फोर्टी प्लस क्रिकेटमुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागल्याचा आ.श्री.गणेश नाईक यांनी व्यक्त केला आनंद
आरोग्य जपणुकीचे महत्व जनमानसात आता चांगलेच रूजू लागलेले असून क्रिकेटसारख्या खेळाच्या माध्यमातून स्वत:च्या प्रकृतीबाबत जागरूक असणा-या खेळाडूंनी मास्टर प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू केलेले फोर्टी प्लस क्रिकेटचे लोण आता नवी मुंबईतून राज्यभरात लोकप्रिय होत असल्याबद्दल ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांनी आनंद व्यक्त केला. फोर्टी प्लस क्रिकेटमुळे नवी मुंबईच्या गावागावात संघ निर्माण झाले, स्पर्धेमुळे खेळाडू एकत्र आले आणि परस्परांतील संवाद वाढला ही अतिशय चांगली गोष्ट झाल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. तसेच फोर्टी प्लसचे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे व्हावे अशाही सूचना केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घणसोली सेक्टर 16 येथे आयोजित दोन दिवसीय नवी मुंबई महानगरपालिका चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार श्री. गणेश नाईक यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत स्वत: बॅटिंग करीत स्पर्धेचा शुभारंभ केला.
याप्रसंगी क्रीड़ा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील आणि पदाधिकारी सर्वश्री नरेश गौरी, लिलाधर पाटील, विकास मोकल, मनोज म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विविध खेळांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील असून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजनातून खेळाडूंना त्यांचे क्रीडागुण सिध्द करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असते.
त्याचाच एक भाग म्हणून करून वयाच्या चाळीशीनंतर क्रिकेटसारख्या खेळाच्या माध्यमातून स्वत:च्या आरोग्याविषयी जागरुक असणा-या फोर्टी प्लस खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी 3 व 4 मार्च रोजी नमुंमपा चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये नवी मुंबईच्या गावांतील 33 संघ तसेच शहरी भागातील 22 संघ सहभागी होत असून शनिवार दि. 4 मार्च रोजी, सायं. 6 वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. तरी क्रिकेटप्रेमींनी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या दोन दिवसीय स्पर्धेप्रसंगी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-03-2023 09:19:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update