रु. 64.50 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
« MMRDA मार्फत ऐरोली-काटई या उन्नत मार्गाचे काम सुरु असून या उन्नत मार्गावरुन ठाणे-बेलापूर रस्त्यावर ऐरोली येथे उतरण्यासाठी व चढण्यासाठी रॅम्प बनविणेकरिता महानगरपालिकेने तांत्रिक अहवाल व नकाशे MMRDA कडे सादर केले आहेत. तसेच यासाठी MMRDA यांनी रु. 70 कोटी तरतूद केली असून हे काम निविदा स्तरावर आहे.
« बेलापूर विभागातील आम्र मार्ग ते से.11, 15, दिवाळेगांव मार्गे सायन-पनवेल महामार्गाला जोडणेसाठी Feasibility Report तयार केला असून अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
« सद्यस्थितीत वाशीकडून तुर्भे पुलावरुन एमआयडीसी क्षेत्रात फायझर मार्गे जायचे झाल्यास तुर्भे नाका येथे ठाणे बेलापूर मार्गाला छेदून जावे लागते. यामुळे ठाणेकडून बेलापूरकडे जाण्या-या वाहतुकीचा तुर्भेनाका येथे खोळंबा होतो. तसेच याठिकाणी वाहने समोरासमोर येत असल्याने वारंवार अपघात होत असतात.त्यामुळे तुर्भे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडणेसाठी मार्ग बांधल्यास ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतुक विनाअडथळा बेलापूरकडे जाईल व तुर्भे पुलावरील वाहतुकही विनाअडथळा फायझर रत्याकडे जाईल. यासंबंधी तांत्रिक व वित्तीय अहवाल (Feasibility Study) तयार करण्यात आला असून अर्थसंकल्पात तरतूद करणेत आली आहे.
« जुईनगर व सानपाडा यांचेमधून रेल्वेचे कारशेडमध्ये जाणेसाठी रेल्वे लाईन जाते. या ठिकाणी रेल्वे क्रॉसींग असून जुईनगर व सानपाडा मधील नागरिकांनाही रेल्वे क्रॉसींगवरुनच आपला प्रवास करावा लागत असल्याने या ठिकाणी अपघातही होत असतात. सदर रेल्वे क्रॉसींगचे ठिकाणी उड्डाणपूल बांधणेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करणेत आली आहे. हे काम निविदा प्रक्रियेत आहे.
« कोपरखैरणे व घणसोली या नोडमधील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहणेसाठी ठाणे बेलापूर रस्त्यावरुन महापे पुलापासून ते घणसोली येथील पामबीच पर्यंत पूल बांधणे आवश्यक आहे व यासंबंधी तांत्रिक व वित्तीय अहवाल (Feasibility Study) तयार करण्यात येऊन अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
« अरेंजा कॉर्नर सर्कल कडून येणा-या वाहनांना पुण्याकडे जाण्याकरिता वाशी शहराच्या शिवाजी चौकातून वाशी प्लाझाकडून सायन पनवेल हायवेवर यावे लागते किंवा पामबीच मार्गावरुन सायन पनवेल हायवेवर मुंबईकडे जाणारी मार्गीका चढून पुढे वाशी ब्रीजखालून यू टर्न मारुन पुण्याकडे जावे लागते. या दोन्ही ठिकाणी वाहतुक कोंडी टाळण्याकरिता सध्या सायन पनवेल महामार्गावरुन पाम बीचकडे उतरण्यासाठी असलेल्या रस्त्यालगत स्वतंत्र मार्गीका (Arm) बांधण्याचे काम प्रगतिपथवर आहे.
« नेरुळ नोडचे रेल्वे लाईनमुळे दोन भाग झाले असून या पूर्व व पश्चिम भागात जाणेसाठी रेल्वे मार्गावरुन राजीव गांधी उड्डाणपूल आणि सीवूड रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूल असे दोन उड्डाणपूल सद्यस्थितीत अस्तित्वात आहेत. त्यामुळे नेरुळ नोड मधील नेरुळ गांव, दारावे, करावे, से.21, 19, 16, 18 व से.28 या नोडमधील नागरिकांना पूर्ण नोडमधील रस्त्यांना मोठा वळसा घालून या दोन उड्डाणपुलांचा वापर करुन ये-जा करावी लागते. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त बंगला ते नेरुळ से.28 असा दोन मार्गीका असलेला उड्डाणपूल बांधणेबाबत मा.महासभेची प्रशासकीय मंजूरी घेऊन रेल्वेकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
« ठाणे-बेलापूर मार्ग व पामबीच मार्ग या रस्त्यांची मायक्रोसरफेसींग पद्धतीने सुधारणा करण्याचे काम हाती घेण्याचे नियोजन असून त्याकरिता भरीव तरतूद करण्यात आली आहे.
« नवी मुंबई टी. टी. सी. औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित रस्त्याचे क्राँक्रीटीकरण करणेकरिता टी. टी. सी. औद्योगिक क्षेत्रात “अडथळामुक्त रस्ते/फुटपाथ/गटारे बांधणे” लेखाशिर्षांतर्गत तरतूद करण्यात आली आहे.
परिवहन बस स्थानके विकास :-
« परिवहन बस स्थानके विकास अंतर्गत शहरातील वाशी से.9 येथील बस स्थानकाचे वाणिज्य संकुल उभारण्याचे सुरु असलेले विकास काम या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असून याप्रमाणेच कोपरखैरणे व सीबीडी-बेलापूर या परिवहन बस स्थानकांमध्येही वाणिज्य संकुल बांधणे प्रस्तावित आहे.
पंप हाऊस उभारणी :-
« पावसाळा कालावधीत सीबीडी व वाशी या रहिवाशी भागात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी साठून जनजीवन विस्कळीत होते. त्यासाठी बेलापूर से.12 व वाशी से.8 येथे पंप हाऊसचे काम चालू केले असून MCZMA ची परवानगी प्राप्त झाली आहे. सदर कामांचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत.
लिडार सर्वेक्षण :-
« शहरातील सर्व मालमत्तांचे LiDAR सर्वेक्षण सुरु केले आहे. यामुळे शहरातील सर्व मालमत्तांचे योग्य सर्वेक्षण होऊन सर्व मालमत्तांची माहिती संकलीत करणेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नाले व होल्डींग पॉन्ड यांची कामे :-
« येत्या आर्थिक वर्षात नमुंमपा क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिनी प्रणालीचे नुतनीकरण करुन सुशोभिकरण करणे प्रस्तावित आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 11 होल्डींग पॉन्ड व 67 किमीचे मोठे नाले असून 13 किमी नाल्यांचे काम पूर्ण झालेले आहे. पावसाळी कालावधीत पावसाचे पाणी शहरात तुंबू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत MCZMA कडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये से. 8, वाशी आणि से. 12, बेलापूर येथील पंपहाऊसला MCZMA ची परवानगी प्राप्त झालेली आहे. नाले बांधकाम व होल्डींग पॉन्ड मधील गाळ काढणे याबाबत IIT व सलीम अली इन्स्टिट्यूट यांचेमार्फत वर्षभरात होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या MCZMA च्या सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही सुरु केलेली आहे. तसेच महानगरपालिकेने से. 6, सीबीडी बेलापूर येथे पूरग्रस्त परिस्थिती उद्भवू नये व पाणी तुंबू नये यादृष्टीने नियोजन केले असून याबाबत आवश्यक तरतूद करण्यात आलेली आहे.
सायन्स पार्क :-
« नेरुळ से-19 ए मध्ये वंडर्स पार्क येथील 8.50 एकर क्षेत्रात अभिनव स्वरुपात सायन्स पार्क उभारण्यात येत असून “विज्ञान व तंत्रज्ञान” हे भविष्यात मानवी आयुष्याला कसे प्रभावित करील, या संकल्पनेवर आधारित आहे. विशेषत्वाने लहान मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणारा व त्यांच्या जिज्ञासेला माहिती पुरविणारा सायन्स पार्क हा प्रकल्प नवी मुंबईचा नावलौकिक उंचावणारा ठरणार आहे.
« सद्यस्थितीत सायन्स पार्कचे काम प्रगतीपथावर असून दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरु आहे. सायन्स पार्कचे संपूर्ण आरसीसी बांधकाम जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यासोबतच अंतर्गत सजावट व विज्ञान प्रकल्पाचे काम जागतिक तज्ज्ञ सल्लागारांचे सहकार्य घेऊन करण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पाकरिता रु. 123.00 कोटी इतका खर्च अपेक्षित असून याकरिता भरीव तरतूद करण्यात आली आहे.
दिवाबत्ती सुधारणा :-
« ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत नमुंमपा क्षेत्रात विविध ठिकाणी विदयुत रोषणाई करणे, तसेच जुने गंजलेले पोल बदलणे, जुन्या फिटींग बदलून नवीन एल.ई.डी. फिटींग लावणे व एमआयडीसी क्षेत्रात नव्याने एल.ई.डी. फिटींग लावणे, इ. कामे प्रस्तावित असून ‘दिवाबत्ती सुधारणा’ लेखाशिर्षांतर्गत भरीव तरतूद करण्यात आली आहे.
« सायन-पनवेल हायवेवरील दिवाबत्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्याने सायन-पनवेल हायवेवरील विद्युत पोल बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पथसंकेत :-
« पाम बीच मार्गावरील पथसंकेत Synchronize करणे, नमुंमपा क्षेत्रातील पथसंकेत ITMS करणे तसेच विविध ठिकाणी पथसंकेत उभारणेची कामे प्रस्तावित असून सदर लेखाशिर्षांतर्गत रक्कम रु. 7.40 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
व्यायामशाळा / समाजमंदिर / वाचनालय बांधणे / मंगल कार्यालय :-
« वाशी से.3 येथील बहुउद्देशीय इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या लग्नकार्यादि विविध समारंभासाठी सभागृह उपलब्ध होणार असून ते लवकरात लवकर वापरात आणण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही सुरु आहे.
ग्रंथालय सुविधा :-
« वाचनसंस्कृती वृध्दींगत करण्यासाठी नवी मुंबई शहरात सर्वसमावेशक बहुभाषी सेन्ट्रल लायब्ररी उभारण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरु आहे.
« झोपडपट्टी तेथे ग्रंथालय या संकल्पनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 झोपडपट्टयांमध्ये ग्रंथालये सुरु करण्यात येत आहेत.
« सीबीडी येथील मुख्य ग्रंथालय व शहरातील इतर ग्रंथालये यांची दुरुस्ती करुन त्यांना अद्ययावत स्वरुप देणे प्रस्तावित आहे.
विद्युत / गॅस दाहिनी उभारणे :-
« नमुंमपा कार्यक्षेत्रातील प्रत्येक विभागामध्ये विद्युत/गॅसदाहिनी उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी तुर्भे येथे PNG गॅस वाहिनी कार्यान्वित झाली असून बेलापूर, नेरुळ सारसोळे, कोपरखैरणे, घणसोली, से.20 ऐरोली, दिवागाव अशा 6 ठिकाणी गॅस वाहिनी प्रस्तावित आहे. सदर कामाकरिता एकूण खर्च रु. 18.00 कोटी अपेक्षित असून सदर लेखाशिर्षांतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे.
डेब्रीज प्रक्रिया प्रकल्प / कचऱ्यापासून खतनिर्मिती / वीजनिर्मिती प्रकल्प / कचरा प्रक्रिया केंद्र जागा खरेदी :-
« नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनासाठी व विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अन्वये विविध कामे करणे प्रस्तावित आहे. या अनुषंगाने तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बायोगॅस / बायो सीएनजी प्लान्ट पुरवठा करणे, बसविणे, बांधणे ही कामे पीपीपी तत्वावर करण्याचे नियोजन असून यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम रु.400.00 कोटी आहे. त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.
क्रीडासंकुल व मैदाने :-
« घणसोली से. 13 मधील भूखंड क्र. 1 येथे क्रीडासंकुल बांधणे प्रस्तावित असून सदर कामांकरिता “क्रीडासंकुल बांधणे” लेखाशिर्षांतर्गत तरतूद करण्यात आली आहे. तसेच ऐरोली, सानपाडा, सीबीडी, घणसोली व वाशी या विविध नोडमध्ये मैदाने विकसीत करणेसाठी रक्कम रु.19.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी मैदान तयार करणे :-
« नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दिव्यांगांसाठी etc केंद्र चालविण्यात येते. दिव्यांग मुलांसाठी etc केंद्रालगतच मैदान विकसीत करणे व दिव्यांग मुलांसाठी खेळाचे साहित्य बसविण्याचे नियोजन या आर्थिक वर्षात केलेले आहे.
नाट्यगृह :-
« महानगरपालिका क्षेत्रात वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृह आहे. या धर्तीवर घणसोली, ऐरोली, दिघा भागातील नागरिकांच्या मनोरंजन व विरंगुळ्यासाठी ऐरोली येथे नाटयगृह बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
तरणतलाव :-
« से.12 वाशी येथे इनडोअर स्टेडियम व बस स्थानक यांचे काम सुरु असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव उभारण्यात येत आहे. सदरचे काम प्रगतीपथावर असून मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दवाखाने बांधणे / इमारत खरेदी :-
« आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण करण्यासाठी तसेच नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ वैद्यकिय सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोपरखैरणे येथे 50 बेड्स क्षमतेच्या माता बाल रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच महापे येथे पीआर-1 भूखंडावर नागरी आरोग्य केंद्र बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे कोपरखैरणे से. 14 व से. 16 या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र बांधण्याचे काम आणि दिघा OS-१ भूखंडावरील सुविधा संकुलामध्ये माता बाल रुग्णालय बांधण्याचे काम सुरु केलेले आहे.
शाळा इमारती :-
« नवी मुंबई महानगरपालिकेने से.50 ए व से. 30, नेरुळ येथे शाळा इमारतींचे काम प्रगतीपथावर असून कोपरखैरणे व ऐरोली येथे नवीन शाळा इमारती बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध झालेले आहेत. याठिकाणी शाळा इमारती बांधण्याचे नियोजन आहे.
« अडवली-भूतावली शाळेत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या लक्षात घेऊन शाळेवर वाढीव तिसरा मजला बांधण्याचे काम निविदा प्रक्रियेत आहे तसेच श्रमिकनगर येथे शाळा बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सौरऊर्जा व जलविद्युत प्रकल्प :-
« मोरबे धरणावर 100 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा व 1.5 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले असून यासाठी एकच निविदा प्राप्त झाल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. यापुढे नमुंमपा क्षेत्रात महानगरपालिकेच्या शाळा, शौचालये येथे सौरदिवे लावण्याचे नियोजन असून स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शासकीय अनुदान मिळणे अपेक्षित आहे.
z पाणीपुरवठा विभाग :-
« सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची अंदाजे 17.60 लक्ष इतकी लोकसंख्या असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रतिदिन 460 द.ल.लि. पाण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातून सरासरी 395 ते 400 MLD पाणीपुरवठा होत असून महानगरपालिका क्षेत्राबाहेरील सिडको क्षेत्रास दररोज 50 MLD पाणीपुरवठा नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत केला जातो. सद्यस्थितीत महानगरपालिका क्षेत्रात दिघा, समता नगर ऐरोली, ऐरोली से.3, कोपरखैरणे, इंदिरानगर, हनुमाननगर, तुर्भे स्टोअर्स, वाल्मिकीनगर घणसोली, नेरुळ ब्रह्मगिरी HSR, से.9 सीबीडी HSR, शिरवणे, वाशी से.8 येथे नवीन जलकुंभ बांधणेची कामे सुरु आहेत. तसेच से. 10 वाशी येथे जलकुंभ बांधण्याचे काम निविदा प्रक्रियेत आहे.
« भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथे एम बी आर बांधणे व इतर कामांसाठी रक्कम रु. 35.00 कोटी, कळंबोली रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन नवीन पाईपलाईन टाकणे या कामासाठी रक्कम रु. 20.00 कोटी व नेरुळ ते महापे मुख्य जलवाहिनी बदलणे या कामासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
मोरबे धरण :-
« मोरबे धरण प्रकल्पाच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी 15 वा वित्त आयोग अंतर्गत 150 द.ल.लि. क्षमतेचे नवीन फिल्टर हाऊस बांधणे, त्याचप्रमाणे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने 2.5 द.ल.लि. क्षमतेचा नवीन MBR बांधणे प्रस्तावित आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मोरबे धरण ते कळंबोलीपर्यंत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे बळकटीकरण करण्याचे काम प्रस्तावित आहे.त्याचप्रमाणे नवी मुंबई शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नवीन जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी या अंदाजपत्रकात एकूण रक्कम रु. 114.36 कोटी एवढ्या रक्कमेची तरतूद केली आहे.
z मलनि:स्सारण :-
अमृत योजना-1.0 :-
« शासनाच्या अमृत योजना-1 प्रकल्पांतर्गत कोपरखैरणे व ऐरोली मलप्रक्रिया केंद्र येथे सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करुन पुनर्वापर करण्याचे प्रकल्प (Trickling Filter Treatment Plant) कार्यान्वित करण्यात आले असून त्यामधून 40 MLD पुनर्प्रक्रियायुक्त पाणी पुनर्वापर करणेसाठी उपलब्ध झाले आहे. या पुनर्प्रक्रियायुक्त पाण्यापैकी 6 MLD पाण्याचा उपयोग प्रायोगिक तत्वावर उद्योगसमुहांमध्ये औद्योगिक वापरासाठी केला जात असून महानगरपालिकेची उद्याने फुलविण्यासाठी तसेच परिवहन उपक्रमातील वाहने धुणेसाठीही उपयोग होत आहे. अशाच प्रकारे बेलापूर व नेरुळ येथेही सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापरासाठी पाणी उपलब्ध करणेसाठी जादा क्षमतेचे Trickling Filter Treatment Plant बसविण्याचे नियोजन आहे.
अमृत योजना -2.0 :-
« अमृत 2.0 योजने अंतर्गत भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने जीर्ण झालेल्या जुन्या पाण्याच्या टाक्या निष्कासित करून नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे प्रस्तावित आहे. तसेच बेलापूर विभागात 24 X 7 पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने कळंबोली ते बेलापूरपर्यंत MIDC ने टाकलेली जूनी 800 मी.मी. व्यासाची जलवाहिनी बदलणे व वितरण व्यवस्था सक्षमीकरणासाठी आवश्यक ती कामे करणे प्रस्तावित आहे .त्याचप्रमाणे शहरातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी अमृत 2.0 योजनेअंतर्गत DMA ( District Meter Area ) पर्यंत SCADA यंत्रणा बसविणे प्रस्तावित आहे.
« अमृत 2.0 योजने अंतर्गत शहरात नवीन मलउदंचन केंद्र बांधणे व जुन्या मलउदचंन केंद्रातील विद्युत व यांत्रिकी मशिनरी बदलणे तसेच सेक्टर-12 सी.बी.डी.येथे 7.50 द.ल.लि क्षमतेचे Tertairy Treatment Plant बांधणे व यादवनगर येथे 2.0 द.ल.लि. क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र बांधणे प्रस्तावित आहे.
« ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ व धारण तलाव, कोपरखैरणे या दोन ठिकाणी Water Body Rejuvenation ची कामे करणे प्रस्तावित आहेत.
« अमृत-2.0 योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने रु. 1233.00 कोटी रक्कमेचे 28 प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले असून त्यापैकी 11 प्रस्तावांना राज्य शासनाकडून तांत्रिक मान्यता व 3 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. या 3 प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे. सदर मंजूर 11 प्रस्ताव एकूण रु. 455.00 कोटी इतक्या रक्कमेचे असून यामधील 70% रक्कम राज्य व केंद्र शासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नमुंमपा कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा व्यवस्था व मलनि:स्सारण व्यवस्थापन सक्षम होणार आहे.
z पर्यावरण :-
पर्यावरण – ग्रीन हाऊसिंग कन्सेप्ट, सोलार हिटर, वॉटर रि-सायकलिंग :-
« नवी मुंबई शहरातील शुध्द हवेच्या गुणवत्तेची मानके राष्ट्रीय विहीत मर्यादेत आणण्याकरिता राबविण्यात येणा-या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस रु. 5.85 कोटी निधी उपलब्ध झालेला आहे.
« यामध्ये धुलीकणामुळे होणारे वायू म्हणून प्रदूषण कमी करण्यासाठी व हवेची गुणवत्ता टिकविण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून रस्ते सफाई करताना धुलीकणामुळे वायू प्रदूषण होऊ नये म्हणून 2 विशिष्ट प्रकारची मशीन्स खरेदी करण्यात आलेली आहेत.
« सायन-पनवेल महामार्गावर डी. वाय. पाटील स्टेडियम भागात हरित पट्टा विकसित करण्यात आला आहे. तसेच अन्य मोठ्या शहरांमध्ये बसविल्याप्रमाणे एअर प्युरिफिकेशन टॉवर हे अधिक प्रमाणात वायू प्रदूषण असेल अशा भागात NCAP च्या निधीतून बसविण्याचे नियोजन आहे.
« नवी मुंबई महानगरपालिकेस 15 व्या वित्त आयोगामध्ये राष्ट्रीय हवा गुणवत्ता प्रमाणक कमी करण्यासाठी रु. 58.00 कोटी इतके अनुदान प्राप्त झालेले आहे. या अनुषंगाने शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते प्रक्रियाकृत पाण्याने धुणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ वाढवणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इलेक्ट्रीक बसेस खरेदी करणे, शासन नियमानुसार अधिकारी, पदाधिकारी यांचेकरिता वाहन खरेदी करताना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे तसेच स्मशानभूमीत गॅस दाहिनी वापरणे, पुनर्विकासासाठी इमारती तोडल्यानंतर डेब्रिजची (सी ॲन्ड डी वेस्ट) योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी त्यातून विटा, पेव्हर ब्लॉक तयार करुन डेब्रिजचा पुनर्वापर करणे प्रस्तावित आहे.
z माहिती तंत्रज्ञान / संगणक :-
सी सी टिव्ही यंत्रणा उभारणे :-
« नवी मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका क्षेत्रात सर्व एन्ट्री पॉईंट, खाडी किनारे, ऐरोली - मुलुंड ब्रीज, ठाणे-बेलापूर रस्ता, शहरातील मुख्य चौक, गार्डन, बसडेपो, मार्केट जागा, वर्दळीची सर्व ठिकाणे, महानगरपालिकेची सर्व कार्यालये इत्यादी महत्वाच्या ठिकाणी हाय डेफिनेशन फिक्स कॅमेरे, पीटीझेड, वाहनांची गती देखरेखीसाठी स्पिडींग कॅमेरे, लायसन्स प्लेट कॅप्चरिंग कॅमेरे, थर्मल कॅमेरे, पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा, Public Annoucement System, व्हिडीओ सर्व्हिलन्स मॅनेजर, कमांड कंट्रोल संगणक प्रणाली, डेटा सेंटर व सर्व्हर यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम रु.154.34 कोटी इतका प्रकल्प खर्च आहे.
« सद्यस्थितीत नियोजित 1500 सीसीटीव्हींपैकी 600 हून अधिक ठिकाणी सीसीटीव्हींकरिता पोल उभारण्यात आले असून त्यावर कॅमेरे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या संपूर्ण प्रणालीचा नियंत्रण कक्ष नमुंमपा मुख्यालयात असून त्याचेही काम पूर्णत्वास आले आहे. याद्वारे शहर सुरक्षेचे अधिक सक्षमीकरण होणार आहे.
z घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष :-
सन 2022 – 23 मधील कामाची फलश्रुती :-
« नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सलग पहिला क्रमांक व देशामध्ये तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे.
« ‘कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार मानांकन’ प्राप्त झाले असून नवी मुंबई हे राज्यातील पंचतारांकित एकमेव शहर आहे.
« त्याचप्रमाणे हागणदारीमुक्त शहरांच्या ODF कॅटेगरीत ‘वॉटर प्लस’ हे सर्वोच्च मानांकन राज्यात केवळ नवी मुंबई शहरानेच प्राप्त केलेले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्याचे 100 % उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केलेले आहे.
« सन-2022 मध्ये प्रथमच आयोजित ‘इंडियन स्वच्छता लीग’ या देशपातळीवरील स्पर्धेमध्ये एकूण 1800 शहरांमधून “Engagement of Youth in India Vs Garbage” या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. सदर मोहिमेमध्ये एकाच वेळी शहरातील एकूण 53,000 मुलांनी सहभाग घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये विक्रम नोंदविला आहे.
« सदर ‘इंडियन स्वच्छता लीग’ कार्यक्रमांतर्गत 200 हून अधिक तृतीयपंथी (Transgender) नागरिकांनी देखील ‘मॅनग्रुव्हज् क्लिनींग ड्राइव्ह’ मध्ये सहभाग दर्शविला. या अभिनव सहभाग उपक्रमाचीही ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये विक्रमी नोंद झालेली आहे.
« स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 7500 मीटर लांबीच्या तिरंग्यासोबत मानवी साखळी तयार करुन ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये विक्रम नोंदविण्यात आलेला आहे.
« ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेअंतर्गत ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे टाकाऊ यंत्रभागापासून बनविण्यात आलेल्या 28.5 फूट उंच फ्लेमिंगो प्रतिकृतीची विक्रमी नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये करण्यात आलेली आहे.
स्वच्छता विषयक उल्लेखनीय उपक्रम :-
« नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कचऱ्याचे ओला व सुका वर्गीकरण करण्यात येत असून यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला सामोरे जाताना त्यामध्ये तिसऱ्या प्रकारच्या घरगुती घातक कचऱ्याचा (Hazardous waste) समावेश करण्यात आलेला आहे. त्यासाठी काळ्या रंगाच्या कचराकुंडयांचा पुरवठा करण्यात येत असून घरगुती घातक कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करुन विल्हेवाट लावण्यात येत आहे.
« नमुंमपा कार्यक्षेत्रात झोपडपट्टी भागातील घनकचरा व्यवस्थापन योग्य रितीने होण्यासाठी पाच झोपडपट्टयांमध्ये ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल उपक्रम’ राबविण्यास सुरुवात झाली असून यापुढील काळात इतरही झोपडपट्टयांमध्ये व गांव-गावठाणांमध्ये ही प्रणाली राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याद्वारे ‘शून्य कचरा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
« स्वच्छता कार्यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळ्यांवर विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून विभागाविभागांमध्ये स्वच्छता कार्याविषयी निकोप स्पर्धा असावी, यादृष्टीने विभाग कार्यालय पातळीवर ‘स्वच्छ मंथन’ या स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक विभागात झालेल्या स्वच्छता कामाचा तिमाही आढावा घेतला जात असून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास ‘स्वच्छ मंथन फिरता चषक’ प्रदान करुन प्रोत्साहित केले जात आहे.
« विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच स्वच्छतेची गोडी वाढावी यादृष्टीने ‘ड्राय वेस्ट बँक’ ही अभिनव संकल्पना महानगरपालिका शाळांमधून राबविण्यास सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने सर्वच शाळांमध्ये हा आगळावेगळा उपक्रम राबवून स्वच्छता कार्याला गती दिली जाणार आहे.
« लहान मुलांमध्ये स्वच्छतेविषयक जागरुकता निर्माण व्हावी याकरिता “स्वच्छ बाल महोत्सव” चे आयोजन करुन ‘माझे शहर माझा सहभाग’ व ‘3R’s ( Reduce, Reuse, Recycle)’ या विषयावर भव्यतम चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.
« नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाश्यांना कचरा वर्गीकरण व प्रक्रिया तसेच इतर स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणेकरिता स्वच्छ सोसायटी, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ मार्केट, स्वच्छ शाळा, स्वच्छ शासकीय कार्यालय व स्वच्छ प्रभाग अशा विविध गटांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
« नवी मुंबईकर नागरिकांच्या स्वच्छता विषयक संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने स्वच्छ जिंगल, स्वच्छ नृत्य, स्वच्छ पथनाट्य, स्वच्छ लघुपट अशा अभिनव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लवकरच ‘स्वच्छ छायाचित्र स्पर्धा’ व ‘स्वच्छ रिल्स व्हिडीओ स्पर्धा’ जाहीर करण्यात येत आहे.
« नागरिकांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छता यशस्वी होणे शक्य नाही हे लक्षात घेऊन विविध प्रकारच्या स्वच्छता उपक्रमांमध्ये व्यापक लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे व्यापक स्वरुपात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छताविषयक उपक्रमांची माहिती सर्व समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करुन नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे.
z उद्यान विभाग :-
« ‘माझी वसुंधरा 2022-23’ अभियानात महाराष्ट्र राज्यात नवी मुंबईस प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
« रबाळे एम.आय.डी.सी. क्षेत्रातील रस्ता दुभाजकाचे सुशोभिकरण करणेचे काम पूर्ण झाले असून शहरातील इतर मुख्य रस्त्यांचेही सुशोभिकरण करण्यात आले आहे.
« नमुंमपा मुख्यालय, बेलापूर ते अरेंजा सर्कल तसेच वाशी विभागातील मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांत शोभिवंत झाडे-झुडपे लावून सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
« उद्यानांमध्ये नागरिकांना विरंगुळ्याच्या दृष्टीने खेळणी व बेंचेस बसविण्यात आलेले असून काही उद्यानांमध्ये ओपन जीम सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा होऊन त्यांच्या फिटनेस सेंटर व व्यायामशाळेसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये बचत झाल्याचे दिसून येत आहे. या सुविधेला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन शहरातील इतर उद्यानांमध्येही नागरिकांच्या मागणीनुसार ओपन जीम बनविणे प्रस्तावित आहे.
« नवी मुंबई शहरातील नागरिकांना शुद्ध व प्रदुषणमुक्त हवा मिळावी व त्यांचे आरोग्य चांगले रहावे, या दृष्टीने शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व संवर्धनावर भर देण्यात येत आहे. शहरातील जागेची कमतरता लक्षात घेता कमी क्षेत्रात जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याच्या दृष्टीने मियावाकी पद्धतीच्या शहरी जंगल निर्मितीकडे विशेष लक्ष दिले जात असून विविध सामाजिक संस्था या सीएसआर निधी अंतर्गत वृक्षलागवड करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
« या अंतर्गत निसर्ग उद्यान, सेक्टर 14, कोपरखैरणे येथे 60 हजार देशी वृक्षरोपांचे मियावाकी फॉरेस्ट विकसित करण्यात आले असून 40 हजार वृक्षरोपांच्या पुढच्या टप्प्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेक्टर 28, नेरूळ येथे होल्डींग पाँड परिसरात मियावाकी फॉरेस्ट करण्याचे कामे पूर्ण झालेले आहे. ज्वेल पार्क येथे मियावाकी पध्दतीने 1 लाख 35 हजार देशी प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली असून हे देशातील मियावाकी पध्दतीचे सर्वात मोठे शहरी जंगल आहे.
« आगामी काळात शहरातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यावर्षी ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात 20 हजाराहून अधिक देशी प्रजातींच्या वृक्षरोपांची तसेच सुशोभित झाडे-झुडुपांची लागवड करण्यात येत आहे.
« उद्यानांमधील सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा विषय असून पहिल्या टप्प्यात शहरातील अधिक वर्दळीच्या उद्यानांमध्ये CCTV बसविण्यात येत आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
z आरोग्य विभाग :-
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 3 सार्वजनिक रुग्णालये, 3 माता बाल रुग्णालये, 23 नागरी आरोग्य केंद्रे व 1 फिरता दवाखाना अशा आरोग्य सुविधा नागरिकांकरिता उपलब्ध केलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय नेरुळ व ऐरोली येथील रुग्णखाटांची क्षमता प्रत्येकी 150 होती त्यात वाढ करण्यात आलेली असून आता ती अनुक्रमे 280 व 200 इतकी वाढविण्यात आलेली आहे. त्यासोबतच खाटांच्या अनुषंगाने त्यासाठी आवश्यक असणारी वैदयकीय सेवा व वैदयकीय उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
पदव्युत्तर वैद्यकीय संस्था (Post Graduate Medical Institute) :-
« सार्वजनिक रूग्णालय वाशी, नेरूळ व ऐरोली तसेच माता बाल रूग्णालय बेलापूर, तुर्भे आणि सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे येथील उपलब्ध सेवा/ सुविधा व उपचारार्थ येणाऱ्या रूग्णांची संख्या त्याचप्रमाणे आवश्यक चाचण्या इ. आकडेवारीचा संकलित अभ्यास केला असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांची संख्या लक्षात घेता तज्ज्ञ डॉक्टर्सची आवश्यकता भासत असल्याने पदव्युत्तर वैद्यकिय संस्था (Post Graduate Medical Institute) सुरू करणेची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली असून National Medical Commission कडून सदर संस्थेच्या तपासणी बाबतची प्रक्रिया कार्यप्रणालीत आहे. या संस्थेतून तीन वर्षात एकूण 66 इतके डॉक्टर पदव्युत्तर पदवी प्राप्त करुन घेऊ शकतील. त्यामुळे सदर संस्थेत MD शिक्षण/ प्रशिक्षण घेणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा लाभ नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयीन सेवेसाठी होऊ शकेल. या संस्थेत शैक्षणिक वर्ष सन 2023- 2024 पासून विदयार्थी प्रत्यक्ष प्रवेश घेऊ शकतील, असे नियोजन करण्यात आलेले आहे.
NICU बेड :-
« सार्वजनिक रुग्णालय नेरुळ, वाशी व ऐरोली येथे NICU बेडची संख्या यापूर्वी 50 इतकी होती. ती वाढवून आता एकूण 110 इतकी करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचा फायदा प्रसुतीनंतरच्या बाल रुग्णाच्या उपचारासाठी केला जातो व सदर सुविधा वाशी, नेरुळ, ऐरोली या नमुंमपा रुग्णालयात 24 तास उपलब्ध आहे.
P.A.C.S ( पॅक्स्) :-
« पॅक्स म्हणजे Picture Archiving and Communcation System (P.A.C.S.) होय. परंपरागत विकिरण (Radiology) पध्दतीला नवीन आयाम देणारी ही यंत्रणा असून जुन्या पध्दतीत लागणारा वेळ आणि अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर या यंत्रणेद्वारे ब-याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. याद्वारे आजार निदानासाठी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्तींना मुख्यत्वे डॉक्टरांना या यंत्रणेद्वारे चांगली मदत होते. आरोग्य सेवेतील विविध उपकरणे (1) सोनोग्राफी (USG), (2) डिजीटल क्ष-किरण (Dr. System), (3) संगणकीय क्ष-किरण (CR-System), (4) मॅम्मोग्राफी, (5) सी.टी.स्कॅन, (6) एम.आर.आय., (7) पेट स्कॅन (PET Scan) याद्वारे प्राप्त चित्रांचे P.A.C.S. ही यंत्रणा संकलन व प्रसारण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्यास मदत करते. विविध उपकरणांमधून प्राप्त चित्रफितींची गुणवत्ता कायम राखत डिजीटल माध्यमांत त्याचे संकलन व आवश्यक ठिकाणी त्याचे प्रसारण आणि अमर्याद काळासाठी त्याचे जतन करण्यासाठी P.A.C.S. ही यंत्रणा खूप उपयुक्त आहे.
« नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सदर P.A.C.S. ही यंत्रणा राबविणे प्रस्तावित आहे.
नवीन प्रस्तावित N.I.C. ई हॉस्पिटल Module चे फायदे :-
« ही कागद विरहीत (Paperless) अशी यंत्रणा आहे. यामध्ये QR Code द्वारे “आयुष्यमान भारत हॉस्पिटल क्रमांक” (AABHA) प्रत्येक रुग्णासंदर्भात निर्माण केला जातो. त्याद्वारे रुग्ण माहितीचे संकलन, जतन होते आणि भविष्यात त्या माहितीचा पुनर्वापर करण्यास मदत होते. या यंत्रणेच्या आधारे रुग्णांच्या गर्दीचे नियोजन करण्यास खूप मदत होते. रुग्णांची वैयक्तिक माहिती व आजारविषयक माहिती या आधारे त्यावर उपचार करण्यास किंवा इतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास या Module चा फार उपयोग होतो. यातून रुग्ण, डॉक्टर व तज्ज्ञ सर्वांचा वेळ देखील वाचतो.
« पूर्वापार चालत आलेल्या रुग्णविषयक अभिलेखांचे या पध्दतीत संगणकिय जतन होते. यामुळे ती माहिती वेळेत प्राप्त करणे, ती गहाळ होण्यापासून टाळणे या सुविधा मिळतात. नमुंमपाच्या वाशी, ऐरोली आणि नेरुळ येथील 3 महत्वाच्या रुग्णालयांमध्ये Module – II व बेलापूर, तुर्भे स्थित माता बाल रुग्णालये आणि नमुंमपा हद्दीतील 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे येथे Module – I राबविण्याचे प्रस्तावित आहे. नजिकच्या काळात रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने उपयोगी असे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय यासाठी देखील ही Modules अंमलात आणण्यासंदर्भात N.M.C. कडून निर्देशित केलेले आहे. त्या अनुषंगानेही ही Modules महत्वाची ठरणार आहेत. N.I.C. च्या या यंत्रणेसाठी एकूण रक्कम रु. 40.27 लक्ष इतका खर्च अपेक्षित आहे.
MRI :-
« नवी मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक रुग्णालय, वाशी हे 29 ते 30 वर्षे रुग्णसेवेसाठी 24 तास कार्यरत आहे. सध्या वाशी येथील “क्ष-किरण” विभागात “क्ष-किरण तपासणी” व “CT Scan” या सुविधा रुग्ण तपासणी व निदान करण्यासाठी वापरल्या जातात. सदर सेवा ह्या नमुंमपा क्षेत्रातील गरीब व गरजू लोकांसाठी अत्यल्प शुल्क घेऊन उपलब्ध करुन दिल्या जातात.
« तथापि, अधिक प्रभावी तपासणीकरिता तसेच अत्यवस्थ रुग्णांकरिता अचूक व योग्य निदानाकरिता MRI सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी सेंटरमध्ये जाऊन MRI सुविधा उपलब्ध करुन घ्यावी लागते. ही सेवा काहीशी महागडी असल्याने रुग्ण त्या चाचणीस दिरंगाई करतात. त्यामुळे योग्य व अचूक निदानाकरिता नमुंमपाच्या रुग्णालयात MRI सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.
मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा सुरु करणेबाबत :-
« नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी / नेरूळ / ऐरोली येथे कार्यरत सार्वजनिक रुग्णालयांमध्ये मायक्रोबायोलॉजी विभाग नसल्याने रुग्णांच्या मायक्रोबायोलॉजीच्या तपासण्या बाहेरून करून घेतल्या जातात. नवी मुंबई महानगरपालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था कार्यान्वित करण्याचे काम कार्यालयीन प्रणालीमध्ये आहे. त्यामुळे रुग्णांना गुणात्मक व तात्काळ सेवा देण्याच्या अनुषंगाने मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सुरू करणे बंधनकारक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
OTO ACAUSTIC EMISSION (OAE) HYPOTHYROID /M-CHART SCREENING:-
« सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ व वाशी येथे बाल रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने OAE SCREENING विनामूल्य सुरु करण्यात आलेली नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बालरुग्णांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे बाल रुग्णांच्या वेळीच चाचण्या केल्यामुळे / मूकबधीर बाळांना वेळेत उपचार मिळू शकतील किंवा त्यावर योग्य औषधोपचार केले जाऊ शकतील.
शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र (UHWC) :-
« नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासनाने एकूण 17 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राना मंजूरी दिलेली आहे, त्यापैकी 3 ठिकाणी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित होत असून 5 ठिकाणी कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे व उर्वरित केंद्रे सुरु करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. या सुरु होणाऱ्या केंद्रामध्ये बाहयरुग्ण विभाग (OPD), लसीकरण व आरोग्य विषयाबाबत कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेची स्वमालकीची RTPCR LAB :-
« नवी मुंबई महानगरपालिकेची स्वमालकीची RTPCR LAB सुरु करण्यात आलेली असून कोविड कालावधीमध्ये त्यामध्ये कोविड रुग्णांच्या प्रति दिन एकूण 5000 इतक्या चाचण्या करण्यात येत होत्या. सध्या दैनंदिन रुग्णांच्याही इतर चाचण्या या लॅबमार्फत करण्यात येत आहेत.
z etc अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र :-
एकाच छताखाली सर्वप्रकारच्या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा उपलब्ध करुन देणारे देशातील एकमेव केंद्र म्हणून नावलौकिक असणाऱ्या ईटीसी केंद्राने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित दिव्यांग सक्षमीकरणाला नवे स्वरुप दिले आहे. यावर्षीच्या अंदाजपत्रकातही असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.
सन 2023-2024 मधील नियोजित उपक्रम :-
नेरुळ व ऐरोली येथे शीघ्र हस्तक्षेप केंद्र स्थापन करणे:-
« जन्मलेल्या मुलांपैकी सुमारे 10% मुले कोणत्या ना कोणत्या दिव्यांगत्वामुळे ग्रस्त असल्यामुळे यासारख्या दिव्यांगत्वाचे लवकरात लवकर निदान झाल्यास त्यांच्यावर तत्परतेने योग्य उपचार सुरु करुन दिव्यांगत्व कमी करण्याची एक संधी प्राप्त होते. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त क्षमता साध्य करण्यासाठी मदत होते. या संकल्पनेतून नमुंमपा क्षेत्रातील प्रत्येक विभागामध्ये शीघ्र हस्तक्षेप केंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
« लाभार्थी: वय वर्ष 0 ते 06
« मनुष्यबळ: भौतिकोपचार, व्यवसोपचार, वाचा व भाषा तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, विशेष शिक्षक तसेच बालरोग तज्ज्ञ
« तरतूद: रु. 3.12 कोटी
RESPITE CARE CENTER (दिव्यांग काळजी केंद्र)
नेरुळ व बेलापूर येथे दिव्यांग काळजी केंद्र स्थापन करणे :-
« दिव्यांग मुलांच्या पालकांना तसेच पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या इतर दैनंदिन जबाबदारी पार पाडण्यास सहकार्य करण्याकरिता दिव्यांग मुले तथा व्यक्तींकरिता ‘दिव्यांग काळजी केंद्र’ स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. सदरच्या केंद्रामध्ये पालक तसेच पालकत्व धारण करणारे व्यक्ती या दिव्यांग व्यक्तीस दिवसभरातून 01 ते 06 तासापर्यंत ठेवू शकतील. या केंद्रामध्ये येणाऱ्या दिव्यांग मुले तथा व्यक्तींकरिता गायन, चित्रकला, हस्तकला, विविध खेळानुरुप प्रशिक्षण, योगा, नृत्य याबाबत दिवसभराचे नियोजन असेल.
« लाभार्थी : नमुंमपा क्षेत्रातील सर्व वयोगटातील दिव्यांग मुले तथा व्यक्ती
« तरतूद : रु. 2.87 कोटी
दिव्यांग मुले तथा व्यक्तींची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस अर्थसहाय्य देणे :-
« वय वर्ष 0 ते 18 वयोगटातील सर्व दिव्यांग प्रवर्गातील मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस दरमहा रक्कम रुपये 3,000/- तसेच वय वर्ष 18 वरील तीव्र तथा अतितीव्र दिव्यांग व्यक्तींची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस दरमहा रक्कम रुपये 5,000/- अर्थसहाय्य देणे.
« लाभार्थी : 1. वय वर्ष 0 ते 18 वयोगटातील सर्व दिव्यांग प्रवर्गातील मुलांची काळजी
« घेणाऱ्या व्यक्ती
- वय वर्ष 18 वरील तीव्र तथा अतितीव्र दिव्यांगांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती
नमुंमपा क्षेत्रातील विशेष संस्था / रिसोर्स सेंटर / थेरपी सेंटरमध्ये दिव्यांग मुले तथा व्यक्ती शिक्षण, प्रशिक्षण व थेरपी करिता येत असल्यास त्या संस्थेस प्रति दिव्यांग मूल तथा व्यक्तींप्रमाणे दरमहा रक्कम रुपये 3,000/- अर्थसहाय्य देणे :-
« लाभार्थी: नमुंमपा क्षेत्रातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग मुले तथा व्यक्ती
खेळाडू प्रशिक्षण व साहित्याकरिता अर्थसहाय्य देणे :-
« खेळाडू प्रशिक्षण व साहित्याकरिता अर्थसहाय्य देणे योजनांमध्ये,
योजना क्र. 02- दिव्यांग मुले तथा व्यक्तींसाठी शिष्यवृत्तीकरिता अर्थसहाय्य योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे.
« योजना क्र. 03- दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे.
विविध योजना / शिबीरे / उपक्रम :-
« नमुंमपा ईटीसी केद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ 4013 दिव्यांग व्यक्तींनी घेतला आहे.
« नमुंमपा ईटीसी-केंद्रामध्ये शिक्षण व प्रशिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक, वैद्यकीय तज्ञ यांच्यामार्फत शिक्षण, प्रशिक्षण व थेरपी सत्र राबविण्यात येते.
« नमुंमपा ईटीसी-केंद्रामध्ये नमुंमपा क्षेत्रामध्ये वास्तव्य करणारी दिव्यांग मुले तथा व्यक्तींसाठी वैश्विक ओळखपत्र UDID ऑनलाईन अर्ज भरणे व वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड सहज उपलब्ध होणे या दृष्टीकोनातून ईटीसी केंद्रात दिव्यांग मुले व व्यक्तींकरिता वैश्विक ओळखपत्र UDID कार्डचे शिबीर राबविण्यात आले.
« नमुंमपा ईटीसी-केंद्रामार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नमुंमपा क्षेत्रातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 21 प्रवर्गातील दिव्यांगाचे जनजागृतीपर विविध कार्यक्रम पपेट शो, पथनाटय राबविण्या आले तसेच बॅनर, होर्डीग लावून व वॉकेथॉनचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली.
« स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत ईटीसी केंद्रात विविध प्रवर्गातील दिव्यांगाकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
« नमुंमपा ईटीसी केंद्र व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंध प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
« नमुंमपा ईटीसी केंद्रामार्फत विशेष शिक्षक, पालक निम्न वैद्यकिय कर्मचारी व दिव्यांग विद्यार्थ्याकरिता राज्यस्तरिय व देशपातळीवरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
z मालमत्ता (ESTATE) विभाग :-
« सिडको,एम.आय.डी.सी.,शासनाकडून हस्तांतरित मालमत्ता :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या स्वत:च्या जागा नसल्यामुळे महानगरपालिकेस सिडको, एम.आय.डी.सी. व शासन यांचेकडून सार्वजनिक प्रयोजनाचे भूखंड हस्तांतरित करुन घ्यावे लागतात.
« आजमितीस सिडकोकडून विविध नागरी सुविधांचे 577 भूखंड हस्तांतरित झालेले असून 520 भूखंडांची मागणी सिडकोकडे करण्यात आलेली आहे. या 520 भूखंडांपैकी सन 2023-24 या आर्थिक वर्षात भूखंडाच्या अधिमूल्याकरिता रु. 100.00 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
« बेलापूर विभागातील वैद्यकिय प्रयोजनार्थ भूखंडासाठी रु. 56.00 कोटी इतकी रक्कम सिडकोस अदा करण्यात आली असून भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
« दिव्यांग स्टॉल :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यादृष्टीने मा.महासभा ठराव क्र.1952, दि.14/09/2017 अन्वये 103 दिव्यांगाना अल्प मासिक शुल्क आकारुन जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अन्य दिव्यांग बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देणेच्या हेतूने “प्रतिक्षा यादी” तयार करुन 714 पैकी प्रथम प्राधान्यक्रमानुसार 330 दिव्यांगाना जागा वाटप करण्याकरीता सोडत काढण्यात आलेली असून स्टॉल वाटपाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्याकरिता भूखंड खरेदीसाठी रु.10.00 कोटी सिडकोस रक्कम अदा करण्यात आलेली आहे व स्टॉल करिता रु.5.75 कोटी खर्च होणार आहे.
« उर्वरित दिव्यांग अर्जदारांना सिडकोकडून जागेची मागणी करण्याचे प्रस्तावित आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना व्यवसायासाठी 4.5 चौ.मी. क्षेत्रफळावर ठेवता येतील असे स्टॉल सिडकोने स्टॉल प्रयोजनाकरिता राखीव ठेवलेल्या जागेवर ठेवता येतील व आवश्यकतेप्रमाणे स्थलांतरीत करता येतील अशा 384 स्टॉलची आवश्यकता लागणार आहे. त्याकरिता अंदाजे रु.7.00 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
« बहुउद्देशीय इमारत विनियोग :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, जुईपाडा, कोपरखैरणे, ऐरोली या 5 ठिकाणी वातानुकुलीत व बिगर वातानुकुलीत सुविधा असलेल्या बहुउद्देशीय इमारतींमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना लग्नकार्य, मुंज, साखरपुडा, विविध कार्यशाळा, मेळावे, सभा, प्रदर्शन, बैठका व वाढदिवस इत्यादी प्रयोजनाकरिता अतिशय सवलतीच्या दरात मा.महानगरपालिका सर्वसाधारण सभेने ठराव क्र.378, दि.18/05/2018 अन्वये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वाजवी दराने सभागृहे उपलब्ध करुन देण्यात येतात. सदर इमारतींची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थापन याकरिता रु.5.00 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
z क्रीडा व सांस्कृतिक विभाग :-
« नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील क्रीडापटू व कलावंतांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता महापौर चषकांतर्गत विविध क्रीडा व कला प्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी रक्कम रु.200.00 लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत नमुंमपा निवडणूक झालेली नसल्याने सदर स्पर्धा नवी मुंबई महानगरपालिका चषक अशा शिर्षकांतर्गत आयोजित करण्यात येतात.
« महानगरपालिका क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना जिल्हयाचा दर्जा प्राप्त झाल्याने क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे निश्चित केलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी रक्कम रु.30.00 लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे.
« शहरातील विविध विभागात क्रिकेट, ॲथेलेटिक्स, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमींग आणि व्हॉलीबॉल इ. खेळांची महानगरपालिकेमार्फत सर्व सुविधा असलेली प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये मल्लखांबसारख्या पूर्णत: देशी खेळाचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. याकरिता रु.80.00 लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे.
« बेलापूर प्रमाणेच सर्व विभागांमध्ये प्रत्येकी एक परिपूर्ण खेळाचे मैदान विकसीत करणे आणि इतर सर्व मैदाने खेळण्यायोग्य करण्यावर भर देण्यात येत आहे.
« शासकीय शालेय जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंबरोबरच नव्याने जिल्हा व राज्यस्तरावरील प्राविण्यप्राप्त खेळाडूंनासुध्दा क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या प्रस्तावास मा.सर्वसाधारण सभेने मंजूरी दिलेली असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. क्रीडा शिष्यवृत्तीकरिता रु. 150.00 लक्षची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
« शासनाने निर्देशित केलेनुसार उदयोन्मुख व होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्दात्त हेतूने कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करण्यात आलेले आहेत. याकरिता रु.100.00 लक्षची तरतूद करण्यात आलेली आहे.
« महानगरपालिकेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या व्यायामशाळा इमारतीमध्ये अद्ययावत फिटनेस सेंटर सुरु करणेकरिता रु.200.00 लक्षची तरतूद करण्यात आलेली आहे.
z समाजविकास विभाग :-
सन 2023-24 मधील प्रस्तावित नवीन उपक्रम :-
तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष निर्मिती :-
« नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तृतीयपंथी व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याच्या दृष्टीने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
« तृतीयपंथी व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी कौशल्यवर्धीत प्रशिक्षण देणे तसेच त्यांना स्वावलंबी बनविणेसाठी स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य देण्याचे नियोजन आहे.
ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र :-
« महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 100 व्यक्तींकरिता ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र कार्यान्वित करुन स्वयंसेवी संस्थेमार्फत सदर केंद्राचे संचलन व देखभाल करण्याचे प्रस्तावित आहे.
आदिवासी घटकांसाठी विविध योजना :-
« अडवली-भूतावली व कातकरीपाडा येथील घरकुल योजनेअंतर्गत सदनिका वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना गॅस पुरवठा करणेकरिता अर्थसहाय्य वितरित करणे.
« मुला-मुलींकरिता रोजगार उपलब्ध करुन देणेसाठी साहित्य संच पुरवठा करणे, तसेच वाहन परवाना धारकांना तीन चाकी रिक्षाकरिता अर्थसहाय्य देणे. (प्रवासी व मालवाहतुक)
« गरजू महिला, पुरूष व मंडळे यांना कॅटरींग साहित्य, बँजो साहित्य व मंडप साहित्य घेणेसाठी अर्थसहाय्य देणे.
« आदिवासी घटकातील मुला-मुलींना प्रशिक्षण देणे.
शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी योजना :-
« शरीरविक्रय व्यवसायातून बाहेर येण्याकरिता इच्छुक महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याकरिता विविध व्यावसायिक साहित्य संच देणे.
« या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे.
« या महिलांच्या मुलीच्या विवाहाकरीता अर्थसहाय्य देणे.
« या महिलांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देणे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच अनुदान व अर्थसहाय्य वितरण :-
« नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध लाभार्थ्यांकरिता 41 प्रकारचे कौशल्यवर्धित प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे, याकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
« नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेत जाणाऱ्या इ. 1 ली ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध 6 घटकांतर्गत सन 2021-22 व सन 2022-23 आर्थिक वर्षातील शिष्यवृत्ती वितरित करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु आहे.
« आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झालेल्या महिलेस एकरकमी अनुदान देणे या योजने अंतर्गत 202 एवढया लाभार्थ्यांना रक्कम रू. 25,000/- याप्रमाणे अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना अनुदान देणे या योजने अंतर्गत एकूण 23 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« अनाथ, निराधार, विधवा व परित्यक्त्या मुलीच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य देणे या योजनेअंतर्गत एकूण 56 लाभार्थ्यांना रु. 65000/- या प्रमाणे अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« कोविड-19 कालावधीमध्ये कोविडमुळे दोन पालक गमावलेल्या किंवा कोविडमुळे एक पालक मयत झालेल्या मुलांच्या संगोपनाकरिता अर्थसहाय्य देणे या योजनेअंतर्गत एकूण 172 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« कोविड-19 कालावधीमध्ये कोविडमुळे पती मयत झालेल्या महिलेस अर्थसहाय्य देणे या योजने अंतर्गत एकूण 35 लाथार्थ्यांना प्रति लाभार्थी रु. 1.5 लक्ष याप्रमाणे अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील दुर्धर आजार असलेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेअंतर्गत 49 लाभार्थ्यांना रु. 25,000/- या प्रमाणे अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« मागासवर्गीय घटकांतर्गत आंतरजातीय विवाहाकरिता अर्थसहाय्य देणे या योजनेअतंर्गत प्रती लाभार्थी रक्कम रू. 50,000/- या प्रमाणे एकूण 39 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« मागासवर्गीय घटकांतर्गत मागासवर्गीय महिलेस मुलीचे विवाहकरिता अर्थसहाय्य देणे या योजनेअतंर्गत प्रती लाभार्थी रक्कम रू. 50,000/- या प्रमाणे एकूण 12 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« मागासवर्गीय घटकांतर्गत इ. 12 वी नंतरचे व्यावसायिक वैद्यकिय (MBBS, BAMS, BHMS, BUMS, BDS), अभियांत्रिकी, संगणक, एम.बी.ए. यासारखे उच्च शिक्षण (पूर्ण वेळ) घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कांचे अर्थसहाय्य देणे या योजनेअंतर्गत एकूण 04 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« मागासवर्गीय घटकांतर्गत महाविद्यालयीन/अभियांत्रिकी संगणक प्रशिक्षण घेत असलेल्या लाभार्थ्यांना संगणक/लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे या योजनेअंतर्गत 01 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« प्रकल्पग्रस्त घटकांतर्गत उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेअतंर्गत एकूण 44 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यात आलेले आहे.
« नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 ऑक्टोबर 2022 रोजी विष्णुदास भावे नाटयगृह येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
« नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळे व महिला संस्था यांच्याकरिता विष्णुदास भावे नाटयगृह येथे दि.03 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
« राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बेघर व्यक्तीसाठी घणसोली येथे 103 व्यक्तींक्षमतेची राहण्याची व्यवस्था असलेले सुसज्ज निवारा केंद्र बांधण्यात आलेले आहे.
« राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत दारिद्रय रेषेखालील महिला तसेच दिव्यांग व्यक्तींचे 58 बचत गट स्थापन करण्यात आलेले असून प्रती बचत गट रु. 10,000/- या प्रमाणे त्यांना फिरता निधी वितरित करण्यात आलेला आहे.
« राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत 13 महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी बॅंकेमार्फत अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेले आहे.
« प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत एकूण 22920 पथविक्रेत्यांचे अर्ज भरण्यात आलेले असून 9650 पथविक्रेत्यांना प्रती लाभार्थी रू. 10,000/- प्रमाणे बॅंकेकडून कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. तसेच 7953 लाभार्थ्यांचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आलेले आहे.
« नवी मुंबई महानगरपालिका संचालित 67 शाळा व 24 ग्रंथालय अशा एकूण 91 ठिकाणी सॅनेटरी नॅपकीन व्हेंडीग मशीन खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले असून मशीन खरेदी करणेची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे व यापुढील कार्यवाही जलद करुन घेण्यात येत आहे.
« नवी मुंबई महानगरपालिका संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे 14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 26 नोव्हेंबर - संविधान दिन, 6 डिसेंबर - महापरिनिर्वाण दिन व 03 जानेवारी - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त मान्यवर व्यक्तींची विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली.
z अग्निशमन विभाग :-
वाहने खरेदी :-
« नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये उंच इमारतींचे प्रमाण जास्त असून, आगामी काळामध्ये अशा प्रकारच्या उंच इमारतींची संख्या वाढणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाकडे अशा प्रकारच्या उंच इमारतींमध्ये फायर फायटींग व बचावकार्य करण्यासाठी एकूण 03 वाहने वापरात होती. त्यामधील 02 वाहनांचे निर्लेखन करुन विक्री करण्यात आली आहे. अग्निशमन विभागाच्या आवश्यकतेचा विचार करुन, उंच इमारतींमध्ये फायर फायटींग करण्याकरिता 01 नग 68 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. सदरचे वाहन खरेदीसाठी बँकामार्फत Letter of Credit उघडण्यात आले असून सन 2023-24 करिता रक्कम रु. 12.50 कोटी तरतूद ठेवण्यात आलेली आहे.
« नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गांवठाण व झोपडपट्टी क्षेत्रामध्ये अरुंद रस्ते असल्याने या ठिकाणी फायर इंजिन वाहने पोहचण्यास अडचण निर्माण होत असते. अशा वर्दीच्या ठिकाणी फायर इंजिन वाहनापेक्षा कमी व्हील बेस असलेली 05 नग रॅपिड इन्टरवेन्शन वाहने, तसेच 02 नग फायर इंजिन व 01 नग रेस्क्यु टेंडर वाहन अशी एकूण 08 नग फायर फायटींग व रेस्क्यू वाहने खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.
« अग्निशमन विभागासाठी 01 नग वॉटर ब्राउझर, 60 मीटर उंचीचे टॉवर मॉनिटरसह वाहन खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.
« अग्निशमन विभागासाठी 01 नग एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन व Turbo Hydro Jet vehicle / Rescue vehicle - 01 नग खरेदी करणे प्रस्तावित आहे.
« वरील बाबींचा विचार करुन, अग्निशमन विभागासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकामध्ये ‘वाहने खरेदी’ या लेखाशिर्षामध्ये रु.59.48 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
यंत्रसामुग्री खरेदी :-
« महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसुरक्षा उपाययोजना अधिनियम, 2006 अन्वये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या इमारतींचे भोगवटाधारक यांनी अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारतीची कायमस्वरुपी आग विझविणी यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचे शासन मान्यताप्राप्त अभिकरणांमार्फत “ब” प्रमाणपत्र अग्निशमन विभागात दिलेल्या मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यवसायधारकांनी देखील व्यवसायासाठी अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक फिटनेस सर्टिफिकेटचे वेळोवेळी नूतनीकरण करणे गरजेचे आहे. परंतू, बहुतांश भोगवटाधारक व व्यवसायधारक वेळोवेळी सदरची प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूल उत्पन्नाचे नुकसान होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील ही बाब धोकादायक आहे. वरील बाबींचा विचार करुन, अशा प्रकारच्या इमारतीधारक/ व्यवसायधारक यांच्यावर देखरेख करणे व वेळेवर ना हरकत दाखला नूतनीकरण करणेकरिता त्यांना प्रवृत्त करणेसाठी अग्निशमन विभागामार्फत Fire Safety Governance Software तयार करण्यासाठी कार्यादेश देण्यात आले असून, सदरचे काम प्रगतीपथावर आहेत.
« अग्निशमन विभागासाठी इलेक्ट्रीक डी वॉटरिंग पंप जनरेटरसह खरेदीसाठी GeM पोर्टलद्वारे कार्यादेश देण्यात आले आहे.
« अग्निशमन विभागात वर्दीवर काम करताना अग्निशमन कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ जॅकेट व रिंग बोई, स्मोक एक्स्ट्रॅक्टर, पोर्टेबल हाय प्रेशर फायर फायटींग पंप, इनफ्लेटेबल लाईट मास्ट, Piercing Nozzle, Combination Branch, Small Gears & Fitting, Wireless System, Cooling Vest, B.A Set, Under Water Search Camera, Fire Safety Governance Software, Virtual Reality Fire Fighting Training Kit अशी सुरक्षा साधने व यंत्रसामुग्री खरेदी करणे प्रस्तावित आहे.
« वरील बाबींचा विचार करुन, अग्निशमन विभागासाठी ‘यंत्रसामुग्री खरेदी’ या लेखाशिर्षामध्ये रु.5.37 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
फायरमन विमा :-
« नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत महापालिका क्षेत्रामध्ये उद्भवणा-या विविध आपत्कालीन परिस्थिती व बचावकार्य करण्याचे काम केले जाते. अशा वर्दीवर अग्निशमन विभागातील जवानांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अग्निशमन विभागातील अधिकारी/ कर्मचा-यांसाठी प्रत्येकी रु.10 लक्ष ग्रुप कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसी काढणेबाबतची निविदा प्रकिया सुरू आहे.
« वरील बाबीचा विचार करुन, अग्निशमन विभागासाठी ‘फायरमन विमा' या लेखाशिर्षामध्ये रु.1.40 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
z शिक्षण विभाग :-
« नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत बालवाडी विद्यार्थ्यांना इस्कॉन संचालित मे.अन्नामृत फाऊंडेशन यांच्यामार्फत मध्यान्ह भोजन पुरवठा करण्यात आला आहे. याकरिता एकूण रक्कम रू.1.72 कोटी खर्च झालेला आहे.
« शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तू स्वरुपात मिळणाऱ्या साहित्याचे (उदा. वह्या, ऑल सिजन बूट / मोजे, पी.टी.बूट/मोजे, दप्तर, रेनकोट तसेच शालेय गणवेश) देय रोख रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात DBT योजनेअंतर्गत जमा करणेत आलेली आहे. याकरिता एकूण रक्कम रू. 3.12 कोटी खर्च झालेला आहे.
« नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत बालवाडीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाकरिता बाक (Desk & Bench) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. याकरिता एकूण रक्कम रू. 3.67 कोटी खर्च झालेला आहे.
« नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक अपुरे असल्याने शाळेच्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांकरिता बाक (Desk & Bench) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. याकरिता एकूण रक्कम रू. 2.91 कोटी खर्च झालेला आहे.
« नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेकरिता आवश्यक कार्यालयीन फर्निचर साहित्य (टेबल, खुर्ची, बोर्ड, कपाट, लॉकर, बोर्ड इ.) भांडार विभागाकडील दरकरारानुसार खरेदी करुन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. याकरिता एकूण रक्कम रू. 72.00 लक्ष खर्च झालेला आहे.
सन 2023-24 या वर्षातील उपक्रम :-
« शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षाकरिता नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश, पी.टी. गणवेश व स्काऊट गाईड गणवेश पुरवठा करणे प्रस्तावित आहे. याकरिता वार्षिक रक्कम रु. 10.00 कोटी खर्च अपेक्षित आहे.
« शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुस्वरुपात मिळणाऱ्या साहित्याचे (उदा. वह्या, ऑल सिजन बूट/मोजे, पी.टी.बूट/मोजे, दप्तर, रेनकोट तसेच शालेय गणवेश) देय रोख रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर DBT योजने अंतर्गत जमा करणेत प्रस्तावित आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी नवीन योजना :-
« नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांच्या बळावर ॲथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, फुटबॉल इ. विविध खेळांमध्ये त्यांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेत निवड झालेली असते. मात्र राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन व त्यांना आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे आवश्यक आहे. यादृष्टीने जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या नमुंमपा शाळांतील विदयार्थ्यांना खेळाचे योग्य प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक नेमण्याकरिता प्रति महिना मानधन रु.5000/- प्रमाणे आणि साहित्य खरेदीसाठी प्रति विदयार्थी रु.15000/- प्रमाणे तसेच पोषक आहारासाठी प्रति महिना रु.5000/- इतकी रक्कम तीन वर्षापर्यंत वितरित करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहनपर योजना :-
« नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील जे विद्यार्थी चित्रकलेमधील (1) एलिमेंटरी परीक्षा आणि (2) इंटरमीजिएट परीक्षा उत्तीर्ण होतील अशा विदयार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता आणि चित्रकला साहित्य उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.
« नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा व राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेत प्राविण्य प्राप्त करतात अशा विद्यार्थ्यांची भारतातील नामांकित वैज्ञानिक संस्था येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी मासिकांची वार्षिक वर्गणी व मोबाईल ॲप सुध्दा महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार आहे.
« नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी व्यवसाय मार्गदर्शक प्रशिक्षण व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.
z परिवहन विभाग :-
« समाधानकारक व सुरक्षित प्रवासी सेवा पुरविण्यासाठी कटीबध्दता राखत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची बससेवा सद्यस्थितीत 75 बस मार्गांवर, 2628 दैनंदिन बसफेऱ्यांच्या माध्यमातून 1,15,452.6 किमी अंतर पार करीत 2.80 लक्ष प्रवाशांना सेवा पुरवित आहे.
« यामध्ये पर्यावरणपूरक बसेस चालविण्यावर भर देण्यात येत असून परिवहन उपक्रमाच्या बस ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसच्या वापरावर भर देण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत FAME- II योजनेअंतर्गत 30 चार्जिंग स्टेशन उभारण्याकरिता अनुदान मंजूर आहे. त्यापैकी 20 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरु असून या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.
« डिझेल इंधनाचा वापर कमी करुन पर्यावरणपूरक कार्यवाही करण्यासाठी शनिवार व रविवारी आसूडगाव आगारातील डिझेलवर चालणाऱ्या बसेसच्या जागी इलेक्ट्रिक बसेस चालविण्यात येत असून त्यामुळे 3000 ते 3500 लीटर डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे जीसीसी तत्वावरील इलेक्ट्रिक बसचा वापर केल्याने ठेकेदारास देण्यात आलेल्या किलोमीटरची पूर्तता करुन घेण्यात येत असून त्यामुळे 70 ते 80 लाख रक्कमेची बचत होत आहे.
« परिवहन उपक्रमाच्या वातानुकुलित Volvo व Electric बस सेवेकरिता असलेल्या प्रचलित दरात 45% घट करून सुधारित तिकीट दराची अंमलबजावणी करण्यात आल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व किफायतशीर झाला आहे. यापुर्वी वातानुकूलित बससेवेच्या प्रवासात नागरिकांना कोणतीही सवलत देण्यात आलेली नव्हती. सदर सवलत सुधारित तिकीट दरात लागू केल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, पत्रकार इ. यांना लाभ मिळत आहे.
« अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करुन नागरिकांना वक्तशीर व विश्वासार्ह प्रवासी सेवा पुरविण्याच्या दृष्टीने ‘आयटीएमएस’ या प्रगत तंत्रप्रणालीचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे PIS (Public Information System), GPRS (General Packet Radio Service), AVLS (Automatic Vehicle Location System), AFCS (Automatic Fare Collection System), Mobile App, Mobile E-ticketing, Open Loop Navi Smart Card अशा प्रवाशांना उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ही प्रणाली आगामी वर्षात केंद्र शासनाच्या अनुदान आणि महानगरपालिका अनुदान यातून अद्ययावत करण्याचे प्रस्तावित आहे.
« कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून कर्मचारी अपघात प्रकरणे, नुकसान भरपाई, कामगार शिक्षण, कामगार प्रशिक्षण, पाल्यांसाठी बक्षिसे अशा विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. याशिवाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. तसेच आस्थापना व ठोक मानधन कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या बँकेत जमा करण्यात येते त्या बँकेमार्फत विमाकवच देण्यात येत आहे. कर्मचाऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास आस्थापना कर्मचाऱ्यांच्या वारसांना रु.4 लाख व ठोक मानधन कर्मचाऱ्यांच्या वारसांना रु.1 लाख आणि अपघाती मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना रु.30 लाख विमा कवच देण्यात येते.
« भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत (Ministry of Housing & Urban affairs) स्थापित Institute of Urban Transport (India) यांचेमार्फत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास ‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर (City with the Best Public Transport System-2022)’ या श्रेणीचा प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
« वाहतूक क्षेत्रात असलेल्या स्पर्धेमुळे तसेच डिझेल व सीएनजी दरात दिवसेंदिवस होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वाढीमुळे तसेच सुटे भाग व इतर संबंधित बाबींवरील खर्चातही वाढ होत असल्याने परिवहन उपक्रमावर आर्थिक ताण पडत आहे. या अनुषंगाने सीएनजी देयक, बस खरेदी व जीसीसी परिचलनातील तूट व इतर बाबींकरिता सन 2022-23 च्या महानगरपालिका अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाकरिता रू.241.53 कोटी तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी रू. 274.00 कोटी इतकी तरतूद करण्यात येत आहे.
z आपत्ती व्यवस्थापन विभाग :-
« महानगरपालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम करण्याच्या दृष्टीने आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणे, आपत्कालीन परिस्थितीत शोध व सुटका बचाव गटासाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदी करणे, पावसाळा कालावधीत, चक्रीवादळ, पुरग्रस्तांसाठीची मदत यासाठी आकस्मिक खर्चाची तरतूद करणे, अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण, जनजागृती, आपत्ती धोके विश्लेषण, आपत्ती व्यवस्थापन आराखडा परीक्षण व सुधारणा त्याचप्रमाणे कोव्हिड-19 महामारीसारखे संकट आल्यास त्यासाठी उपाययोजना व व्यवस्थापन करणे या महत्वाच्या बाबींकरिता अंदाजपत्रकात एकूण रक्कम रू. 8.71 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
« नवी मुंबई महानगरपालिका विविध आस्थापनांच्या (शहर अभियंता, नगररचना, आरोग्य, घनकचरा, पाणीपुरवठा) आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नमुंमपा कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी व अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विविध प्रकारचे आपत्ती विषयांचे प्रशिक्षण राबविणे प्रस्तावित आहे.
« नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे व कार्यक्षेत्रातील उदयान, तलाव, विभाग कार्यालय, आरोग्य व मोरबे धरण तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी एकूण 1021 सुरक्षारक्षक व 11 सुरक्षा पर्यवेक्षक कार्यरत आहेत.
« नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कार्यालय, महापौर कार्यालय व नमुंमपा मुख्यालय येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचेकडील प्रशिक्षीत सुरक्षारक्षक घेणेचा प्रस्ताव कार्यप्रणालीत आहे.
« नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी पास सिस्टम, बॅग स्कॅनर सिस्टम (थ्री डी- X-RAY), अंडर व्हेईकल सर्विलन्स सिस्टम (UVSS) मेटल पोल डिटेक्टर, सायरन यंत्र व नमुंमपा कार्यक्षेत्रातील हवामान व पाऊस मोजमाप करणेसाठी अत्याधुनिक हवामान यंत्र बसविण्यात आलेले आहेत.
z अतिक्रमण विभाग :-
अतिक्रमण पोलीस पथक / नागरी पोलीस ठाणे (Encroachment Squad) :-
« सन 2023-2024 या आर्थिक वर्षाकरिता रु. 6.00 कोटी इतका अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात येत आहे.
अनधिकृत बांधकामे हटविणे खर्च (Public Land) :-
« सन 2023-2024 या आर्थिक वर्षाकरिता रु.3.90 कोटी इतका अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात येत आहे.
अनधिकृत बांधकामे / अतिक्रमण निष्कासनाकामी अद्ययावत यंत्रसामुग्री खरेदी करणे / भाडेतत्वावर घेणे :-
« सन 2023-2024 करिता रक्कम रु.1.00 कोटी इतका अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात येत आहे.
नगरसेवक स्वेच्छा निधी व प्रभाग समिती निधी
« नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने प्रभागातील नागरी विकास कामांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात सन 2023-24 वर्षाकरिता प्रति नगरसेवक रु. 10.00 लक्ष याप्रमाणे नगरसेवक स्वेच्छानिधी आणि प्रति नगरसेवक रु. 60.00 लक्ष प्रभाग निधी अशाप्रकारे स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे.
* विकासाभिमुख अंदाजपत्रक *
« नवी मुंबई शहर स्वच्छतेप्रमाणेच दर्जेदार नागरी सुविधांमुळेही नावाजले जाते. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात शहराबद्दल अत्मियता व अभिमान आहेच, त्यासोबतच विकासाच्या क्षमता असणारे शहर म्हणून केंद्रीय व राज्य शासनाच्या पातळीवरुनही नवी मुंबईकडे अपेक्षेने पाहिले जाते. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी शहराच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीसाठी सजग राहून उत्तम काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
« यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नवी मुंबईकर नागरिक हे जाणून नागरिकांना अपेक्षित असलेल्या शहर विकासासाठी काम केले जात आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकातही नागरिकांना नजरेसमोर ठेऊन त्यांच्या संकल्पनेतील शहर विकासाचा विचार करण्यात आलेला आहे. नागरिकांमार्फत, लोकप्रतिनिधींमार्फत, प्रसारमाध्यमांमार्फत शहराच्या प्रगतीसाठी विविध सूचना, संकल्पना वेळोवेळी प्राप्त होत असतात. त्याचा साकल्याने विचार करुन हे अंदाजपत्रक साकारलेले आहे, हे सांगतांना मला आनंद होत आहे.
« मागील 2 वर्षांच्या कोव्हिड प्रभावित कालखंडामुळे व त्यातील लॉकडाऊनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामारे जावे लागले. अर्थकारणाची गतीही मंदावली. या सर्व बाबींचा विचार करुन सन 2023-24 चे अंदाजपत्रक सादर करताना कोणत्याही प्रकारची करवाढ न करता नागरिकांना दिलासा देण्यात आलेला आहे. तथापि, याचा परिणाम विकासकामांवर होणार नाही याचीही खबरदारी घेत उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ राखून लोकांना अपेक्षित असलेल्या नागरी सुविधा पूर्ततेची काळजी घेण्यात आलेली आहे. याकरिता कामांचा प्राधान्यक्रम ठरवून शहर विकास गती वृध्दींगत होत राहील असा प्रयत्न् आहे. वर्तमानाचे भान राखून नागरिकांना अपेक्षित अशा शहर विकासाला नवा आयाम देणारा हा वास्तवदर्शी अर्थसंकल्प आहे, हे नमूद करणे मला महत्वाचे वाटते.
« “स्वच्छ आणि सुंदर शहर” अशी नवी मुंबईची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख ठसलेली आहे. अर्थात यामध्ये महानगरपालिकेच्या प्रयत्नांना कायम साथ देणाऱ्या व स्वच्छतेबाबत सजग असणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे. यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये विविध विभागांमध्ये हजारो नागरिकांनी स्वत: झाडू हाती घेत, तेथील स्वच्छताकर्मींना 1 दिवसाची सुट्टी देत संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. नागरिकांची ही संवेदनशीलता आणि जागरुकताच नवी मुंबईला देशात नंबर वन बनवेल आणि हा नंबर कायम राहील असा विश्वास मला वाटतो.
« शहर स्वच्छतेप्रमाणेच ‘माझी वसुंधरा अभियानात’ आपण राज्यात प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील म्हणून गौरविलो गेलो आहोत. आज जगभरातील स्थिती बघता पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही मानवी भविष्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब असल्याचे जाणवत आहे. याकरिता उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधने जपून वापरण्यासोबतच पर्यावरण गुणवत्तावाढीसाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे साध्य करण्यासाठी ‘नेट झिरो’ ही संकल्पना राबविण्याकडे विशेष प्राधान्याने लक्ष देण्याचे आपण निश्चित केले आहे.
« या अनुषंगाने मियावाकी स्वरुपातील दाट शहरी जंगल निर्मितीत वाढ करणे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे व त्यासाठी आवश्यक चार्जींग स्टेशनसारख्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला प्राधान्य देणे अशा विविध गोष्टींवर भर देण्यात येत आहे. वायू प्रदूषण कमी करण्याच दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सहयोगाने विविध उपाययोजना राबविण्यावरही भर दिला जात आहे. या माध्यमातून कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी पर्यावरण कृती आराखडा तयार करुन त्याची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
« मागील दोन वर्षात कोव्हिडमुळे आरोग्य सेवेचे मूळचेच असणारे महत्व आणखी प्रकर्षाने जाणवलेले असून नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये व आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कौशल्यपूर्ण गुणवत्ता विकासासाठी, दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी, महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय घटक, आर्थिक दुर्बल घटक यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण योजना, उपक्रम राबविण्यावर अंदाजपत्रकामध्ये भर देण्यात आलेला आहे.
« नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2023-24 चे हे अंदाज तयार करण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच सर्व विभागप्रमुख यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे. या अंदाजाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी व नवी मुंबईकर नागरिकांना अपेक्षित उत्तम दर्जाच्या सेवासुविधा पूर्ततेसाठी महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख अधिकारी-कर्मचारी उत्साहाने कार्यरत राहतील असा विश्वास मला आहे.
« मागील वर्षाच्या अंदाजातील अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाचा विचार करुन नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनातील अत्याधुनिक स्वच्छ, सुंदर, पर्यावरणशील, आरोग्यपूर्ण शहर साकारले जावे, याकडे हे अंदाज सादर करताना विशेष लक्ष देण्यात आले आहे.
« नवी मुंबई शहराच्या आत्तापर्यंतच्या प्रगतीत आणि नावलौकिकात येथील लोकप्रतिनिधी, नागरिक, प्रसारमाध्यमे व नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांचा महत्त्वाचा वाटा असून यापुढील काळात तो असाच वाढत राहील यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. नागरिकांना गुणवत्तापूर्ण सुविधापूर्ती व लोकाभिमुख काम करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिका कायम कटिबध्द राहील.
« मागील उद्दिष्टपूर्ती करणारे, आरंभीची शिल्लक रु. 1816.41 कोटी व जमा रु. 2706.36 कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु. 4522.77 कोटी आणि रु. 3377.74 कोटी खर्चाचे सन 2022-23 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 1145.03 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह जमा रु. 4925.00 कोटी व रु. 4922.50 कोटी खर्चाचे आणि रु. 2.50 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2023-24 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी घोषित केले.
Published on : 17-02-2023 11:36:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update