सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेल्या ऑटो डिसीआर ऑनलाईन संगणकीय कार्यप्रणालीबाबत कार्यशाळा.
नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होणा-या विकास प्रस्तावांची छाननी शासन निर्देशानुसार बीपीएमएस प्रणालीव्दारे ऑनलाईन होत आहे. या BPMS प्रणालीची अंमलबजावणी शासन निदेशानुसार दि. 01 जुलै 2022 पासून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने दि.12 ऑगस्ट 2022 च्या पत्रान्वये बीपीएमएस संगणकप्रणाली व्यतिरिक्त सॉफ्ट टेक कंपनीने तयार केलेली ऑटो डीसीआर प्रणाली वापरण्यास मान्यता दिलेली आहे. या प्रणालीचा उपयोग करून ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याच्या कार्यवाहीस सुरुवात करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतही ही कार्यप्रणाली नियमितपणे राबविली जावी यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून या प्रणालीव्दारे ऑनलाईन बांधकाम परवानगी प्राप्त करण्यामध्ये वापरकर्त्यांस येणा-या अडचणी दूर होणार आहेत. याबाबतच्या कार्यप्रणालीची माहिती व्हावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नगररचना विभागामार्फत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिका मुख्यालयातील नगररचना विभागाच्या संमेलन कक्षात महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडत या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर व्हावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सर्व संबंधित प्राधिकरणांशी समन्वयाचे काम करीत असून या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर होऊन विकास प्रस्तावांची छाननी सुनियोजित पध्दतीने व सहज सुलभरित्या व्हावी असा प्रयत्न असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांच्या समवेत नगररचना विभागातील सर्व उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. सॉफ्टटेकच्या वतीने श्री. निखिल कापसे, श्री. अंकित पटाणी व श्री. सचिन सिनकर यांनी या प्रणालीची विस्तृत माहिती देत तिच्या वापराविषयी मार्गदर्शन केले. तसेच ऑटो डिसीआर संगणक प्रणालीमधील काही वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रीडीसीआर स्वतंत्र सॉफ्टवेअरमध्ये जे ऑटोकॅड वास्तुविशारद वापरतात त्या आवृत्तीशी सुसंगत असून ऑटो डिसीआर संगणक प्रणालीमध्ये सादर करण्यापूर्वी सदर नकाशे प्रमाणित करुन घेण्यात येतात. प्रत्येक प्रकल्पाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करता येते, सदर संगणक प्रणाली वापरकर्त्यांना समजण्यास व वापरण्यास अत्यंत सोपी आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वास्तुविशारद व विकासक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच कटीबध्द असते. लवकरच वास्तुविशारद यांनादेखील सॉफ्टटेकच्या वतीने प्रशिक्षण देण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
बीपीएमएस संगणक प्रणालीसह सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेली ऑटोडीसीआर प्रणाली देखील नवी मुंबई महानगरपालिकेत वापरण्यास सुरवात केलेली असून याचा उपयोग विकास प्रस्तावांची छाननी व पुढील कार्यवाही करण्यासाठी होईल व याचा उपयोग वास्तुविशारद व नागरिकांना मोठ्या प्रमाणात होईल असा विश्वास सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 22-02-2023 12:30:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update